सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
बुधवार २० जुलै २०२२
संत एलायस आणि फ्लेवियन
- जेरुसलेम आणि अंत्युखियाचे पेट्रिआर्क (५१८)
देवाचे वचन ऐकून व देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्याला देवराज्यात प्रवेश मिळणार आहे. देवाने पेरलेले त्याचे जीवन देणारे बीज आपल्या जीवनात फलदायी बनत आहे का?
परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण करीत असतो. आपल्या जीवनाला चांगली फळे लागावीत म्हणजेच भरपूर पीक यावे ही देवाची इच्छा आहे. तरी सुद्धा आपली जमीन म्हणजेच जीवन आचरण कसे आहे व आपण देवाचे वचन कशा प्रकारे स्वीकारतो ह्यावर आज चिंतन करणे गरजेचे आहे. आपली जमीन म्हणजेच जीवन कोणात्या प्रकारचे आहे? देवाचे वचन विश्वसनीय आणि आपल्या जीवनाचे परीक्षण करुन आपल्याला फलदायी बनविणारे आहे, म्हणूनच, बायबल वाचन, मनन-चिंतन, ह्यासाठी आपण वेळ देऊ या
✝️
पहिले वाचन :यिर्मया १:१.४-१०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन निहल्कियाचा पुत्र यिर्मया याची वचने परमेश्वराचे वचन मला आले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले; मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” तेव्हा मी म्हणालो, “पाहा, प्रभू परमेश्वरा, पहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे." मग परमेश्वर मला म्हणाला, “'मी बाळ आहे' असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्यांच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस तू भिऊ नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो." तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला आणि तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. पाहा, उपटण्यास आणि विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास आणि पाडून टाकण्यास, बांधण्यास आणि लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर आणि राज्यांवर नेमले आहे.".
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :७१ : १-६,१५-१७
प्रतिसाद : माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील.
१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस.
तू आपल्या न्यायनीतीने, माझा उद्धार कर;
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.
२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून
माझ्यासाठी निवासाचा खडक हो;
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
कारण तू तर माझा गड आणि
माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा,
दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.
तूच माझे आशास्थान आहेस,
३)कारण हे प्रभो, परमेश्वरा,
माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
जन्मापासून तूच माझा आधार आहेस,
मातेच्या उदरातून जन्मल्यापासून
तूच माझा कल्याणकर्ता आहेस.
४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि
तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे
दिवसभर वर्णन करील. हे देवा,
माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत
आला आहेस आणि मी आजपर्यंत
तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १३:१-९
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजचे पहिले वाचन हे ईश्वरी पाचारणासाठी उपयुक्त वाटते. बऱ्याचदा गुरुदीक्षा साक्रामेत विधीसाठी या वाचनाची निवड केली जाते. देव स्वतः आपल्या हेतूपूर्तीसाठी योग्य त्या व्यक्तीची निवड करीत असतो. व्यक्ती स्वतःहून काही करीत नसते तर त्याची निवड देव करीत असतो. देवाने यिर्मयाला निवडल्यानंतर आपला वरदहस्त असा ठेवला की, "ऐकणे” व “आज्ञा पाळणे” याहून वेगळे काही यिर्मयाच्या हाती उरले नाही. दोन प्रकारची कामे देव यिर्मयाद्वारे पूर्ण करीत असतो. १) नकारात्मकः उपटण्यास व विध्वंस करण्यास. नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास. २) सकारात्मकः बांधण्यास व लागवड करण्यास. शुभवर्तमानात पेरणाऱ्याचा दाखला आपण ऐकला. याठिकाणी देखील कृती करणारा हा देव आहे. बी हे देवाचा शब्द आहे. ऐकणारे श्रोते आपण आहोत. देवाच्या शब्दाला प्रतिसाद देणे किंवा न देणे हे सर्वस्वी देवावर नाही तर आपल्यावर अवलंबून आहे. बरेच चांगले कार्य जे आपण करतो ते जरी वाया जात असले तरीही आपण मात्र निराश होता कामा नये. देवाने ठरविलेल्या वेळी व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य वेळी फळ प्राप्त होईल. आपण मात्र सतत कार्य करीत राहिले पाहिजे. संत इग्नेशियस लोयोलाकर म्हणतात, "जेव्हा आपण कार्य हाती घेतो तेव्हा जणूकाही सर्व आपल्यावरच अवलंबून आहे या भावनेने कार्य करायला हवे, व जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा अजूनही सर्व यश देवावरच अवलंबून आहे या भावनेने प्रार्थना करायला हवी.”
प्रार्थना : जीवन फलदायी बनविणारे तुझे वचन आत्मसात करण्यास व जीवनरुपी बाग फलद्रूप होण्यास हे प्रभो, आम्हाला कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या