सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
शुक्रवार २९ जुलै २०२२
ख्रिस्तसभा आज बेथानी येथल्या लाझरस आणि मरिया ह्यांची बहीण मार्था हिचा सण साजरा करीत आहे. यहुदियात असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त मार्थाच्या घरी पाहुणा म्हणून उतरला. मार्थाने त्याचे आपल्या घरी स्वागत केले इतकेच नव्हे तर त्याच्या स्वागताची व्यवस्थित तयारी व्हावी म्हणून ती दिवाणखान्यात पुष्कळ गोष्टीविषयी दगदग व काळजी करीत राहिली..
मार्था, मरिया व त्यांचा भाऊ लाझरस ह्यांच्यावर येशूचे विशेष प्रेम होते. त्यामुळे लाझरस मरण पावल्यावर मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” ख्रिस्ताच्या केवळ उपस्थितीत जीवनाचा उगम आहे हेच मार्थाने आपल्या ह्या वाक्याद्वारे दर्शविलेले आहे. पुढे मार्थाच्याच आग्रहावरून ख्रिस्ताने उच्चारलेले, 'पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे' हे वाक्य इतिहासात अजरामर झाले आहे.
✝️
पहिले वाचन : १ योहान ४:७-१६
वाचन : योहानाचे पहिले पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्याएक पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, ज्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्याठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे आणि आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचातारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो आणि तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ३४ : २ - ११
प्रतिसाद :परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा;
१) माझा जीव परमेश्वराच्या ठायीं प्रतिष्ठा मिरवील;
दीन हे ऐकून हर्ष करितील.
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा;
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
२)मी परमेश्वराला शरण गेलों
आणि त्याने माझा स्वीकार केला;
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविलें
ज्यांनी त्याच्याकडे पाहिलें ते प्रकाश पावले;
त्यांचीं मुखें लज्जेनें कदापि काळवंडणार
नाहीत.
३) ह्या पामरानें धावा केला आणि
परमेश्वरानें तो ऐकला, आणि
त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविलें.
परमेश्वराचा दूत त्याचें भय धरणाऱ्यां सभोंवतीं छावणी देतो
आणि त्यांचे संरक्षण करितो.
४) परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा
अनुभव घेऊन पाहा;
जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य !
५) परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचें भय धरा,'
कारण त्याचें भय धरणाऱ्यांना कांहीं उणें पडत नाही.
तरुण सिंहांसहि वाण पडते व त्यांची उपासमार होते;
पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याहि चांगल्या वस्तूची वाण पडत नाहीं.मुलांनो या, माझें ऐका,मी तुम्हांला
परमेश्वराचें भय धरावयाला शिकवीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान ११ : १९-२७
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा असा मी विश्वास धरला आहे. '
यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था आणि मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, "पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय ?” ती त्याला म्हणाली, “होय, प्रभुजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आज ख्रिस्तसभा संत मार्था, मरिया व लाझरस ह्यांचा स्मृती साजरी करते. आपण मार्थाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया.
ख्रिस्त म्हणतो, 'माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही.' प्रभू येशूवर विश्वास ठेवून शरण येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतासाठी येशू चमत्कार व अद्भूत कृत्य करण्यास तयार असतो. परंतु आपण प्रभू येशू मध्ये एकरुप होणे गरजेचे आहे. आपण श्रद्धेने जीवन जगतो त्याची शिकवण व वचने आचरणात आणतो . तथापि प्रभूवर विश्वा स ठेवण्यास कमी पडतो. आपले जीवन परिवर्तन करण्यास व आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यास प्रभू तयार आहे. संत मार्था सारखा दृढविश्वास व प्रभूला शरण येऊन सर्वस्व समर्पण करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, मरिया व मार्थासारखा विश्वास व प्रेम आमच्यामध्ये वाढीस करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करु या. लागावे व आमचे जीवन परिवर्तन घडावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या