सामान्यकाळातील १५वा सप्ताह
गुरुवार १४ जुलै २०२२
"मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या
संत कॅमिलुस डी लेलीस
- वर्तनसाक्षी (१५५०-१६१४)
चिंतन : हे प्रभो, मी ह्या जगातील सर्वांत नीच आणि क्षुद्र असा मानव आहे. परंतु केवळ तुझ्या अपार करुणेपोटी तू माझा बचाव कर. - संत कॅमिलुस
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू सर्वांना आश्वासन पूवर्क सांगत आहे, आपला प्रभू खरोखरच महान परमेश्वर आहे. तो आपल्या सर्वांच्या जीवनातील ओझी हलकी करू इच्छितो. थकलेल्या आणि भारक्रांत झालेल्या सर्वांना प्रभू त्याच्या विसाव्यात म्हणजेच त्याच्या सहवासात येण्यासाठी आमंत्रण देत आहे. प्रभू येशूच्या विसाव्यात व सहवासातच आपल्या सर्व समस्यांचे उत्तर आपल्याला मिळू शकते. त्याच्या मायेच्या पंखाखाली राहिल्यास सर्व दुःखे व कष्ट हलकी होतात. प्रभू येशू आपल्या सर्वांना बोलावित आहे, आपण त्याला शरण जाऊ या. प्रभूच्या ठायीच शांती आणि विसावा आहे. त्याचा सहवास अनुभवण्यासाठी आपण त्याच्या राजासनाजवळ जाऊ या.
पहिले वाचन :यशया २६:७-९,१२,१६-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन "मातीस मिळालेल्यांनो, जागृत व्हा आणि गजर करा.'
धार्मिकाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून तू धार्मिकाची गती सरळ करतोस. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करत आहो; तुझ्या नामाची आणि तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवाला लागून राहिली आहे. रात्री माझ्या जिवाला तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन. कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर दृष्टोत्पत्तीस येतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. हे परमेश्वरा आम्हांसाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आम्हांसाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.
हे परमरेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्गत तुला कळवले. प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते आणि वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहे; आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही, देशात वस्ती करायला कोणी जन्म पावले नाहीत. तुझे मृतजन जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीला मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दंहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०२:१३-२१
प्रतिसाद : परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले.
१ )हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस;
तुझ्या नामाचे स्मरण पिढ्यान्पिढ्या कायम राहील.
तू उठून सियोनवर दया करशील;
कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे.
नेमलेला समय येऊन ठेपला आहे;
तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत;
तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.
२) राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला,
पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील;
कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे,
तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे.
त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे;
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.
३) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल;
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील;
कारण परमेश्वराने आपल्या उच्च
पवित्र स्थानावरून खाली पाहिले.
त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून
बंदिवानांचे सासे ऐकले
ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:२८-३०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी मनाचा सौम्य आणि लीन आहे."
येशूने म्हटले, “अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : “तुम्ही सर्वजण माझ्याकडे या” या उद्गारामधून प्रभू येशू आपल्याला आमंत्रण देतो. या आमंत्रणाद्वारे आपल्याला येशूमध्ये परिपूर्ण जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तीन प्रकारचे संदेश या उद्गारातून व्यक्त होतात. १) आमंत्रणात येशू, लोक कोणत्या प्रकारचे व कसे आहेत ते पाहात नाही तर आपल्या आमंत्रणात येशू सर्वांना सहभागी करतो. येशू आपल्या जीवनात आदरातिथ्याला अधिक प्राधान्य द्यायचा. दुसऱ्याच्या आदरातिथ्यात त्याने कधी कमीपणा दाखविला नाही. तर हसत मुखाने त्यांचा पाहुणचार केला. २) तुम्ही सर्वजण माझ्याकडे या असं येशू जेव्हा सांगतो तेव्हा येशूला हेच सांगायचे आहे की, माझं प्रेम हे तुम्हा सर्वांसाठी आहे. येशूच्या प्रेमापासून कुणीच वगळला जाऊ शकत नाही. येशूच्या शत्रूंना देखील त्यासाठी आमंत्रण आहे. ३) “तुम्ही सर्वजण माझ्याकडे या” याद्वारे येशू सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे. हे दर्शवितो. आपल्या सेवाकार्यात मग्न असताना देखील स्वतःच्या वैयक्तिक अर्जेडात येशूने दुसऱ्यासाठी वेळ दिलेला आहे. येशूमध्ये दिसून आलेला आदरातिथ्यपणा हा त्यांच्याकडे आलेल्यांना विश्रांती देतो. माझं वैयक्तिक जीवन परिपूर्ण करण्यासाठी मी येशूकडे जातो / जाते का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या विसाव्यात येण्यास व तुझी माया व कृपा | अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या