Marathi Bible Reading | Thursday 21st July 2022 | 16th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १६ वा सप्ताह  

गुरुवार २१ जुलै २०२२

 धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. 


ब्रिन्डीसीचे संत लॉरेन्स 
- वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित (१५५९-१६१९)

  इ. स. १६०२ साली त्यांना कंप्युचिन संघाने जनरलपदी निवडून दिले. तीन वर्षे त्यांनी जनरल पदाची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली. परंतु तीन वर्षांनी त्यांची फेरनिवड झाली तेव्हा त्यांनी त्या निवडीस नम्रपणे नकार दिला.
इ. स. १५७१ साली लिपान्टो येथे झालेल्या युद्धात तुर्कीच्या सागरी फौजेचा युरोपने पूर्णपणे पाडाव केला होता. मात्र पुढे १५९५ साली सुलतान मोहमद तिसरा ह्याने हंगेरीच्या बहुतांश भागावर वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. त्यामुळे हळूहळू तुर्कस्थानच्या साम्राज्याचा विस्तार होत होता.
सैनिकांचे नेतृत्व स्वत: संत लॉरेन्स ह्यांनी केले. आपल्या हातात क्रूस घेऊन सर्वांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने चालणात्या लॉरेन्सकडे पाहून त्याच्या सैनिकांना स्फूर्ती मिळाली. त्यांचा आवेश पाहून तुर्की सैन्य युद्धभूमीवरून सुसाट वेगाने पळत सुटले.
काही वर्षांनी इ. स. १६०५ साली पोप महाशयांनी लॉरेन्स ह्यांना जर्मनीत पाठविले तेव्हा त्याने आपल्या स्वतःच्या समर्पित वृत्तीने आणि असंख्य चमत्कारांनी अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणले. लॉरेन्स २२ जुलै १६१९ साली मरण पावले आणि १८८१ साली त्यांना संतपद आणि धर्मपंडित ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
आज प्रभू येशू म्हणत आहे, 'ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल'. म्हणजेच ज्यांना वचन ऐकण्याची व आत्मसात करण्याची ईच्छा आहे  त्यांना विपुल प्रमाणात कृपादान मिळेल. देवाचे वचन ऐकण्याची संधी | आपल्याला अनेकवेळा लाभते मात्र बऱ्याचवेळा आपण कान असून बहिरे आणि डोळे. असून आंधळे बनलेले असतो. देवाचे वचन आपण लक्षपूर्वक ग्रहण करण्यास तयार असले पाहिजे. प्रभू येशू आपल्या सर्वांना सार्वकालिक  जीवनाचे वरदान देऊ इच्छित आहे, परंतु आपली उपासना व भक्ती कर्मकांडापुरातीच मर्यादित न राहता आपण देवाच्या शब्दाची साक्ष आपल्या जीवनाद्वारे इतरांना देण्याचा प्रयत्न करायला हवा. देवाचे वचन वाचून लक्षपूर्वक व जाणीवपूर्वक त्याच्यावर मनन-चिंतन करु या.

✝️   
पहिले वाचन :यिर्मया २:१-३,७-८, १२-१३
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “माझ्या लोकांनी मला सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. "

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की, “जा, हे पुकारून येरुशलेमच्या कानी घाल. तुझे तारुण्यातले प्रेम, वाड्. निश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग आणि रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे यांचे मला स्मरण आहे. इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असे होता. त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”
“मी तुम्हाला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी आणि तिची संपत्ती उपभोगण्यासाठी आणले. पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे. 'परमेश्वर कोठे आहे' असे याजक म्हणाले नाहीत आणि धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही; अधिपतीही माझ्यावरच उलटले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.
हे आकाशा, हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो; कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले: मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :३६ : ६-११
प्रतिसाद :  प्रभो, जीवनाचा झरा तुझ्याठायी आहे.

१) हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य
 आकाशापर्यंत पोहोचले आहे; 
तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. 
तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे, 
तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत.

२) हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! 
मानवजात तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेते!
 तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल 
आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.

३) कारण जीवनाचा झरा तुझ्याठायी आहे, 
तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. 
तुला ओळखणाऱ्यांना तुझे वात्सल्य, 
सरळ मनाच्या लोकांना तुझे नीतिमत्व लाभू दे.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड 
आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १३:१०-१७
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही."
शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, "आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?" त्याने त्यांना उत्तर दिले, "स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यानी बोलतो, कारण ते पाहात असता पाहात नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा -
'तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. ह्यासाठी त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानानी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये."
पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास सत्य सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहायला पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आजची दोन्ही वाचने देवाचा मार्ग व मानवाने त्याला दिलेला प्रतिसाद यावर प्रकाशझोत टाकत आहे. यिर्मयाच्या काळात देवाचे निवडलेले लोक हे देवापासून दूर गेले व अन्य देव दैवताची पूजा करू लागले. देवाने त्यांना सुपिक जमिनीवर आणले व त्यांनी सर्वकाही अमंगळ केले. त्याचे जीवन पाणी नसलेल्या एखाद्या नदीसारखे किंवा ओसाड अरण्यासारखे वाटू लागले. शुभवर्तमानात येशूची वचने किंवा शिकवणूक लोक ग्रहण करू शकले नाही कारण ते कठोर अंतःकरणाचे बनले होते. येशूच्या शिष्यांनी येशूवर विश्वास ठेवला व त्याच्या शिकवणुकीला अग्रक्रम दिला म्हणून ते धन्य झाले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे मानव खूप काही करू शकतो किंवा त्याने उंच भरारी मारली आहे. मात्र खूप अशा गोष्टी आहेत की, त्या मानवाच्या हाती नाहीत त्या आपण समजू शकत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. मात्र आपल्या जवळच्या शेजाऱ्याबरोबर आपण त्यांच्याशी का सलोखा करू शकत नाही? देव आपल्याला त्याचा सन्मार्ग दाखवतो, मी देवाच्या मार्गाला कसा प्रतिसाद देतो / देते ?
प्रार्थना : हे प्रभू येश, तुझ्या दिव्य वाचनांनुसार जीवन आचरण करण्यास व तुझे रहस्यमय वैभव अनुभवण्यास मला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या