Marathi Bible Reading | Wednesday 27th July 2022 | 17th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १७ वा सप्ताह  

बुधवार २७ जुलै २०२२

"तो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो."


  
संत इनोसेंट पहिले 
• परमगुरू, वर्तनसाक्षी (४१७)

आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू स्वर्ग राज्याचे महत्त्व दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करून सांगत आहे. शेतात सापडलेली ठेव मिळविण्यासाठी  माणूस जसे सर्वस्व पणाला लावून ते शेत विकत घेतो, तसेच स्वर्गराज्याची वचने आत्मसात करण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे. 
दुसऱ्या  उदाहरणात प्रभू येशू मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आपण असावे अशी शिकवण देत आहे. परमेश्वराचे अनमोल मोती म्हणजेच त्याची अमर  वचने आहेत. प्रभू येशूच्या आजच्या दोन्ही दृष्टांतावर चिंतन करीत असताना आपणास देवाचे स्वर्गीय राज्य मिळविण्याचा प्रयत्न करू या. 

✝️   
पहिले वाचन : यिर्मया १५:१०,१६-२१
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मला सतत दुःख का ? जर तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहशील. "

अग माझ्या आई! हाय हाय ! सर्व जगाबरोबर झगडा आणि विवाद करणाऱ्या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी सावकारीचा व्यवहार केला नाही आणि कोणी माझ्याशी सावकारी केली नाही; तरी सर्व मला शाप देतात.
मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझीवचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्हास अशी होती;
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी स्वतः ला तुझा म्हणवतो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. मला सतत दुःख का ? माझी जखम भारी आणि असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, यांसारखा तू खरोखर मला होशील काय ? ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो:
"तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिणकसापासून मौल्यवान वेगळे करशील, तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस. तुला, या लोकांसंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन;
म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करायला आणि तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.
मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्काराच्या तावडीतून मुक्त करीन.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ५९:२-५अ, १०-११अ, १७, १८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू माझा आधार आहेस.

१) हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्यांपासून मला सोडव; 
जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.
 दुष्कर्म करणापासून मला सोडव; 
घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर.

२ )पहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत;
 हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता 
दांडगे लोक माझ्याविरूद्ध एकत्र जमले आहेत.
 माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत.

३)  हे माझ्या सामर्थ्या,मी तुझी प्रतीक्षा करीन;
कारण देवच माझा उंच गड आहे,
माझा प्रेमळ देव मला भेटेल

४)  मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, 
पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; 
कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड 
आणि शरणस्थान झाला आहेस.

५)  हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन. 
कारण देव माझा उंच गड आहे; 
माझा देव दयामय आहे.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. 
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १३ : ४४-४६
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"तो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
"आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोण्या व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : यिर्मयाने प्रार्थनेद्वारे देवाकडे तक्रार केलेली आहे की, तू माझ्या जीवनात दुःखाशिवाय काहीच दिले नाही. जड अंतःकरणाने तो देवाला सांगतो की, माझ्या दुःखाचा अंत होणार नाही व जखमावर उपचार देखील होणार नाही. देवाच्या चांगुलपणाच्या व न्यायाच्या गोष्टी त्याने लोकांना सांगितल्या तरी त्याच्या नशिबी छळवणूक व निराशा आली. मात्र देवाच्या पावित्रतेचा अनुभव त्याला आला तेव्हा त्याचे मन आनंदित झाले. शुभवर्तमानात दोन माणसांना मौल्यवान • किंमतीचा खजिना मिळाला तेव्हा त्यांना आनंद झाला. दोन्ही दाखल्यावरून आपणाला हेच शिकायला मिळते की, ज्याला शोध लागतो तो ते प्राप्त करण्यासाठी आपले सर्वस्व विकतो. पण ज्याला तो खजिना प्राप्त होतो तो जाणीवपूर्णक त्याच्या शोधात दिसत नाही. व्यापारी मात्र मौल्यवान मोत्याच्या शोधात राहतो व त्याला सापडल्यावर तो सर्वस्व विकतो. आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी आनंद घेऊन येत असतात? जीवनात जेव्हा दुःख येते तेव्हा मी देवाला तक्रार करून दोष देतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तू आम्हासाठी दिलेली तुझी अमर वचने व देवराज्याच्या दिशेने घेऊन जाणारी शिकवण आम्ही आत्मसात करावी म्हणून आम्हाला प्रेरणा  दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या