Marathi Bible Reading | Saturday 23 rd July 2022 | 16th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १६ वा सप्ताह  

शनिवार  २३ जुलै २०२२

 'नाही; तुम्ही निंदण गोळा करताना कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; 


  
स्वीडनची संत ब्रिजेट 
-विधवा (१३०३-१३७३)


आजच्या शुभवर्तमानात शेतातील निंदणाचा दृष्टांत देऊन प्रभू येशू  देवराज्याविषयी शिकवण देत आहे. शेतातील चांगले बीज म्हणजेच देवाचे  वचन जे माणसाच्या अंतःकरणात पेरले जाते. देवाचे वचन आपल्याला  सकारात्मकतेने जीवन आचरण करण्यास प्रेरणा देत असते. मात्र त्यामध्ये ! उगवणारे निंदण म्हणजेच मोह, स्वार्थ आणि दुष्टपणा यामुळे जीवनात नकारात्मकता वाढत असते. पावित्र्य, परोपकार आणि सकारात्मकतेचा भाव  जीवनात जोपासण्यासाठी देवाच्या वचनाचे बीज आपल्या जीवनात अंकुरीत  झाले पाहिजे.
आज अनेक व्रतस्थ व प्रांपचिक स्त्रिया निरनिराळ्या क्षेत्रात प्रभू येशूचे सेवाकार्य  करीत आहेत. संत मरिया माग्दालेनाचा आदर्श समोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व स्त्रियांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करु या.

✝️   
पहिले वाचन : यिर्मया ७:१-११
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझे नाव दिलेले हे मंदिर लुटारूंची गुहा झाली आहे काय ?"

 यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले: “परमेश्वराच्या मंदिरदारात उभा राहा आणि हे वचन जाहीर कर: यहुदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या दारांनी आत जाता ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, आपले मार्ग आणि आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. 'हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर' असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका.
जर तुम्ही आपले मार्ग आणि आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल, परका, पोरका आणि विधवा यांस जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुकरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुगे दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन.” “पाहा, ज्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता हे काय ? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलच्या मूर्तीला धूप दाखवता आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता आणि 'आमची मुक्ती झाली आहे' म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करायला आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाली आहे काय? पाहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे,” असे परमेश्वर म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ८४:३,४,५ - ६इ. ८अ.११
प्रतिसाद : हे सेनाधीश परमेश्वरा, तुझे निवासस्थान किती रम्य आहे!

१) माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची
 उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. 
माझा जीव आणि माझा देह जिवंत देवाला
 हर्षानं आरोळी मारत आहेत.

२) हे सेनाधीश परमेश्वरा,
माझ्या राजा, माझ्या देवा, 
तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे करायला
 आणि निळवीला आपल्या पिलांसाठी घरटे
 बांधायला स्थळ मिळाले आहे.

३) तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता !
 ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील.
 ज्या मनुष्यांना तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते ते केवढे धन्य !
त्यांची शक्ती अधिकाधिक वाढत जाते. 

४) खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस 
हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे.
दुष्टपणाच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या
घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करतो, 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १३ : २४-२०
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या.'
येशूने लोकसमुदायापुढे दुसरा एक दाखला मांडला; “कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तेव्हा निंदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासानी येऊन त्याला म्हटले, 'महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना ? तर मग त्यात निंदण कोठून आले?' तो त्यांना म्हणाला, 'हे काम कोण्या वैऱ्यांचे आहे.' दासांनी त्याला म्हटले, 'तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय ?' तो म्हणाला, 'नाही; तुम्ही निंदण गोळा करताना कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेला मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, आणि गहू माझ्या कोठारात साठवा.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देवाने आपणाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवले असून आपण नेहमीच त्या देवाकडे आकर्षित व्हायला हवे. परंतु ज्या जगात आपण वास्तव्य करतो ते जग बरे व वाईट या दोन्ही गोष्टींनी भरून गेलेले आहे. कधी कधी आपण जे देवाकडे आकर्षिलेले आहोत ते नकळत त्याच्यापासून बहकून जातो म्हणजेच दुष्टाईकडे फेकले जातो. यिर्मयाच्या काळात देखील चित्र असेच होते। याबद्दल आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगते. आपली परमेश्वरावरील दृढ निष्ठा लक्षात ठेऊन आपले कुमार्ग सोडून देऊन सन्मार्ग स्वीकारण्यासाठी यिर्मया लोकांना आमंत्रण देतो. शुभवर्तमानातील दाखल्यात शेतात आपल्याला चांगले बी व निंदणदेखील आढळतात. या दाखल्याद्वारे जे चांगले आहे ते स्वीकारण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आलेले आहे. जे दुष्ट व वाईट त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ वाईटाला सामोरे जाताना आपण निष्क्रीय होणे असे नाही तर बऱ्या वाईटांचे ज्ञान करून देणारा सुज्ञपणा जीवनात वाढविणे आवश्यक आहे. मी माझ्या जीवनात देवाकडे आकर्षित असतो की वाईट गोष्टीकडे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा सहवास राहून तुम्ही वचने ग्रहण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या