सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
मंगळवार २६ जुलै २०२२
- पवित्र मरियेचे मातापिता (पहिले शतक) नव्या करारातील शुभवर्तमानांमध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेचे मातापिता कोण होते ह्याचा उल्लेख आलेला नाही. मात्र दुसऱ्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार पवित्र मरियेच्या आईचे नाव आन्ना (कृपा) असे होते आणि वडिलांचे नाव जोकिम (देव तयारी करतो) असे होते. मरिया हे या दांपत्याला त्यांच्या म्हातारपणी झालेले अपत्य होते आणि ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ होते असे मानले जाते. कारण दोघेही वयातीत असून निःसंतान होती.
संत आन्ना ही येशूची 'आजी' होती, हे सत्य पौर्वात्य ख्रिस्तसभेत चौथ्या शतकात आणि पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत आठव्या शतकात लोकांच्या भक्तीचा विषय बनले आणि चौदाव्या शतकात तर ते संपूर्ण जगभरच्या भक्तीमध्ये सामावले गेले. इ. स. १५४८ साली विश्वव्यापी ख्रिस्तसभेत त्यांचा सण समाविष्ट करण्यात आला. प्रसूतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांची ती आश्रयदाती संत म्हटली जाते.
जोकिम हे पवित्र मरियेचे पिता अत्यंत धार्मिक होते. एका प्राचीन दंतकथेनुसार ते मूळचे गालिली येथील होते. तेथून ते येरुशलेम येथे आले आणि तिथेच मरण पावले. त्यांच्या राहत्या घराशेजारीच त्यांना पुरण्यात आले. पुढे हेल्लेना या राणीने (सण १८ ऑगस्ट) त्यांच्या थडग्यावर संत जोकीम व आन्ना ह्यांच्या स्मरणार्थ एक चर्च बांधले. तिथून त्यांची भक्ती फोफावत गेली.
ख्रिस्तसभा आज संत ज्योकिम व संत आन्ना ह्या धन्य कुमारी मरियेच्या पालकांचा सन्मान करीत आहे. परमेश्वराने प्रत्येक माता-पित्याला संतान प्राप्तिचे वरदान दिलेले आहे. जन्मदाते मातापिता परमेश्वराचे वरदानाचे| भागिदार आहेत, म्हणजेच परमेश्वरानेच आपल्याला आपल्या माता-पित्याचे वरदान दिलेले आहे. संत ज्योकिम व आन्ना ह्यांचा सन्मान करीत असताना आपण आपल्या मात्या-पित्यांच्या सन्मान करु या. अनेकदा आपण आपले मात-पिता गृहित धरतो. मात्र त्यांच्या कष्टामुळे आणि प्रेमामुळेच आपण आज मोठे झालो आहोत.
✝️
पहिले वाचन : यिर्मया १४:१७-२२
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे परमेश्वरा, आमची आठवण ठेव आणि तुझा आम्हांशी केलेला करार मोडू नकोस."
"तू त्यांना हे वचन सांग: माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छित्रभित्र झाली आहे. मी वनात जातो तो तेथे तरवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तो दुष्काळाने पीडलेले मला आढळतात. कारण संदेष्टे आणि याजक हे अज्ञात देशांत भटकत आहेत."
तू यहुदाचा अगदी त्याग केला आहेस काय ? तुझ्या जिवाला सियोनचा वीट आला आहे काय ? आम्ही बरे होऊ नये, इतके तू आम्हांला का मारले आहेस ? आम्ही शांतीची अपेक्षा करतो, पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तो पहा दहशत.
हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस;तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आम्हांशी केलेला करार आठव, तो मोडू नकोस;
विदेशांच्या निरुपयोगी दैवतांमध्ये कोणी पर्जन्य देणारी
आहेत काय ? आकाशाला वृष्टी करता येईल काय ?
हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना ? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ७९:८-९,११,१३
प्रतिसाद : हे देवा, तू आम्हांला सहाय्य कर.
१ आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस.
तुझी करूणा आमच्यावर सतत राहो,
कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.
तू आपल्या नामाच्या थोरवीसाठी आम्हांला सहाय्य कर.
२) हे आमच्या उद्धारक देवा,
आपल्या नामाकरिता आम्हांला सोडव
आणि आमची पापे धुवून टाक.
३ )बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो;
ज्यांचा वध करण्याचे ठरवले आहे
त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव.
मग जे आम्ही तुझी प्रजा आणि
तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्वकाळ
तुझे उपकारस्मरण. करीत राहू.
तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत जाऊ.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा !
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १३ : ३६-४३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. "
येशू लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा." त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दुतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : हे जग बऱ्या वाईटांनी भरलेलं आहे. नीतिमान व अनीतिमान, पवित्र व पापी, प्रामाणिक व अप्रामाणिक इत्यादी प्रकारच्या लोकांनी या जगात आपली स्वतःची प्रतिमा केलेली आहे. यिर्मयाच्या काळातील लोक हे परमेश्वराकडून व इतर देव दैवतांकडे त्यांच्यासाठी कृपा मागत होते. त्यांच्यात प्रामाणिकपणा व विश्वासूपणा यांचा अभाव असल्याने त्यांच्या जीवनात अधोगती दिसून येत होती. त्यामुळे परमेश्वर असूनदेखील त्यांना शांतीची उणीव जाणवत होती. शुभवर्तमानात प्रभू येशू निंदणाचा दाखला स्पष्ट करताना सांगत आहे की, शेतात पेरलेले बी म्हणजे हे संपूर्ण जग आहे. देवाने जरी जगात चांगले बी पेरले तरीसुद्धा सैतान आपली करामत करायला काही कमी नाही. विश्वासूजण हे चांगल्या बियांचे प्रतिक आहे तर अविश्वासू हे निंदणाचे प्रतिक आहे. न्यायाच्या दिवशी नीतिमान व अनीतिमान या दोघांना योग्य न्याय मिळेल. देवदूत देवाच्या उपस्थितीत उभे राहून न्याय देतील. न्यायाच्या दिवशी देव माणसाच्या चांगल्या कृत्ती व दृष्टाई दोन्ही प्रकाशात आणील. नीतिमान लोक देवाच्या प्रकाशात चमकतील तर वाईट कृर्त्ये करणारी देवाच्या क्रोधाला बळी पडतील, मी जगात प्रामाणिकपणे जीवन जगतो का ? की अनीतीच्या मार्गानी निंदणाच्या मागे धावतो ?
प्रार्थना : हे परमेश्वरा, आमच्या आई-वडिलांबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांना तुझी कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या