Marathi Bible Reading | Monday 1st August 2022 | 18th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १८ वा सप्ताह  

 सोमवार १ ऑगस्ट २०२२

"येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”


  संत अल्फोन्सस डी लिगरी

महागुरू, वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित

(१६९६-१७८७)

संत अल्फोन्सस ह्यांना नीतिशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांचा व प्रायश्चित्त संस्कार देणाऱ्या धर्मगुरूंचा आश्रयदाता संत मानले जाते.

चिंतन : ज्याला फळ हवं आहे त्याने झाडाकडे गेले पाहिजे. ज्यांना ख्रिस्त हवा आहे त्यांनी मरियेकडे आले पाहिजे आणि ज्याची मरियेशी भेट होते त्याला निश्चितच ख्रिस्त सापडतो. संत अल्फोन्सस डी लिगरी

ख्रिस्तसभा आज संत अल्फन्सस लिगरी ह्यांचा स्मृती दिन साजरा  करीत आहे. एक महान कायदेतज्ञ आणि नीतिशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. साक्रामेंतातील येशूच्या भक्तीचा त्याने प्रसार केला. रिडेंप्टरीस्ट  धर्मगुरु संघाची त्याने स्थापना करुन आपले सुवार्ताकार्य बलशाली व प्रभावी  बनवले. प्रभू येशू आपण सर्वजण त्याच्या नावाने जेव्हा एकत्र जमा होतो तेव्हा  आपल्यामध्ये हजर असतो. प्रभू येशूचे अस्तित्व आपण जाणावे, ओळखावे  आणि अनुभवावे म्हणून प्रार्थना करु या.

✝️   
पहिले वाचन : यिर्मया २८:१-१७
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“हनन्या, परमेश्वराने तुला पाठवले नाही, तू या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावले."

त्याच वर्षी यहुदाचा राजा सिदुकीया याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर आणि सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की, “सेनाधीश परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो : मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकले आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे या स्थलातून घेऊन बाबेल येथे नेली ती सर्व दोन वर्षाच्या आत मी या स्थळी परत आणीन. यहुदाचा राजा यखन्या बिन यहोयाकीम आणि बाबेल येथे पकडून नेलेले यहुदाचे सर्व लोक यांना मी या ठिकाणी परत आणीन, मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन असे परमेश्वर म्हणतो.”
तेव्हा जे याजक आणि जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्यासमक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्यांला म्हणाला, “आमेन! परमेश्वर असे करो, परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे आणि बंदिवासातले सर्व लोक बाबेलहून या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेशरूपाने सांगितली त्याप्रमाणे परमेश्वर करो. मात्र जे वचन मी तुझ्या कानी आणि सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक. माझ्या आणि तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश आणि मोठी राज्ये यांवर लढाई, अरिष्ट आणि मरी ही येतील असा त्याविरुद्ध संदेश दिला. कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की, खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.' 
तेव्हा हनन्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडले आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, “परमेश्वर म्हणतो: याप्रमाणे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याचे जू मी पुऱ्या दोन वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.
यिर्मया संदेष्ट्यांच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे: “जा, हनन्याला सांग की, परमेश्वर म्हणतो : तू लाकडी जोखडे मोडून टाकली पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन. कारण सेनाधीश परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो : या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे; त्यांना त्याची सेवा करावी लागेल, मी त्याला वनातले पशूही दिले आहेत.” मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टयाला म्हणाला, “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावले." ह्याकरिता परमेश्वर म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. तू परमेश्वराविरूद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून या तू वर्षी तू खरोखर मरशील.
त्याप्रमाणे त्याच वर्षी सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ११९:२९.४३, ७९-८०, ९५.१०२
प्रतिसाद :  प्रभो, तुझे नियम मला शिकव.

१. )असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; 
कृपाळू होऊन तुझे शास्त्र मला दे. 
तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून 
सर्वदा नाहीसे होऊ देऊ नकोस. 
कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे.

२) तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, 
म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. 
मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त 
तुझ्या नियमांकडे एकनिष्ठपणे लागू दे,

३) दुर्जन माझा नाश करायला टपले आहेत;
 तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. 
तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही; 
कारण तू मला शिकवले आहेस.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
 हे परमेश्वरा,
 तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, 
ती नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १४ : २२-३६
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"प्रभो, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."
“मी लोकसमुदायांना निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा." असे सांगून येशूने लागलेच शिष्यांना लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकान्ती गेला आणि रात्रभर तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
तेव्हा पेत्रने उत्तर दिले, “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला; परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग ते तू तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा." 
नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या सर्व प्रातांत माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी त्याला विनंती केली; आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : येशू समुद्राच्या पाण्यावर चालतो. येशूवरील विश्वासाने पेत्र सुद्धा चालतो. परंतु तो बुडू लागतो. का? खरे पाहता, पेत्र हा एक कोळी होता. नक्कीच पोहू शकत होता. मग का बुडू लागला ? “प्रभुजी वाचवा” असे का ओरडू लागला ? तो पाण्यावर चालत होता तेव्हा त्याची नजर येशूवर खिळली होती. परंतु येशूवरील त्याची नजर ढळली. तो परिस्थितीला घाबरला. त्याच्या मनात संशय आला. त्याचा विश्वास कमकुवत झाला. म्हणून तो बुडू लागला. मात्र प्रभू वाचविणारा आहे. म्हणून तो प्रभूला हाका मारू लागला. आणि प्रभूने त्याला वाचविले. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती मिशनरी आहे. ईश्वरी सेवा व सुवार्तेसाठी प्रत्येकाने येशू केंद्रित जीवन जगले पाहिजे. भीती न बाळगता, संशय न धरता येशूवरील विश्वास भक्कम केला पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास व सर्वस्वी तुजवर  अवलंबून राहण्यास कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या