सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
शनिवार ३० जुलै २०२२
"योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही,”
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३८०-४५०)
चिंतन : पावित्र्याची शस्त्रे धारण करा. आपली कंबर शुद्धतेच्या कमरबंदाने कसा, ख्रिस्त तुमचे शिरस्त्राण बनो. ख्रिस्ताचा क्रूस तुमच्या मुखाचे रक्षण करो. आपल्या उरात ईश्वरी ज्ञानाचे भांडार साठवा, तुमच्या प्रार्थनांचा धूप उंचस्थानी पोहोचो. • संत पीटर क्रिस्तॉलॉगस
प्रभू येशूच्या म्हणजेच तारणाऱ्याच्या आगमनाचा संदेश देणारा व पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देणारा योहान बाप्तिस्माच्या मृत्युचा वृतांत आजच्या शुभवर्तमानात दिला आहे. हेदोराची कानउघाडणी करुन सत्याचा संदेश देणारा योहान बाप्तिस्ता निर्भिड आणि धैर्यवान होता. सत्यासाठी त्याला स्वत:चा प्राण गमवावा लागला. देवाच्या सहवासाचा अनुभव घेऊन तो इतरांना देणारी माणसे सतत देवाचा शोध घेत असतात.
. देवाचा शोध करणाऱ्या माणसाला देव सामर्थ्याचा, समंजपणाचा, शहाणपणाचा, सुसंकल्पाचा व धैर्याचा आत्मा बहाल करतो. अशी माणसे सत्य तेच जाहीर करतात त्यांना माणसांची भीती वटत नाही. कारण ते सर्वस्वी देवाचे बनलेले असतात. सत्य जाहीर करणाऱ्याला आणि सत्याची साक्ष देणाऱ्याला आज सुद्धा मरणाला सामोरे जावे लागते. कारण भीत्री माणसे सत्याचा सामना करु शकत नाहीत. त्यांना सत्याला दडपून टाकायचे असते. पण त्यांना हे कळत नाही की, सत्य कधीच मरत नाही.
✝️
पहिले वाचन : यिर्मया २६:११-१६,२४
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे. "
याजक आणि संदेष्टे सरदारांना आणि सर्व लोकांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण या नगराविरूद्ध याने संदेश दिला, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे. '
मग यिर्मया सर्व सरदारांना आणि सर्व लोकांना म्हणाला,"जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरूद्ध आणि या नगराविरूद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले. म्हणून आता तुम्ही आपले मार्ग आणि आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हांवर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल. माझ्याविषयी म्हणाल तर पाहा, मी तुमच्या हाती आहे, तुम्हाला बरे आणि नीट दिसेल तसे माझे करा. एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणावर, ह्या नगरावर आणि यातील रहिवाश्यांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक हो सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे."
तेव्हा सरदार आणि सर्व लोक याजकांना आणि संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव, याच्या नामाने तो आम्हांबरोबर बोलला आहे."
शाफानचा पुत्र अहीकाम याचे यिर्मयाला पाठबळ होते, म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही आणि त्यांनी त्याला ठार मारले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ६९:१५-१६, ३०-३१,३३-३४
प्रतिसाद : हे देवा, मला उत्तर दे. मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर.
१) हे देवा, चिखलातून मला काढ,
मला रुतू देऊ नकोस;
खोल पाण्यातून मला काढ
पाण्याचा लोढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस.
दलदलीत मला खेचू देऊ नकोस,
गर्तेच्या जाळ्यात मला गुंतून पडू देऊ नकोस.
२) मी तर दीन आणि दु:खी आहे;
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण
मला उच्चस्थानी नेऊन ठेवील,
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन,
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन,
३) दीनजन हे पाहून हर्ष करतील;
देवाचा शोध करणाऱ्यांनो,
तुमच्या हृदयात नवजीवन येवो,
कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो;
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना
तो तुच्छ मानत नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा,
आपला मार्ग मला दाखव,
मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १४ : १-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हेरोदने माणूस पाठवून योहानचा शिरच्छेद करवला. योहानच्या शिष्यांनी जाऊन येशूला ही गोष्ट सांगितली. "
मांडलिक हेरोदने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. कारण हेरोदने आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, हिच्यासाठी योहानला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही,” आणि तो त्याला जिवे मारायला पाहात असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत होते. नंतर हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदला खूष केले, त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.” तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथेमुळे आणि जे पंक्तीला बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : "सत्य तुम्हांस बंधमुक्त करील.” (योहान ८:३२) असं येशूचं एक वचन आहे. आजची दोन्ही वाचने सत्याचे समर्थन करण्यास पाचारण करीत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आपल्याला नेहमी शक्य होत नाही तरीही त्याबाबत ठाम भूमिका घेण्यास ही वाचने आव्हान करीत आहेत. यिर्मया देवाच्या नावाने बोलणारा संदेष्टा होता. त्याच्या विश्वासूपणामुळे तो निर्भय राहतो, आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी वचनबद्ध राहतो. जो कोणी त्याच्याशी तडजोड करतो त्यांच्याशी तो सामना करतो. शुभवर्तमानात राजा हेरोद एक राजा म्हणून आपली प्रतिष्ठा जपण्यास अपयशी ठरला कारण त्याने चांगल्या मुल्यांशी तडजोड केली. आपल्या भावाची बायको स्वतःबरोबरठेवून, योहान बॅप्टीस्तासारख्या चांगल्या देव सेवकाचा खून करून, आपल्या सावत्र मुलीला व | दरबारातील वरील मंडळीना आपलंसं करून देखील हेरोद हा चिंताग्रस्त होता. आपल्या सभोवतलाच्या वातावरणात एक कैदी म्हणून तो जीवन जगत होता. आपण अपराधी आहोत ही अपराधीपणाची भावना आपल्याला कधीच झोपू देत नाही. आपण केलेल्या वाईट गोष्टीपासून आपण पळ काढू शकत नाही. केवळ त्यांच्याशी सामना करू शकतो. मी योहान बॅप्टीस्ताप्रमाणे सत्याची कास धरतो की हेरोदाप्रमाणे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी असत्याला मिठी मारतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सत्याचे साक्षीदार बनण्यास व तुझी सुवार्ता सांगण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या