सामान्यकाळातील १४वा सप्ताह
सोमवार ४ जुलै २०२२
“मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
राणी एलिझाबेथ हिची दानशूरता तिच्या संपूर्ण आयुष्यभरात गोरगरीब, उपेक्षित आणि दुर्दैवी लोकांना सदैव आधार देण्यास कामी आली. हंगेरीची संत एलिझाबेथ हिच्या नावावर प्रसिद्ध झालेली एक घटना खरे पाहता पोर्तुगालच्या या राणीच्या जीवनात घडल्याचे सिद्ध झाले. ती हकिगत अशी : एकदा ती काही गरिबांना दररोजचे अन्न म्हणून काही पाव घेऊन जात होती. मनातल्या मनात ती त्या गोरगरिबांसाठी प्रार्थना करीत होती. अचानक त्या पावांची गुलाबे बनली. सर्वत्र सुंगंध पसरला. प्रत्यक्ष पिशवी उघडून पाहते तो आपल्याच पिशवीतील गुलाबांचा तो सुवास होता. तिने आपल्या पतीला धारेवर धरले कारण त्यांनीच बाजारहाट करताना पावांऐवजी थैलीत गुलाबे कोंबली असावीत असा तिचा समज झाला. घरी परतल्यानंतर आपण नक्कीच पावच आणलेले होते ह्याची साक्ष पतीकडून मिळाल्यानंतर हा चमत्कार झाल्याचे तिने आनंदाने मान्य केले.
अशा प्रकारे कार्य करीत असतानाच या गरिबांच्या कैवारिणीला देवाने ४ जुलै १३३६ साली आपल्याकडे बोलावून घेतले. २०० वर्षानंतर तिला संतपदाचा सन्मान बहाल करण्यात आला.
चिंतन : हे कृपापूर्ण मरिये, हे दयामयी माते आमच्या शत्रूपासून आम्हांला सोडव आणि आमच्या मरणाचे वेळी आमच्या प्रार्थना ऐकून घे. संत एलिझाबेथ
आरोग्यदान मिळालेली स्त्री बारा वर्षापासून व्याधीग्रस्त होती. प्रभू येशूचा गुणकारी स्पर्श हाच एकमेव उपाय असल्याचे तिने जाणले होते. म्हणूनच गर्दीतील समुदायापासून वाट काढत ती प्रभू येशूपर्यंत पोहोचली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. त्या स्त्रीची आंतरिक इच्छा व तळमळ ओळखून येशूने म्हटले, 'मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.'
आपल्या जीवनातील आजार, संकटे व बिकट प्रसंगी आपण खरोखरच येशूला सर्वस्वी शरण जाऊ या. श्रध्देने त्याच्या वचनावर विसंबून श्रध्देने येशूच्या नतमस्तक बनू या.
✝️
पहिले वाचन :होशेय २:१४.१५-१६.१९-२०
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन “धर्माने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन."
परमेश्वर म्हणतो : “मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्यातल्या दिवसांतल्याप्रमाणे, आणि इजिप्त देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की तू मला 'इशी' म्हणजे 'माझा पती' म्हणशील; यापुढे कधी मला 'बाली' म्हणजे 'माझा धनी' म्हणणार नाहीस. मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन; धर्माने, न्यायाने, ममतेने आणि दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४५:२-९
प्रतिसाद : परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन
आणि सदासर्वकाळ तुझ्या नामाचे स्तवन करीन.
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे;
त्याची थोरवी अगम्य आहे.
२) एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या
कृत्यांची प्रशंसा करीत राहील,
त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.
तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप
आणि तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन.
३) तुझ्या भयावह कृत्यांचे प्राबल्य लोक जाहीर करतील,
मी तुझे महात्म्य वर्णीन.
ते तुझ्या परमकृपेची आठवण काढतील
आणि तुझ्या न्याय्यत्वाचे पोवाडे गातील.
४ परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे;
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे.
परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे;
त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ९:१८-२६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण या म्हणजे ती जिवंत होईल."
येशू योहानच्या शिष्यांबरोबर बोलत असताना कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, "माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल." तेव्हा येशू उठला आणि त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली; ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन." तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : रोमन अधिकाऱ्याचा अढळ विश्वास यामुळे त्याच्या मुलीला नवजीवनाचे दान मिळाले.रक्तस्त्रावाने पीडित असलेल्या स्त्रीच्या धाडसी विश्वासामुळे तिला आरोग्यदायी चमत्कार प्राप्त झाला. दोन्ही चमत्कारामधून दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकतो. पहिला संदेशः आपल्या जीवनात चमत्कार घडून यायचा असेल तर आपली इच्छा शक्ती तीव्र असावी. त्याचबरोबर प्रभूवरील आपला विश्वास अविनाशी असावा. या दोन चमत्कारामुळे आपला प्रभूच्या सामर्थ्यावरील विश्वास अधिक दृढ व्हावा त्याचबरोबर आपणा स्वतःच्या व इतरांच्या बरे होण्याकरिता अधिक तीव्रतेने व विश्वासाने प्रार्थना करावी. दुसरा संदेशः येशूमध्ये असलेली संवेदन शीलता व उदारपणा नेहमी आपणास दिसून येतो. मानवी संघर्षाविषयी व आजाराने पीडित बंधुभगिनींच्या वेदना ऐकून त्याबद्दल येशू कधीच संवेदनाहीन व उदासीन नसतो. "मी तुम्हांस परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेलो आहे. 23 (योहान १०:१०) या वचनानुसार येशू सर्वांस परिपूर्ण जीवनाचे दान बहाल करीत असतो. रक्तस्त्रावाने पीडित असलेल्या स्त्रीप्रमाणे धाडसी विश्वासाने मी येशूकडे स्पर्शाची इच्छा व्यक्त करतो का? रोमन अधिकाऱ्याप्रमाणे माझ्यात अढळ विश्वास जागृत आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील आमची श्रध्दा वाढावी म्हणून आम्ही सर्वस्वी तुला शरण येतो आमचा स्वीकार कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या