सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
शुक्रवार २२ जुलै २०२२
“त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.”
पश्चात्तापी (.....८४)
गालील समुद्राच्या किनारी तिबिर्याच्या जवळ माग्दाला नावाचे गाव वसलेले होते. त्या गावाच्या नावावरून मरिया हिला माग्दालेन हे आडनाव मिळाले असावे. प्राचीन ख्रिस्त सभेतील एका रूढ परंपरेनुसार पापी स्त्री-मरिया ही बेथानी येथल्या लाझरस व मार्थाची बहीण मरिया किंवा मरिया माग्दालिया असावी असे मानले जाते. ह्याच मरियेमधून आपल्या प्रभू येशूने सात भूते (सात भयानक पापप्रवृती किंवा सर्व प्रकारच्या विकृती) काढलेली होती. ह्या पापी स्त्रीने येशूला तैलाभ्यंग केला होता.
नव्या करारातील शुभवर्तमानात मरिया माग्दालिया म्हणजे नक्की कोणती स्त्री ह्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे पौर्वात्य ख्रिस्तसभेत तीन वेगवेगळ्या मरिया नामक स्त्रियांचा सन्मान केला जातो. मरिया माग्दालिया, बेथानीची मरिया आणि पापी स्त्री- मरिया. संत योहान लिखित शुभवर्तमानानुसार येशूच्या चरणांना तैलाभिषेक करणारी पापी स्त्री ही मार्थाची बहीण, बेथानी येथली मरिया असावी. एकदा येशू तिच्या घरी आलेला असताना मार्था बऱ्याच गोष्टींविषयी दगदग व काळजी करीत होती. परंतु मरिया मात्र प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे म्हणणे ऐकत होती.
मरिया माग्दालिया ही प्रभू येशूच्या क्रुसाजवळ उभी राहिली होती. तिने येशूचे दु:खसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. येशूच्या पुनरुत्थानाची ती प्रथम साक्षीदार होती. कॅथलिक ख्रिस्तसभेने तिला चिंतनशील स्त्रियांचा आदर्श म्हणून गौरविलेले आहे. संत मेरी माग्दालेन एफसस येथे मरण पावली असावी. मात्र एका प्राचीन दंतकथेनुसार मार्था, मरिया व लाझरस ह्या तिघांनी फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात सुवार्ताप्रसार केला असे मानले जाते.
✝️
पहिले वाचन :शलमोनाच्या गीतरत्न ३:१-४
वाचक : शलमोनाच्या गीतरत्नातून घेतलेले वाचन "माझा प्राणप्रिय मला भेटला. "
वधू म्हणते : रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली. मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून आणि गल्ल्यांतून करावा. मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे गस्तवाले मला भेटले, मी त्यांना विचारले, "माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय ?" त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तो माझा प्राणप्रिय मला भेटला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले
वाचन ५ : १४-१७
"जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.'
ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वासाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्टया ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :६३ : २-६,८-९
प्रतिसाद : प्रभो, माझ्या देवा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.
१) हे देवा, तू माझा देव आहेस,
मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क रुक्ष आणि निर्मल प्रदेशात
जीवन तुझ्यासाठी तहानलेले आहे,
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
२) अशा प्रकारे तुझे बळ आणि वैभव
पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुझे स्तवन करतील.
३) मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद देईन,
तुझ्या नामाने मी आपले हात उभारीन.
मज्जेने आणि मेदाने व्हावा तसा
माझा जीव तृप्त होईल आणि
माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
४) कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस,
म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत
मी आनंद करीन. मी तुझी कास धरली आहे,
तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मरिया आम्हांस सांग, तू वाटेत काय पाहिलेस ?
जिवंताला बंदिस्त करणारे थडगे आणि
पुनरुत्थित ख्रिस्ताचे वैभव मी पाहिले,
आलेलुया!
शुभवर्तमान योहान २०:१-२,११-१८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?"
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया माग्दालेना कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, "त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही."
मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस ?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, "बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस ?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरिये.” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, "रब्बूनी !” (म्हणजे गुरुजी). येशूने तिला म्हटले, "मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” मरिया माग्दालेना गेली आणि “आपण प्रभूला पाहिल्याचे" व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांस कळवले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आज संत मरिया माग्दालेना हिचा सण साजरा केला जातो. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार म्हणून ख्रिस्तसभा तिला सन्मानित करते. संत योहान ह्याने येशूचा जवळूनअनुभव घेतला होता. योहानाप्रमाणे संत मरिया माग्दालेना हिने देखील आपल्या प्रभू येशूचे दुःखसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. अशी माहिती ख्रिस्तसभेची परंपरा आपल्याला पुरविते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच प्रभूच्या मृत शरीराचा शोध करीत मरिया बाहेर पडली होती. एखाद्या आईचा मुलगा तिच्यापासून हरवला जातो तेव्हा ती बैचेन होते, मन व्याकुळ होतं व सर्वत्र ती शोधाशोध करते तसं मरियेचं झालं होतं. पुनरुत्थानाच्या भल्या पहाटे देखील मरिया माग्दालेना निराश अंतःकरणाने प्रभू येशूचा शोध करीत होती. मरियेची येशूवर निष्ठा होती. रिकामी कबर जेव्हा तिला आढळते तेव्हा ती धावत पळत शिष्यांना ही सुवार्ता देते. येशू जिवंत झाला आहे ही सुवार्ता तिने शिष्यांना दिली तरीसुद्धा मरिया त्याबद्दल स्वतःचा गवगवा करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना देताना माझ्यात मरिया माग्दालेना प्रमाणे येशूबद्दल निष्ठा, त्याग व कार्य करण्याची तळमळ दिसते का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा सहवास राहून तुम्ही वचने ग्रहण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या