सामान्यकाळातील १७ वा रविवार
२४ जुलै २०२२
कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
सोदोम आणि गोमोरा ह्या पापी व भ्रष्ट झालेल्या शहरांचा विध्वंस करण्याचे परमेश्वराने ठरवले असताना आब्राहामाने मध्यस्थीची प्रार्थना व याचना केली. परमेश्वराने ती ऐकली व त्यांस अभय दिले .
प्रभू येशू आज आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवित असतानाच आपली आग्रही प्रार्थना फलदायी बनते ह्याचा दृष्टांत संदेश देत आहे. 'हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो.' हीच ती प्रार्थना ख्रिस्ती माणसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या प्रार्थनेवर आपण आज चिंतन करु या.
दररोजच्या अन्नासाठी आपण| देवाकडे विनंती करतो. आपल्या परस्परसंबंधात आपण उणे पडू नये म्हणून आपल्या अपराध्यांना क्षमा करीत असताना आपण देवाकडे स्वतःसाठी क्षमेची याचना करतो. हे जग अनेक प्रकारच्या दुष्टाईने भरलेले आहे, वाईटापासून आपले रक्षण व्हावे ह्यासाठी आपण देवाला साकडे घालतो. म्हणूनच सर्व |आपल्या नित्याच्या प्रार्थनेत खंड पडू नये व आपण सर्वदा परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकावे, म्हणून प्रार्थनेला आपल्या जीवनात प्राधान्य देऊ या. तसेच परस्परांसाठी मध्यस्थी करु या.
✝️
पहिले वाचन :उत्पत्ती १८:२०-३२
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन "मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा."
परमेश्वर म्हणाला, “सदोम आणि गमोरा यांच्याविषयींची ओरड फारच झाली आहे आणि खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयींची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.”
तेथून ते पुरुष वळून सदोमकडे चालते झाले; पण आब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला आब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, "तू दुर्जनाबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय ? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय ? त्यांच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय ? या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय ?" परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.” आब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय ?” तेव्हा तो म्हणाला, "मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्यांचा नाश करणार "नाही." त्याने पुन्हा म्हटले, "तेथे कदाचित चाळीसच आढळले. तर?" तो म्हणाला, "त्या चाळीसांकरिता मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, "मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?" तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर ?” तो म्हणाला, “त्या वीसांकरिता मी त्यांचा नाश करणार नाही.” तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतोः तेथे कदाचित दहाच आढळले तर ?” तो म्हणाला, "त्या दहांकरिता त्याचा नाश करणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :१३८:१-३,६-८
प्रतिसाद : प्रभो, मी तुझा धावा केला, तो तू त्याच दिवशी ऐकला.
१)मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन
देवदूतांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन.
२) तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे
मी तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन;
कारण तू आपल्या संपूर्ण नामापेक्षा
आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला;
तू मला हिम्मत दिली तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त झाले.
३) परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो;
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस;
माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस.
४) तुझा उजवा हात माझा बचाव करतो,
परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल;
हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे;
तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.
दुसरे वाचन कलस्सै २: १२-१४
वाचक: पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने आपल्या सर्व अपराधाची क्षमा करून आपल्याला त्यांच्याबरोबर जिवंत केले आहे."
तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेले आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृती वरील विश्वासाच्याद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी आणि देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्यांच्याबरोबर जिवंत केले, देवाने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली; आपल्याविरूद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रुसाला खिळून त्याने ते रद्द केले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे;
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ११:१-१३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल."
येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, "प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणाः
'हे पित्या तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस."
मग त्याने त्याला म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, 'मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही' आणि तो आतून उत्तर देईल, 'मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; तर उठून तुला देऊ शकत नाही.' मी तुम्हांला सांगतो, तो तुमचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला जितके पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोणी बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाइट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल ?"
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : परमेश्वराबरोबर आपले जे नाते असते त्याचा प्रभाव आपल्या प्रार्थनामय जीवनावर पडत असतो. आजची वाचने ह्या नात्याविषयी तीन महत्त्वाची चिंतने सादर करतात.
अ. परमेश्वराशी असलेले उचित नाते आपला आत्मविश्वास वाढवितेः : आजच्या पहिल्या वाचनात आब्राहाम सदोम व गमोरा ह्या पातकी, भ्रष्ट शहरांच्या वतीने परमेश्वराकडे मध्यस्थी करतो. एकीकडे दुष्टांचा नाश करताना सज्जन त्यात नाहीसे होतील ही भीती तर दुसरीकडे अगदी थोड्याशा सज्जनांसाठी संपूर्ण शहराला जीवनदान देण्याची परमेश्वराची तयारी अशा द्विधा मनःस्थितीत असतानाच आब्राहाम देवाशी असलेले आपले घनिष्ठ नातेसंबंध सूचित करतो.
ब. देवाशी असलेले उचित नाते आपली श्रद्धा दृढ करतातः आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल कलस्सैकरांनी जागतिक मोहावर विजय मिळविण्यासाठी “प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे म्हणून आवाहन करतो. त्यांनी बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे मिळालेली श्रद्धा भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे तो सूचवितो.
क. देवाशी असलेले उचित ते आपल्याला प्रार्थनेत टिकण्यास साहाय्य करते: आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना प्रार्थनेत जिद्द आणि सातत्य आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्गदर्शन करतो. त्यासाठी त्यांनी परमेश्वर आपला प्रेमळ पिता आहे. तो एखाद्या मित्राला मदत करावी तसे आपल्याला साहाय्य करतो यावर दृढ श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे असे शिकवितो.
आत्मपरीक्षण : परमेश्वराशी माझे कोणते नाते आहे ? त्याचा परिणाम माझ्या प्रार्थनामय जीवनात कसा दिसून येतो ?
क. देवाचे स्वागत एक पाहुणा म्हणून नव्हे तर आपला स्वामी म्हणून करावे : आजच्या शुभवर्तमानात मार्था येशूचे स्वागत एक पाहुणा म्हणून तर मरिया त्याचे स्वागत आपला गुरु म्हणून करते. मार्था येशूच्या शारीरिक भुकेसाठी कष्ट घेऊ पाहते. येशूला मात्र तिच्या आध्यात्मिक भुकेची काळजी वाटते. मार्थाची भूमिका डळमळीत तर मरियेची भूमिका सुरक्षित वाटते. आत्मपरीक्षणः मी पाहुण्यांचे स्वागत कसे करतो / करते ? देवाला माझ्या जीवनात कोणते स्थान आहे ?
प्रार्थना : हे आमच्या स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना सावकाश व अर्थपूर्ण करावी, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या