सामान्यकाळातील १८ वा रविवार
३१ जुलै २०२२
“अरे मुर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल; मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल ?
“सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा;
संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणत आहे, 'वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.' पृथ्वीवरील ज्या क्षणभंगूर गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न आपण करतो, त्यासाठी दुष्टपणा आणि लबाडी केली जाते. संत पौल म्हणतो, 'ही सर्व आपणापासून दूर करा.'
प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आपण सर्वांनी देवाविषयक बाबतीत धनवान बनावे म्हणून दाखला देऊन शिकवण देत आहे. ह्या जगातील वैभव, संपत्ती, सुख आणि सौंदर्य आपल्या सर्वांनाच मोहित करुन आकर्षित करीत असते. म्हणूनच बहुतेक माणसे जागतिक वैभव व सुख मिळविण्यासाठी खूप कष्ट उपसतात. अनेकदा स्वार्थी वृत्तीने, दुष्टपणा आणि लबाडी करुन गरीब व असहाय माणसांची फसवणूक केली जाते. धन-दौलतीलाच देव मानूनअनेकजण अत्याचार व अन्याय करुन संपत्ती बळकावत असतात. पैसा, घर, सुबत्ता म्हणजेच सर्व नाही तर स्वर्गीय वैभव मिळविण्यासाठी आपण कोणता प्रयत्न करीत असतो? आपण देव विषयक बाबतीत धनवान | बनण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
देवाविषयी ज्ञान संपादन करुन शहाणपणाने देवाच्या मौल्यवान वचनांचा साठा आपण आपल्या जीवनात केला तर आपले जीवन सुख, शांती, समाधानाने व देवाच्या आशीर्वादाने सदोदीत भरलेले राहील.
✝️
पहिले वाचन :उपदेशक १:२:२:२१-२३
वाचक : उपदेशक या पुस्तकातून घेतलेले वाचन "माणसाला आपल्या परिश्रमाच्या मोबदल्यात काय मिळते ?"
उपदेशक म्हणतो, “व्यर्थच व्यर्थ, सारे काही व्यर्थ आहे. बऱ्याच वेळेला माणसाने त्याच्या हुशारीने, ज्ञानाने आणि कुशलतेने परिश्रम करून एकत्रित केलेले सारे धन ज्या माणसाने काहीच श्रम केले नाहीत अशा माणसासाठी मागे ठेवावे लागते, ही व्यर्थ आणि खेददायक गोष्ट आहे. जगात कडक उन्हात परिश्रम करणाऱ्या माणसाला सोसलेल्या यातनेच्या बदल्यात काय मिळते ? खरे पहाता, मनुष्याचे सर्व दिवस दुःख कष्टाने भरलेले आहेत, त्याचे काम निरुत्साह उत्पन्न करते; रात्रीसुद्धा त्याचे मन बेचैन असते, त्याच्या मनाला शांती लाभत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :९६:१-२, ६-७अक, ७ड-९
प्रतिसाद : आज तुम्ही देवाची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!
१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू या;
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू
उपकारस्मरण करत आपण त्याच्यापुढे जाऊ,
स्तोत्रे गाऊन त्याचा जयजयकार करू.
२) याहो या, परमेश्वर आपला उत्पन्नकर्ता
त्याच्यापुढे आपले गुडघे टेकू, त्याची भक्ती करू,
त्यापुढे नमन करू; कारण तो आपला देव आहे
आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा,
त्याच्या हातचा कळप आहो,
३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!
"मरिबा येथल्याप्रमाणे रानातील मस्सा प्रकरणाच्या दिवसांत केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठोर करू नका;
तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली,
मला पारखले, माझी कृती पाहिली.”
दुसरे वाचन कलस्सै ३: १-५,९-११
वाचक: पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना आणि लोभ, ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जिवे मारा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात हेल्लेणी आणि यहुदी, सुंता झालेला आणि न झालेला, बर्बर आणि स्कुथी, दास आणि स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो,
त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:१३-२१
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल ?"
लोकसमुदायातील कोणाएकाने त्याला म्हटले, "गुरुजी, मला माझा वतनाचा वाटा द्यायला माझ्या भावाला सांगा.”तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले ?” आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” त्याने त्यांना एक दाखला सांगितला; कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले; तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, मी काय करू ? कारण माझे उत्पन्न साठवायला मला जागा नाही. मग त्याने म्हटले, “मी असे करीन: मी आपली कोठारे मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन.” मग मी आपल्या जीवाला म्हणेन, 'हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.' परंतु देवाने त्याला म्हटले, “अरे मुर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल; मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल ? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : बायबलच्या जुन्या करारातील ज्ञानसाहित्य मानवी जीवनाशी संबंधीत असलेले विषय हाताळताना दिसते. त्यातल्या त्यात मानवी जीवनाचा अर्थ हा विषय जुन्या कराराप्रमाणे नव्या करारातदेखील अतिशय कौशल्याने हाताळण्यात आलेला आहे. आजच्या उपासनेतील वाचने पृथ्वीतलावरील भौतिक जीवनाचा फोलपणा आपल्यासमोर सादर करतात. पहिले वाचन “व्यर्थ हो व्यर्थ” अशा शब्दात जीवनातील निरर्थकता सूचित करते. ह्या पुस्तकातील उपदेशक तसा ज्ञानी, अनुभवी आणि चिकित्सक ऋषी होता. जीवनावर व जगण्यावर त्याने केलेले चिंतन वरवर नकारात्मक भासत असले तरी ते एका विशिष्ट उंचीवर जीवन जगण्यास प्रेरक ठरणारे आहे. सुख मिळाले तर उपभोगायचे मात्र त्याच्यामागे धावायचे नाही कारण पृथ्वीवरील कोणतीच गोष्ट मानवी जीवन सुखी करू शकत नाही, अशी त्याची धारणा आहे. त्याच कारणात्सव दुसऱ्या वाचनात संत पॉल कलस्सैकरांना पृथ्वीवरील नव्हे तर स्वर्गातील गोष्टींकडे आपले चित्त लावण्याचे आवाहन करतो.
शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू पृथ्वीवरील धनसंपत्तीवर भिस्त ठेवणाऱ्या परंतु देवाविषयी धनवान नसणाऱ्या श्रीमंत मूर्ख माणसाचा दाखला देतो. भौतिक धन नव्हे तर आध्यात्मिक श्रीमंती शाश्वत स्वरूपाची असते हा कित्ता संतांनीसुद्धा लोकांना घालून दिला. आत्म्याच्या तारणासाठी झटणारे फा. जॉन मारी वियानी केवळ उकडलेले बटाटे खाऊन जगत असत.
आत्मपरीक्षणः भौतिक धनापेक्षा मी आध्यात्मिक धनसंपदेला अधिक महत्त्व देतो / देते हे माझ्या कोणत्या कृतीवरून दिसून येते ?
प्रार्थना : हे प्रभो, सर्वदा स्वर्गीय गोष्टी मिळविण्यास प्रयत्नशील बनण्यास
आम्हला कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या