सामान्यकाळातील १६ वा रविवार
१७ जुलै २०२२
मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे."
श्रद्धा, आदरतिथ्य आणि सेवा ह्यांचा महान संगम श्रद्धेचा आदिपिता आब्राहाम ह्यामध्ये झाल्याचे वर्णन आजच्या उत्पत्तीच्या पहिल्या वाचनात करण्यात आले आहे. म्हतारपणी परमेश्वराने आब्राहामाला पुत्र प्राप्तीचा आशिर्वाद दिला. त्याच्या अपार श्रद्धेमुळेच परमेश्वर सहवासाचा आनंद त्याला लाभला.
प्रभूने मार्थाला म्हटले 'मार्थे, मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस.' आपण सुद्धा अनेकदा जागतिक गोष्टी करण्यामध्ये इतके गढून जातो की, देवाच्या सहवासात निवांत बसायला आपल्याला वेळ नसतो. प्रभू येशू म्हणत आहे, ‘मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे.'
जागतिक गोष्टींमध्ये आणि ससांराच्या चिंतेमध्ये काळजी करीत 'बसण्यापेक्षा परमेश्वराच्या सहवासात एकांतात व निवांतपणे जाऊन बसल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. खरे पाहता आजसुद्धा अति पवित्र साक्रामेंताच्या पेटीत प्रभू येशू जिवंतपणे हजर आहे. प्रभू आपली वाट पाहत आहे.त्याच्या सहवासात जाऊन त्याची वाणी ऐकण्यासाठी आपण वेळ काढू या
✝️
पहिले वाचन :उत्पत्ती १८:१-१०
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन "प्रभो, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस."
आब्राहाम दुपारच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राइत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तर आपल्यासमोर तीन पुरूष उभे आहेत. त्यांना पाहून त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून नमन केले; तो म्हणाला, “हे प्रभो, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. मला थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवाला आधार करा, मग पुढे जा; यासाठीच तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे." ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर." तेव्हा आब्राहाम घाईने तंबूत साराकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर तयार कर आणि ते मळून त्याच्या भाकरी कर." आब्राहामने गुरांकडे धावत जाऊन एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते लवकर शिजवले. नंतर आब्राहामने लोणी, दूध आणि ते शिजवलेले वासरू ही आणून त्यांच्यापुढे ठेवली आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
मग ते त्याला म्हणाले, "तुझी बायको सारा कोठे आहे?" तो म्हणाला, "तो पाहा, तंबूत आहे." मग परमेश्वर म्हणाला, "पुढल्या वंसतऋतूत मी तुझ्याकडे परत येईनच येईन; त्या समयी तुझी बायको सारा पुत्रवती होईल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :१४:१-५
प्रतिसाद :हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ?
१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो,
जो मनापासून सत्य बोलतो तो,
आपल्या जिभेने चुगली करीत नाही तो.
२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही,
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.
३) तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
तो निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही,
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.
दुसरे वाचन कलस्सै १: २४-२८
वाचक: पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“जे रहस्य युगानुयुगे गुप्त ठेवलेले होते, ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे."
तुम्हांसाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करायला जो कारभार तुम्हांसाठी देवाने मजवर सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे. प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे म्हणून आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष योहान २०:२९
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे;
सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १०:३८-४२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मार्थाने येशूचे आपल्या घरी स्वागत केले. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे."
येशू एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, "प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय ? मला साहाय्य करायला तिला सांगा.” प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टीचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आदरातिथ्य हा इस्त्राएली लोक जीवनाचा एक अतिशय महत्वाचा पैलू मानाला जाई. जुन्या व नव्या करारामध्ये आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगतस्वागत करणाऱ्या असंख्य लोकांची उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. आजच्या उपासनेतील वाचनात अशीच तीन उदाहरणे सादर करण्यात आलेली आहेत. त्यामधून पुढील तीन चिंतने आपल्याला मिळतात. अ. अतिथी देवोभव! पाहुण्यांचे स्वागत हे साक्षात देवाचे स्वागत होयः आजच्या पहिल्या वाचनात आब्राहाम तीन पाहुण्यांचे स्वागत करतो. त्याने त्यांच्यासमोर घातलेले लोटांगण ही कृती फक्त देवासाठी किंवा त्याने अभिषिक्त केलेला राजा, याजक किंवा संदेष्टा ह्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. ते जेवीत असता आब्राहाम झाडाखाली उभा राहतो ही कृती आज्ञा झेलण्यासाठी तत्पर असणाऱ्या सेवकांशी संबंधित होती.
ब. पाहुण्याचे योग्य स्वागत करण्यासाठी त्याच्याशी मनाने एकरूप व्हावे लागते : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सै येथील ख्रिस्तमंडळीच्या वाढीसाठी हवे ते कष्ट उपसण्याची तयारी दाखवतो. ख्रिस्ताने शारीरिक कष्ट घेतले. आता त्याचे रहस्यमय शरीर असलेली ख्रिस्तसभा दुःखसहन करते. अशा ख्रिस्तसभेशी एकरूप होऊन संत पौल कलस्सैच्या बंधुभगिनींचे स्वागत करतो.
क.देवाचे स्वागत एक पाहुणा म्हणून नव्हे तर आपला स्वामी म्हणून करावे : आजच्या शुभवर्तमानात मार्था येशूचे स्वागत एक पाहुणा म्हणून तर मरिया त्याचे स्वागत आपला गुरु म्हणून करते. मार्था येशूच्या शारीरिक भुकेसाठी कष्ट घेऊ पाहते. येशूला मात्र तिच्या आध्यात्मिक भुकेची काळजी वाटते. मार्थाची भूमिका डळमळीत तर मरियेची भूमिका सुरक्षित वाटते. आत्मपरीक्षणः मी पाहुण्यांचे स्वागत कसे करतो / करते ? देवाला माझ्या जीवनात कोणते स्थान आहे ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सहवासाची आंतरिक ओढ आम्हाला लागावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या