सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
गुरुवार २८ जुलै २०२२
मरीयेनें चांगला वांटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाहीं !
- कुमारिका (१९१०-१९४६)
केरळातल्या कुदानाळूर नावाच्या गावात १९ ऑगस्ट १९१० साली जोसेफ व मेरी ह्यांच्या संसारवेलीवर आन्ना नावाचे चौथे अपत्य उमलले, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने आन्नाचे पालन पोषण केले. तिच्या बालपणी तिने वाचलेली लिझोची संत तेरेजा हिची कहाणी वाचून आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्या माध्यमातून संत व्हावे असे तिला वाटू लागले.
आन्ना हिला कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते, परंतु तिच्या मावशीने तिचे आधीच लग्न ठरविलेले होते. आपली सोयरिक मोडणे आता केवळ अशक्य आहे असे दिसताच तिने आपले सौंदर्य नष्ट करण्यासाठी मोठ्या अग्नी ज्वालेमध्ये आपला पाय घातला. परंतु सुदैवाने तो घसरला आणि ती स्वतः त्या ज्वालेत पडली व मोठ्या प्रमाणात भाजली. मात्र थोड्याशा औषधोपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिच्या मावशीने तिला व्रतस्थ जीवनात प्रवेश करण्यास परवनागी दिली.
या महत्त्वाच्या जीवनासाठी आपली तयारी करण्यासाठी ती भारानांगानाम येथील कॉन्व्हेंटमध्ये नवशिष्य म्हणून इ. स. १९२८ साली दाखल झाली. तिथे वैराग्याची वस्त्रे पांघरल्यानंतर सिस्टर अल्फोन्सा ह्यांच्या जीवनात तीन प्रसंग येऊन गेले. इ. स. १९३५ साली कॉन्व्हेंटमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच तिला एका असाध्य रोगाने पछाडले. तीन महिने ती ह्या आजाराशी झुंज देत होती. त्यावेळी तिने धन्यवादित कुरियाकोस एलायस चावरा (सण ३ जानेवारी) ह्यांचा नोव्हेना केला आणि ती ठणठणीत बरी झाली.
दुसऱ्या एका प्रसंगात एका संध्याकाळी एक चोर त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलेला पाहून तिने इतका धसका घेतला की, ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिला तामिळ भाषेची देणगी मिळाल्याचे दिसून आले. त्याआधी तिने तामिळ ही भाषा कधी वाचली, लिहिली की बोलली नव्हती. आता ह्या नवीन दानामुळे ती तामिळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. बरेच लोक तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. तिला दूरदृष्टीची विलक्षण देणगी देखील लाभलेली होती.
तिसऱ्या एका घटनेत इ. स. १९४५ साली तिला येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. सुरूवाती सुरूवातीला हे दुःखसहन केवळ शुक्रवारी ३ तासासाठी होई. पुढे ते कधीही होऊ लागले. परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकल्याची कुठलीही खूण दिसत नसे. उलट आगळाच ताजेतवानेपणा तिच्या मुखवट्यावर विलसत असे.
दुःखसहन प्रसंग मर्यादित व्हावे अशी प्रार्थना तू का करीत नाहीस? असा प्रश्न विचारणाऱ्या सिस्टरांना तिने दिलेले उत्तर सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे असेच आहे. ती म्हणाली मी केवळ हेच दुःखसहन नव्हे तर कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे, आजचे आधुनिक जग केवळ सुखासीनतेच्या सागरात पार डुंबलेले आहे. नाशाच्या मार्गावर असणाऱ्या जगासाठी म्हणा किंवा धर्मगुरू व धर्मभगिनींच्या उदासीन वृत्तीबद्दल म्हणा प्रभूला मला जितक्या यातना दयावयाच्या आहेत तितक्या सोसण्यास माझी पूर्ण तयारी आहे.
२८ जुलै रोजी सिस्टर अल्फोन्सा मरण पावल्या. पुढे इ. स. १९८६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे आपल्या भारत भेटीवर आले तेव्हा कोट्टायाम (केरळ) येथे त्यांना धन्यवादित ही पदवी पोपमहाशयांनी बहाल केली.व १२ ऑक्टोबर २००८ साली पोप बेनेडिक्ट १६वे संत हि पदवी यांनी बहाल केली.
ख्रिस्तसभा आज भारतातील प्रथम स्त्री संत असलेल्या संत ■ अल्फोन्साचा सन्मान करीत आहे.
चिंतन : मी स्वतःला सर्वस्वी येशूचरणी वाहिलेले आहे. माझ्याशी वागताना कृपया येशूला प्रसन्न करण्याचा आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू या.केवळ देवाच्या प्रेमाखातर दुःखसहन करण्यास आनंद मानणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. - संत सि. अल्फोन्सा
संत अल्फोन्साने आपले सर्वस्व येशू चरणी वाहीले व मृत्युला सामोरे गेली. संत अल्फोन्सा खरोखरच जागृत राहून प्रभूला सामोरे गेली. केरळ येथे | असलेल्या संत अल्फोन्साच्या समाधीला आपण भेट देऊ शकता.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ १०:१७-११:२
वाचन : २ करिंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
जो प्रतिष्ठा मिरवितो, त्यानें ती प्रभूविषयीं मिरवावी.' कारण स्वतःची वाखाणणी कर णारा पसंतीस उतरत नाहीं, तर ज्याची वाखा णणी प्रभु करितो तोच पसंतीस उतरतो. प्रेषित म्हणून त्याचा हक्क माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरें; आणि तें तुम्ही करीतच आहां. कारण तुम्हांविषयींची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचें वाग्दान केलें आहे, अशा हेतूनें कीं,तुम्हांला शुद्ध कुमारी असें ख्रिस्ताला सादर करावें.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ६३:२-६,८-९
प्रतिसाद : माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे.
१)हे देवा, तू माझा देव आहेस मी आस्थेने तुझा शोध करीन
शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशांत माझा जीव
तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे.
माझ्या देहालाहि तुझी उत्कंठा लागली आहे.
२) अशा प्रकारें तुझे बळ व वैभव पाहण्यास
पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टि लाविली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे.
माझे ओठ तुझे स्तवन करितील.
३) मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद" असाच करीन;
तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन,
मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल.
आणि माझें मुख हर्षभरित होऊन तुझें स्तवन करील.
४) मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करितों,
व प्रहरोप्रहरी तुझें ध्यान करीत असतो.
माझ्या जिवाने तुझी कास धरिली आहे ;
तुझा उजवा हात मला संभाळून धरितो
पण जे माझ्या जिवाचा घात करावयास टपले आहेत,ते पृथ्वीच्या अधोभागी जातील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २५ : १-१३
वाचक : मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
तेव्हां स्वर्गाचें राज्य दहा कुमारीसारखें होईल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यांत पांच मूर्ख होत्या व पांच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपणा बरोबर तेल घेतलें नाहीं; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलहि घेतलें. मग वराला विलंब लागला व सर्वास डुलक्या आल्या व झोप लागलीं. तेव्हां मध्यरात्री अशी हांक आली की, पाहा, वर आला आहे,' त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या; तेव्हां मूर्खानीं शहाण्यांस म्हटलें, तुम्ही आम्हांस तुमच्या तेलांतून कांहीं द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत; पण शहाण्यांनी उत्तर दिलें कीं, कदाचित् आम्हांला व तुम्हांला पुरणार नाहीं; तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतः करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असतां वर आला; तेव्हां ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्या बरोबर आंत लग्नास गेल्या आणि दार बंद झालें. नंतर त्या दुसऱ्याहि कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. त्यानें उत्तर दिलें, मी तुम्हांस खचित सांगतों, मी तुम्हांस ओळखीत नाहीं. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस तो दिवसकिंवा ती घटका ठाऊक नाहीं.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
किंवा
शुभवर्तमान लूक १० : ३८-४२
वाचक : लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मग ते पुढे जात असतां तो एका गांवांत आला; तेव्हां मार्था नांवाच्या एक स्त्रीनें त्याचें आपल्या घरीं स्वागत केलें. तिला मरीया नांवाची एक बहीण होती; तीहि प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचें भाषण ऐकत राहिली. तेव्हां मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभुजी, माझ्या बहिणीनें माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय ? मला साहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूनें तिला उत्तर दिलें, मार्थे, मार्थे, तूं पुष्कळ गोष्टीं विषयीं काळजी व दगदग करतेस परंतु थोडक्याच गोष्टींचें, किंबहुना एकाच गोष्टीचें अगत्य आहे; मरीयेनें चांगला वांटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाहीं !
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : 'ज्याची वाखाणणी प्रभू करितो तोच पसंतीस उतरतो' म्हणजेच परमेश्वर त्याच्या भक्तास प्राचारण करीत असताना त्याला अंतर्यामी पारखतो आणि निवडतो. पुढे संत पौल म्हणतो, 'तुम्ही शुद्ध कुमारिका असे ख्रिस्ताला सादर करावे.' आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, मरिया आणि मार्थाच्या घरी प्रभू येशू आला असताना, मरियेने चांगला वाटा निवडला होता, कारण ती प्रभूच्या चरणाशी बसून त्याचे वचन ऐकत होती.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकरुप होण्यास व तुझ्या दुःख सहनात सहभागी होण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या