सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
मंगळवार १९ जुलै २०२२
“येशू (आपल्या शिष्यांकडे) हात करून म्हणाला,"पाहा, माझी आई आणि माझे भाऊ"
जर्मनीच्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताच्या इ. स. ९२३ साली महागुरुंचा उत्तराधिकारी म्हणून उलरिक ह्यांची नेमणूक करण्यात आली.
आपल्या लोकांच्या आणि धर्मगुरूंच्या जीवनाची आध्यात्मिक पातळीउंचावण्यासाठी बिशप उलरिक स्वतः धर्मगुरूंना व लोकांना खाजगीत भेटत, त्यांच्यासाठी तपसाधना, अधिवेशने, परिषदा आणि खुल्या चर्चेचं आयोजन करीत असत. धर्मग्रामातील प्रशासन कसे सुधारता येईल, ख्रिस्तसभेच्या कायद्याचे होणारे उल्लंघन कसे टाळता येईल त्याविषयी चर्चा घडवून आणत. अपराधी व कायदेभंग करणाऱ्यांवर अगदी प्रेमाने कडक कारवाई करीत.
आपल्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचे पुनरुज्जीवन करीत असतानाच बिशप उल्टीक ह्यांनी शहराभोवती भक्कम तटबंदी उभारली. अनेक गावे आणि नगरे ह्यांचे पुनर्वसन केले. गरीब आणि निराश्रित ह्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. राजाला त्याच्या प्रशासनात उदार अंतःकरणाने सहाय्य केले.
.इ. स. ९७३ साली बिशप उल्ीक ह्यांचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांचे थडगे हे तीर्थयात्रेचे केंद्र बनले. अगदी थोड्याच अवधीत म्हणजे २० वर्षांनी ९९३ साली मोठ्या थाटामाटात बिशप उल्टीक ह्यांना संतपदाचा बहुमान देण्यात आला.
चिंतन : दिव्यातून तेल बाजूला काढले की ज्योत विझलीच म्हणून समजा. आध्यात्मिक जीवनातून प्रार्थना वजा केली की श्रद्धेची वातही हळूहळू मंदावत जाते. - संत उलरिक
आज प्रभू येशू जणू आपल्या सर्वांना सांगत आहे की, I जीवनात प्रथम स्थान देवाला व त्याच्या इच्छेला द्या.
देवाची इच्छा जाणण्यासाठी त्याची वचने वाचावी लागतील, ऐकावी लागतील व आत्मसात करावी लागतील. त्याच्या आज्ञा पाळून नीतिमत्तेने जीवन आचरण करावे लागेल. आपण प्रभूला जीवनात अग्रक्रम देऊन जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन :मीखा ७:१४-१५.१८-२०
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचनतू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोगराच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीनकाळच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलादात यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. तुजसमान देव कोण आहे ? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने आणि आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :८५ : २-८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आम्हांला तुझी दया दाखव.
१ हे परमेश्वरा,
तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस,
तू याकोबला बंदिवासातून परत आणले आहेस,
तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस,
त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस,
तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस,
तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.
२ हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण,
आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर..
तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय ?
पिढ्यान्पिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय ?
३ तुझे लोक तुझ्या ठायी हर्ष पावावेत म्हणून
तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय ? हे परमेश्वरा,
तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे,
आणि तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १२:४६-५०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.” तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ ?” आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, "पाहा, माझी आई आणि माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : वरील उताऱ्यात येशूचे पृथ्वीवरील आप्तस्वकीय व जे देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात त्यांच्याबद्दल माहिती पुरविली आहे. वरील उतारा हा येशूचे आईवडील व भाऊ बहिणी कोण यांच्याविषयी नसून तर येशूचे खरे कुटुंबीय म्हणून कोण ओळखले जातील याविषयी आहे. पृथ्वीवरील प्रेषितकार्यात प्रभू येशू जकातदार, पापी, रोगी पीडित अशा जमावाशी एकरूप झालेला होता. त्याचे नाते व्यापक बनलेले होते. देवाच्या कुटुंबाचा सभासद बनणे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे, त्याच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगणे. “जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई” या वचनातून आपण शिकू शकतो की प्रभू येशू आपलं कुटुंब केवळ रक्ताच्या आप्तस्वकीयापर्यंत मर्यादित ठेवित नाही तर व्यापक दृष्टीने कुटुंबाची व्याप्ती व्यक्त करतो. येशूविषयीचे शिष्यत्व हे केवळ शाब्दिक स्वरुपाचे नाही तर जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो त्यांच्यासाठी आहे. बाप्तिस्मा घेऊन आपण ख्रिस्त धारण केलेला आहे म्हणून आपण येशूचे कुटुंबीय बनू शकत नाही. तर जगाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहून दुसऱ्याप्रती प्रेम आपलुकी आपल्या शब्दाबरोबर कृत्यातसुद्धा दाखवायला हवी.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास व तुझी वचने पाळण्यास कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या