Marathi Bible Reading | Monday 25th July 2022 | 17th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १७ वा सप्ताह  

सोमवार  २५ जुलै २०२२

 जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल 

  संत जेम्स (थोरला याकोब), 
प्रेषित, रक्तसाक्षी (६३)

जेम्स आणि त्याचा धाकटा भाऊ जॉन (शुभवर्तमानकार) ही गालील सरोवराजवळ मासेमारी करणाऱ्या जब्दी ह्या श्रीमंत कोळ्याची मुले होती. त्यांच्या आचे नाव सलोमी असे होते. काही इतिहासकारांच्या मते ही पवित्र मरीयेची बर्हण होय. जेम्स आणि जॉन (याकोब आणि योहान) ह्यांच्या भांडखोर स्वभावावरून त्यांना 'गर्जनेचे पुत्र' असे म्हटले जाई.
येशू गालील समुद्राच्या किनाऱ्यावरून जात असताना जब्दीची ही दोन्ही मुले आपल्या वडिलांना आपल्या चाकरांसह मासेमारी करण्यास मदत करीत होती. शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रेया ह्यांच्याबरोबर त्यांची मासेमारी व्यवसायात भागीदारी होती. ह्या चारही मुलांना प्रभू येशूने आपल्या १२ शिष्यांमध्ये विशेष स्थान दिलेले होते. त्यामुळेच की काय, जब्दीच्या मुलांच्या आईने येशूकडे अशी विनंती केली होती की, त्याने आपल्या मुलांना त्याच्या राज्यात एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे बसण्याचा मान दयावा.
पेत्र, याकोब आणि योहान (बऱ्याच वेळा हे तीन शिष्य विश्वास, आशा आणि प्रीती यांची प्रतिके मानली जातात). ह्या तिघांनाच ख्रिस्ताने आपल्या जीवनातील अगदी महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याबरोबर घेतले होते. येशूचे डोंगरावरील रुपांतर, याईराच्या कन्येला मरणातून जिवंत करणे आणि गेथशेमानी बागेतील प्रार्थनेच्या वेळी हे तीन शिष्य येशूला सोबत करीत होते.
ख्रिस्तसभेच्या प्रारंभीच्या काळात जेव्हा ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू झाला तेव्हा हेरोद अग्रीप्पा पहिला ह्याने इ. स. ४२ साली याकोबला तुरुंगात टाकले. कारण याकोब त्यावेळी ख्रिस्ती धर्मप्रचाराचा आणि वाढत्या ख्रिस्तसभेचा एक मुख्य आधारस्तंभ मानला जात होता. हेरोदने त्याचा शिरच्छेद केला. इतकेच नव्हे तर इ. स. २०५ साली लेखन करणाऱ्या आलेक्झांड्रियाचे संत क्लेमेंट ह्यांच्या मते याकोबला ज्या माणसाने पकडून हेरोदसमोर आणले होते त्याच माणसाने मरतेसमयी याकोबाचे धैर्य व विश्वास पाहून ख्रिस्ती धर्म स्वीकारला अणि मरणाला मिठी मारली.
नवव्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार संत याकोबने म्हणजेच जेम्स ह्याने स्पेनमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला. मरणानंतर त्याचे प्रेत कॉम्पेसेला येथे आणण्यात आले. तिथे 'सांत लागो' नामक त्याच्या नावाने उभारले महामंदिर मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्माचे मोठे पावन तीर्थक्षेत्र बनले. अज मात्र ह्या तीर्थक्षेत्राला यात्रेकरू म्हणून भेट देण्यास केवळ पोप महाशयच एखाव्या श्रद्धावंताला परवानगी देऊ शकतात.
संत जेम्स हा स्पेन, चिली ह्या देशांचा तसेच यात्रेकरू आणि जलप्रवारी ह्या लोकांचा आश्रयदाता संत मानला जातो. युद्धसमयी त्याचा धावा केला जातो.
✝️   
पहिले वाचन : २ करिंथकरांस ४ : ७-१५
वाचन :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही येशूचा वध सर्वदा शरिरात वागवतो."

आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, ह्यावरून परमसामर्थ्य आमचे नव्हे तर देवाचे आहे हे सिध्द होते. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही, आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही, आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही, आम्ही येशूचा वध सर्वदा शरिरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरिरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरिता सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या सर्व मर्त्य देहात प्रकट व्हावे. आम्हांमध्ये मरण, पण तुम्हांमध्ये जीवन आपले कार्य चालवते.
"मी विश्वास धरला म्हणून बोललो," ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील आणि तुमच्याबरोबर सादर करील. सर्व काही तुम्हांकरिता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १२६ : १-६
प्रतिसाद : जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षानि कापणी करतील.

१) सीयोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा
परमेश्वराने परत आणले 
तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले. 
तेव्हा आमचे मुख हास्याने आणि 
आमची जीभ जयघोषाने भरली.

२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
"परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत" 
परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. 
त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.

३) हे परमेश्वरा, नेगेव येथील ओढ्यांप्रमाणे 
आम्हांला बंदिवासातून परत आण. 
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात 
ते हर्षाने कापणी करतील. 

४) जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे,
 ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय २० : २०-२८
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"माझा प्याला तुम्ही प्याल."

जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, "तुला काय पाहिजे ?" ती त्याला म्हणाले, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.” येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय ?" ते त्याला म्हणाले, “पिता येईल.” त्याने त्यांना म्हटले, "माझा प्याला, तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिध्द केला त्याच्यासाठी तो आहे." ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला.
पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, "परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : येशूच्या अंतर्वर्तुळात पेत्र, याकोब आणि योहान ह्या तिघांना स्थान होते. ख्रिस्तसभेच्या शिकवणीनुसार ह्या तिघांनाच येशूने आपल्या जीवनातील अगदी अतिमहत्त्वाच्या प्रसंगी आपल्याबरोबर घेतले होते. येशूचे रुपांतर व गेयसेमनी बागेतील प्रसंगावेळी हे तीन शिष्य येशूच्या सोबत होते. आज आपण संत याकोब म्हणजेच संत जेम्स ह्याचा सण साजरा करतो.. याकोब व योहान यांना प्रभूने १२ शिष्यांमध्ये विशेष स्थान दिलेले होते. त्यामुळेच की काय त्यांच्या आईने येशूच्या राज्यात त्यांना महत्त्वाचे स्थान मिळावे अशी मागणी केली. प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलाचं भविष्य उज्वल व्हावे. त्या अर्थाने तिने केलेली विनंती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने रास्त होती. मात्र येशू आपल्या राज्यात दुसऱ्याकडून करून घेण्यापेक्षा स्वतः दुसऱ्याच्या सेवेस धावतो. “मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करावयास आलेलो आहे.” याकोबाच्या आईच्या विनंतीनुसार तिच्या मुलांना मुकुट हवा होता परंतु क्रुस नको होता. त्यांना किंमत मोजायची तयारी न करता येशूच्या राज्यात उच्चस्थानी बाल्कनीत जागा हवी होती. कडू दुःखाच्या प्याल्याला स्पर्श न करता त्यांच्या गुरुला धक्का द्यायचा होता. आज आपल्यासाठी सुद्धा एक संदेश आहे. “जर आपण क्रुसाविना येशूकडे पाहिले तर आपल्याला येशूविना क्रूस सापडेल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या प्रेमाचा व सेवेचा अंकूर माझ्या अंतःकरणात वाढीस  लाव आणि तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन,


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या