Marathi Bible Reading | Monday18th July 2022 | 16th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १६ वा सप्ताह  

सोमवार १८ जुलै  २०२२


 “दुष्ट आणि व्याभिचारी पिढी चिन्ह मागते.”




'संत फ्रेडरिक

महागुरू आणि रक्तसाक्षी (८३८)


प्रभू येशूने केलेल्या अनेक चमत्कारांचा जवळून अनुभव घेतलेला 
असतांना सुद्धा शास्त्री - परुश्यांनी प्रभू येशू जवळ चिन्हाची मागणी केली. शास्त्री परुशी जसे प्रभू येशूच्या बाबतीत वागले तसेच आपण सुद्धा वागू शकतो. कारण बऱ्याचवेळी आपण| खऱ्याअर्थाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत.
 आपण आज चिंतन करीत असताना स्वत:ला प्रश्न विचारु या, मी खरोखरच प्रभू येशूला ओळखतो का? आपल्या घरात किंवा चर्चमध्ये आपण केवळ ख्रिस्ताचा क्रुस पाहतो. आतापर्यंत प्रभू येशूने आपल्या जीवनात कितीतरी चमत्कार केले आहेत, आज आपण ख्रिस्ताला पाहण्यासाठी व त्याचे प्रेम अनुभवण्यासाठी  श्रद्धेचे डोळे उघडू या आणि अंत:करण मोकळे करु या. प्रभूला अनुभवण्यासाठी अंतर्मूख बनू या.

✝️   
पहिले वाचन :मीखा  ६:१-४,६-८
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन

परमेश्वर काय म्हणतो ते ऐका :
ऊठ, पर्वतासमोर वाद कर; डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्यांच्या लोकांबरोबर वाद आहे, तो इस्त्राएलबरोबर वाद करणारा आहे. “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले ? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला इजिप्त देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले, मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन आणि मिर्याम यांना पाठवले.
मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू ? होमबली, एक वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय ?
हजारो एडके, तेलांच्या दशसहस्त्र नद्या, यांनी परमेश्वराला संतोष होईल काय ? माझ्या पापांबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय ? मी केलेल्या पापांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय ?
हे मनुष्या, बरे काय आणि तुझ्यापासून परमेश्वर काय अपेक्षितो ते त्याने तुला दाखविले आहे;
नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवाबरोबर राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो ?
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :५० : ५-६, ८- ९, १६-१७,२१.२३
प्रतिसाद :  जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.

१) ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे. 
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा. 
आकाश त्यांची न्यायपरायणता प्रकट करतो; 
देव स्वतः न्याय करणार आहे.

२) तुझ्या यज्ञसंबधाने तर मी तुला बोल लावीत नाही; 
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच 
तुझ्या घरचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले 
बोकड मी घ्यावयाचा नाही.

३) दुर्जनाला तर देव म्हणतो: 
माझे नियम जाहीर करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ? 
तू तर माझ्या शासनाचा तिरस्कार करतोस, 
माझी वचने मागे झुगारून देतोस.

४) असे तू केले तरी मी उभा राहिलो, 
मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले. 
तथापि मी तुझा निषेध करीन. 
मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन. 
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो. 
आणि जो सरळमार्गाने चालतो 
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.



जयघोष                                     योहान २०:२९
आलेलुया, आलेलुया !   
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास 
माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १२:३८-४२
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापैकी काहीजण येशूला म्हणाले; "गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना तीन दिवस आणि तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहिल. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देवाला काय आवडेल? देवाला संतुष्ट करण्यासाठी काय करावे ? असा प्रश्न संदेष्टा मीखा यांच्या काळातील लोक विचारतात. अशावेळी देवाला आपली यज्ञार्पणे व अर्पणे नको आहेत असं मीखा त्यांना सांगतो. देवाला तर आपण प्रत्येकांनी न्यायीपणाने वागणे, प्रेमळपणे प्रेम करणे व देवापुढे नम्रपणे चालणे अशा गोष्टीची अपेक्षा आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूचे विरोधक शास्त्री व परूशी हे चिन्हांची अपेक्षा करतात. येशू त्यांच्यापुढे जुन्या करारातील योना व शलमोन अशी दोन पात्रे सादर करतो. निनवेची प्रजा पापांनी भ्रष्ट झालेली होती. या निनवेकरासाठी योना दैवी दया दाखवण्याचे चिन्ह बनला. शलमोन राजा दैवी ज्ञानाचे चिन्ह बनला. प्रभू येशूला इथे हेच सांगायचे आहे की, देवाकडून आपण चिन्हांची अपेक्षा करू नये तर देवाने  दिलेल्या चिन्हांचा अर्थ समजत नाही व आपल्या पापी प्रवृत्तीपासून अलिप्त राहून पश्चात्ताप करण्याची अपेक्षा आपण देवाकडून बाळगायला हवी. निनवेकरांनी आपला चुकलेला मार्ग सुधारला व पश्चात्तापाची आस धरली. परमेश्वर चुकलेल्यांस सन्मार्ग दाखवितो. मी देवाकडून चिन्हांची अपेक्षा करतो की पश्चात्ताप करून देवाला शरण जातो / जाते ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, ये आणि आमच्या जीवनातील अविश्वास आणि संशयाची भींत पाडून टाक, आम्हाला तुझ्या सहवासाचा परिमळ स्पर्श दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या