Marathi Bible Reading | Friday 15th July 2022 | 15th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १५वा  सप्ताह 

शुक्रवार १५ जुलै २०२२

'मला दया पाहिजे, यज्ञ नको,'


संत बोनावेंचर
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२१८-१२७४)

इटालीमधील  जन्मलेला जॉन फिडान्झा वयाच्या चौथ्या वर्षी एका असाध्य दुखण्याने आजारी पडला; परंतु संत फ्रान्सिस असिसीच्या प्रार्थनेने तो बरा झाला. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने बोनावेंचर हे नवीन नाव धारण केले.
फ्रान्सिस्कन संघामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने अभ्यास करून इ. स. १२५७ साली डॉक्टरेट ही पदवी मिळविली.
त्याच वर्षी त्याला फ्रान्सिस्कन संघाचे जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्याचे वय केवळ ३६ वर्षाचे होते. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्सिस्कन संस्थेतील दोन मतप्रवाहामध्ये सौम्य असा संघर्ष सुरू झाला होता. काहींना वाटे फ्रान्सिस असिसीकर ह्याने दिलेली आचारसंहिता काटेकोरपणे पाळायलाच हवी तर काहींच्या मते बदलत्या जमान्यानुसार त्या आचारसंहितेत शिथिलता आणण्यात यावी. शेवटी बोनावेंचर ह्यांनी दोन्ही मतप्रवाह जाणून घेऊन सुवर्णमध्य काढला आणि संस्थेचे कार्य फोफावण्यास सुरूवात झाली. त्यामुळे संत बोनावेंचर ह्यांना फ्रान्सिस्कन संस्थेचे दुसरे संस्थापक अशा नावाने संबोधले जाते.
पवित्र मरियेला देवदूताचा संदेश या घटनेच्या स्मरणार्थ दर दिवशी उजाडण्यापूर्वी आणि दिवस मावळण्याच्या वेळी देवळाची घंटा वाजविली जावी आणि 'नमो कृपापूर्ण मरिये' ही प्रार्थना म्हटली जावी असा आदेश त्यांनी सर्व फ्रान्सिस्कन मठांना दिला होता. पुढे तर ही परंपरा इतकी रुजली की, आज ती प्रार्थना जगभरच्या ख्रिस्तसभेच्या प्रार्थनेचा एक भाग बनलेली आहे. फ्रान्सचा राजा संत लुईस नववा (सण २५ ऑगस्ट) ह्यांच्या विनंतीवरून बोनावेंचर ह्यांनी येशूच्या दुःखसहनावर आधारित सुंदर प्रार्थनाविधीसुद्धा लिहिलेला आहे. इ. स. १२६५ साली संत बोनावेंचर ह्यांना यॉर्क शहराचे आर्चबिशप म्हणून नियुक्त करावे असा पोपमहाशयांचा मानस होता परंतु बोनावेंचर ह्यांनी त्या सन्मानास नम्रपणे नकार दर्शविला. आठ वर्षांनी मात्र पोपमहाशयांनी आपल्या विशेषाधिकाराने त्यांना आल्यानोचे कार्डिनल बिशप नेमले. जेव्हा त्यांचे नियुक्तीपत्रक घेऊन पोपमहाशयांचे प्रतिनिधी बोनावेंचर ह्यांच्याकडे गेले तेव्हा फ्लॉरेन्स येथल्या एका मठामध्ये ते जेवणाच्या वशा आणि भांडी धूत होते. त्यांनी प्रतिनिधींना कार्डिनलपदाची टोपी आपले काम संपेपर्यंत जवळच्या खुंटीवर टांगून ठेवण्यास सांगितले.
कार्डिनल बोनोवेंचर हे पोप ग्रेगरी दहावे ह्यांचा उजवा हात होते. लिऑन्स येथे भरलेल्या १४ व्या विश्वपरिषदेची पूर्वतयारी करण्याचा अधिकार पोपनी बोनावेंचर ह्यांना दिलेला होता. स्वत: पोप ह्या पूर्वतयारीच्या सर्व सभांना जातीने उपस्थित होतेच त्यावेळी कार्डिनल बोनावेंचर ह्यांनी प्रत्येक सभेला केलेले मार्गदर्शन, त्यांची विद्वता आणि ख्रिस्तसभेशी असलेली एकनिष्ठा व तळमळ व्यक्त करणारे होते. दुर्दैवाने ह्या परिषदेचे कामकाज संपण्यापूर्वीच कार्डिनल बोनावेंचर ह्यांना देवाने आपल्याकडे बोलावून घेतले.
संत बोनावेंचर १५ जुलै १२७४ साली मरण पावले. १४८२ साली संतपदाला पोहोचले आणि १५८८ त्यांना ख्रिस्तसभेने धर्मपंडित ही पदवी देऊन गौरविले.
 पोप लिओ तेरावे ह्यांनी त्यांना “देऊळमातेचा साक्षात्कारी राजपुत्र" अशी पदवी बहाल केली.
ईशज्ञान, तत्त्वज्ञान अध्यात्म, दैनंदिन जीवन आणि पवित्र शास्त्रावरील भाष्य अशा विविध क्षेत्रातील मौल्यवान खजिना संत बोनावेंचर ह्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला आहे. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे कॉमेंट्री ऑफ द सेंटेन्सेस नावाचे बायबलवर ४,००० पानांचे लिखाण आजही तितकेच प्रेरणादायी आहे. संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र इ. स. १२६३ साली पिसा येथल्या एका महासभेत फ्रान्सिस्कन संस्थेच्या संस्थापकाचे अधिकृत चरित्र म्हणून सन्मानीत केले गेले.संत बोनावेंचर ह्यांच्याठायी एक उत्तम वक्तादेखील दडलेला होता. राजे महाराजे, महागुरू, धर्मगुरू, सामान्य जनता किंवा आपल्या मठातील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांना ते अत्यंत आत्मियतेने व तळमळीने मार्गदर्शन करीत असत, प्रवचन, व्याख्याने, भाषणे ह्यांची एकही संधी त्यांनी गमावली नाही. सर्वांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत असताना ते स्वतः ख्रिस्तमय झाले आणि सर्वांपर्यंत जाऊन पोहोचले.

चिंतन : धार्मिक माणसाच्या जीवनाची खरी परिपूर्ती साध्यासुध्या गोष्टी अगदी सुरळीतपणे व व्यवस्थितरित्या करण्यात दडलेली आहे. - संत बोनावेंचर


पहिले वाचन :यशया ३८:१-६, २१-२२,७-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. "

हिज्किया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोसचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस." तेव्हा हिज्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो." असे म्हणून हिज्किया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो असा: "हिज्कियाला जाऊन सांग की, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अश्शुरच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन, "
यशयाने सांगितले होते की, "अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध म्हणजे त्याला गुण पडेल." हिज्कियाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय ?"
यशया उत्तरादाखल म्हणाला होता की, परमेश्वर बोलला आहे, ते करीलच, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे: पाहा, आहाजच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली आहे, तिला परत दहा पायऱ्यांवर आणतो." तेव्हा छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली होती ती दहा पायऱ्यांमागे सरली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र यशया ३८:१०- १२,१६

प्रतिसाद : हे परमेश्वरा तू माझा जीव (विनाशगर्तेतून मायेने) उद्धरला आहेस.

१) मी म्हटले, "माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत 
मी अधलोकांच्या द्वारात प्रवेश करीन; 
माझ्या आयुष्याची उतरलेली वर्षे 
माझ्यापासून हिरावून घेतली आहेत."

२ ) मी म्हटले, "मला परमेश्वराचे, 
जिवंतांच्या भूमीवर असता 
परमेश्वराचे दर्शन होणार नाही; 
मी जगातील रहिवाशांसह राहून 
मनुष्य माझ्या दृष्टीस इतः पर पडणार नाही.

३)“माझे घर मोडले आहे, 
ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे.
 कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; 
तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे.

४ "हे प्रभो, ह्या गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात. 
त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; 
म्हणून तूच मला बरे कर आणि जिवंत ठेव.”


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, 
आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १२:१-८
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
  "मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे."
एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत." त्याने त्यांना म्हटले, "दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र  खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय ? किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय ? तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको,' ह्यांचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्याला दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आपले विरोधक हे आपल्या आजूबाजूलाच फिरत असतात, परूशी वर्ग येशूमध्ये चांगले ते सोडून देऊन त्यांच्यात उणीवाच शोधण्याचा प्रयत्न करीत असत. शब्बायाचा नियम हा कळीचा मुद्दा अध्याय १२ मध्ये दोन वेळा येणार आहे. शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळ ही जुन्या करारातील आज्ञा परंतु तिच्या भोवती काय करावे व काय करू नये ते सांगणाऱ्या असंख्य उपविधी नियमाच्या राशी रचल्या होत्या. येशू शब्बाथ नियमाच्या विरुद्ध आहे असं बोलला नाही. परंतु नियमापेक्षा माणसांच्या गरजांना अधिक प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे परूशी वर्गाने येशूला आपलं लक्ष्य ठरवले. येशू परूश्यांना उत्तर देताना जुन्या करारातील दोन उदाहरणे देतो. १शमुवेल २१:१ ६ दाविदाचा संदर्भ व गणना २८:१-२० मंदिरातील पुरोहित. दाविदाने माणसांच्या गरजेसाठी नियमांचे उल्लंघन केले. तसेच पुरोहित शब्बाथ दिवशी मंदिरात बळी अर्पण करतात. येशूच्या या वृत्तीवरून हेच सुचित होते की, प्रेम भावनेने गरजवंतांना मदत करणे हे कुठल्याही नियमांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. व्यक्तीला प्राधान्य द्यावे हे कोणत्याही नियमापेक्षा श्रेष्ठ आहे. मी नियमाचा गुलाम आहे की नियमापेक्षा व्यक्तीला प्राधान्य देतो ?

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझे सर्व नियम पाळण्यास व गरजवंतांची सेवा  करण्यास मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या