Marathi Bible Reading | Saturday 16th July 2022 | 15th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १५वा  सप्ताह 

शनिवार १६ जुलै २०२२

"पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे;




कार्मेल मातेचा सण 

कार्मेलाईट संस्थेचा संस्थापक संत सायमन स्टॉक (सण १६ मे) ह्यांनी आपल्या संस्थेचा चाललेला छळ रोखण्यासाठी पवित्र मरियेकडे संरक्षणाचे साकडे घातलेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इ. स. १२५१ साली इंग्लडमधील केंब्रिज ह्या ठिकाणी पवित्र मरियेने या वृद्ध सत्पुरुषाला दर्शन दिले आणि त्यांना तपकिरी रंगाची बेंतीण दिली. त्यावरून ख्रिस्तसभेत पवित्र मरिया ही “बेंतीणीची प्रणी" म्हणून । ओळखली जाऊ लागली व वेंतीण हा ख्रिस्ती परंपरेचा एक भागच बनली. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे सर्व वाईटांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना बेंतीण देण्यात येते.
संत सायमन स्टॉक ह्यांना पवित्र मरियेने बेंतीण देतेवेळी अशी शाश्वतीदेखील दिली की, जो कोणी ही बेंतीण अत्यंत श्रद्धेने आणि मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे बाळगील त्या व्यक्तीला पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा विशेष लाभ होईल. तसेच मरणाच्या वेळी त्याला खास असे संरक्षण देण्यात येईल आणि अनंत यातनांपासून त्यांचे रक्षण करण्यात येईल.
एलिया संदेष्ट्याने कार्मेल नावाच्या पर्वतावर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन जगाला घडविले ती कथा १ राजे अध्याय १८ मध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. शिवाय पॅलेस्टाईनमधल्या या कार्मेल पर्वतावर अनेक प्राचीन मठवासियांचे वास्तव्य होते, त्यामुळे हा पर्वत पवित्र भूमी म्हणून गौरविला गेला आहे.१३ व्या शतकात सारासीन लोकांनी मोठे हत्याकांड घडवून आणल्यामुळे सायमन स्टॉक ह्यांच्या मठवासियांनी कार्मेल पर्वतावरून पलायन केले आणि एकांतवासाऐवजी लोकांतवासाची परंपरा अंगिकारली. काही उपासतापासाचे आणि मौनाचे कडक कायदे त्यांनी शिथिल केले.

केवळ कर्मकांड आणि नियमशास्त्र म्हणजे धर्माचरण नाही. तर  त्याच्याहि पलिकडे जाऊन माणसांच्या मुलभूत गरजा, अडचणी, आजार, दु:खे, व संकटे ह्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी कार्यरत बनणे. प्रभू येशूने तात्कालीन धर्मपंडितातांचे आव्हान स्वीकारुन देवराज्याची सुवार्ता पसरविली.

प्रभू येशू सर्वांचा उद्धारक व मुक्तीदाता परमेश्वर आहे. आपण केवळ कर्मकांडाच पालन न करता श्रद्धेने प्रभू येशूच्या वचनावर आणि आज्ञांवर चिंतन  करु या. आपले आध्यात्मिक सामाजिक जीवन तपासून पाहू या, प्रेम, त्याग,  सेवा, परोपकार व दयाळूपणा ह्यांना आपल्या जीवनात अग्रस्थान देऊन, आपले जीवन परिवर्तन घडवून आणू या. ख्रिस्तामध्ये एकरुप होऊन इतरांना ख्रिस्ताच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील बनू या.


पहिले वाचन :मिखा २:१-५
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ते शेताचा लोभ धरतात आणि घरे हस्तगत करतात."

जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछान्यावर पडल्यापडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे. त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही, तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील आणि म्हणतील, “सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र फितुरांना त्याने वाटून दिले आहे." ह्यामुळे चिठ्ठी टाकून सुत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावयाचा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १० :१- ४,७-८,१४

प्रतिसाद : हे परमेश्वरा, गरिबाला विसरू नकोस,

१) हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस ? 
आणि संकटसमयी दृष्टिआड का होतोस? 
दुर्जनांच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने होरपळून जातो; 
ज्या क्लुप्त्या ते योजतात त्यातच ते सापडोत..

२) कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; 
लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. 
दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही. 
देव नाही." असाच त्याच्या सर्व विचांराचा सार असतो.

३) त्याच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदैव आहेत,
 त्याच्या जिभेवर उपद्रव आणि दुष्टाई आहेत. 
गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; 
गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो. 

४ )तू हे पाहिलेच आहे, उपद्रव आणि दुःख 
ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी 
त्यांच्याकडे तू नजर लावतोस. 
लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; 
पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो. 
मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १२:१४-२१
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
  
“जे आजारातून बरे झाले होते त्यांना येशूने यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून ताकीद दिली की, मला प्रकट करू नका."

परुश्यांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्याविरूद्ध मसलत केली.पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्यामागून चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले आणि यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे; म्हणून मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. यशयाद्वारे सांगितले होते, "पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आपले विरोधक हे आपल्यावर नजर ठेवून बसले आहेत, याची येशूला जाणीव होती व येशू देवराज्याचा  प्रचार पुढे चालू ठेवण्यासाठी अलिप्तता स्वीकारतो. इथे येशूची कमजोरी दिसत नाही, येशू तेथून पळ काढीत नाही तर त्यात प्रभूचे सामर्थ्य दिसते. मानवी हिंसाचार व कपटीपणा याला येशूने दिलेला प्रतिसाद त्यातून स्पष्ट होतो. यशया संदेष्ट्याने देवाच्या सेवकाचे वर्णन सौम्य, लीन आहे. आक्रमक नाही तरीही अखेरीस तो विजयी होईल हे सांगितले आहे (यशया ४२:१-४). सेवक गीते यामधून ओळखल्या जाणाऱ्या गीतांमधील हे गीत आहे. त्याचे जीवन यातना, क्लेश यांनी भरलेले आहे. ज्यांना इतरांनी झिडकारले आहे त्यांचा स्वीकार करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. “चेपलेला बोरू मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.” म्हणजे जे आधीच भरडले गेले आहेत त्यांना तो आणखी त्रास होईल असे काही करणार नाही. या वचनावरून असे स्पष्ट होते की, येशू आपले कार्य फारसा गाजावाजा न करता करतो. जीवनात जी आव्हानात्मक परिस्थिती आपल्याला असुरक्षित करते तिला आपला प्रतिसाद म्हणजे भीतीपोटी त्यापासून दूर जाणे व काही वेळा समर्थन प्रक्रिया वापरणे. ह्यापैकी कुठलाही मार्ग येशू आपल्यापुढे ठेवत नाही. त्यांचा मार्ग म्हणजे आपणासमोरील आव्हाने स्वीकारणे. मी माझ्या विरोधकाबरोबर कशाप्रकारे वागतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला जाणण्यास व तुझी वचने श्रद्धेने कृतीत उतरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या