Marathi Bible Reading | 14th Sunday In Ordinary Time | 3rd July 2022 |

सामान्यकाळातील १४ वा सप्ताह 

रविवार ३जुलै  २०२२

"तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा ऐस.” 


(संत थॉमस-भारताचा प्रेषित, सोहळा)

भारतात आलेल्या संत थॉमसला १९५०वर्षे होत आहेत  - भारताचा प्रेषित आम्हासाठी विनंती कर 

प्रेषित व रक्तसाक्षी (पहिले शतक) जुळा (दिदुम) म्हटलेला थॉमस हा गालीलमधील एक अशिक्षित व साधा कोळी होता. येशूने त्याला आपल्या बारा प्रेषितांमध्ये निवडून घेतले होते. लाझरसच्या आजाराची बातमी येशूला कळली तेव्हा येशू बेथानी येथे जाण्यास निघाला परंतु यहुदी लोक आपल्याला दगडमार करतील ह्या भीतीने इतर शिष्य येशूबरोबर बेथानीस जायला घाबरले होते. अशा वेळी केवळ येशूवरील प्रेमापोटी थॉमस आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला आपणही जाऊ आणि त्याच्याबरोबर मरू.प्रभुजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही मग मार्ग कसा ठाऊक असणार? असा प्रश्न शेवटच्या भोजनसमयी विचारणारा शिष्य हा थॉमसच होता. येशूने त्याला उत्तर दिले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.”

पुढे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने शिष्यांना दर्शन दिले त्यावेळी थॉमस त्यांच्याबरोबर नव्हता. नंतर शिष्यांनी जेव्हा थॉमसला त्याविषयी सांगितले तेव्हा थॉमस त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास तयार होईना. त्यावरून त्याला संशयी थॉमस असे नाव पडले. आठवड्याभराने येशूने पुन्हा शिष्यांना दर्शन दिले आणि थॉमसचा हा संशय वा अविश्वास दूर केला. तेव्हा थॉमसच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार पवित्र मिस्सामध्ये जेव्हा ख्रिस्ताचे शरीर बनलेली भाकर उंचावली जाते किंवा भव्य आशीर्वादासाठी अतिपवित्र साक्रामेंत उचलले जाते त्यावेळी प्रत्येक भाविकाच्या मुखातून देखील बाहेर पडतात. ते शब्द आहेत: "माझ्या देवा, माझ्या प्रभू!”

पवित्र आत्म्याच्या आगमनानंतर सर्व प्रेषित जगाच्या कानाकोपऱ्यात येशूची सुवार्ता सांगण्यासाठी निघून गेले. थॉमस मिडेस, पर्शिया, भारत आणि आसपासच्या परिसरात जाऊन पोहोचले त्यावेळी सिरीया आणि भारत ह्यांच्यात व्यापारी दळणवळण सुरू होते असे मानले जाते. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या ख्रिस्ती धर्मपरिषदेत जे सिरियन चॅल्डीयन बिशप उपस्थित होते ते भारत आणि पर्शिया येथले होते अशीदेखील नोंद इतिहासात आढळले.

मद्रासमधील मैलापूर, (आताचे सान्त थोमे) येथे थॉमस ह्यांना भाल्याने भोसकण्यात आले अशी श्रद्धावंतांची समजूत आहे. त्यामुळे ज्या क्रूसरूपी खांबावर त्याला मारण्यात आले तो खांब आज भाविकांच्या भक्तीचा विषय बनलेला आहे. संत लूकने पवित्र मरियेचे चितारलेले एक चित्र संत थॉमसने भारतात येताना आपल्याबरोबर आणले होते. तेही चित्र आपल्याला मद्रास मैलापूर येथे पाहावयास मिळते.
संत जॉन क्रिझोस्तोम ह्यांच्या काळात संत थॉमस ह्याची खाच सिरीयातील एडेसा येथे होती. पुढे त्याच्या शरीराचे उर्वरित अवशेष इटाली व पोर्तुगाल येथे नेण्यात आले.
भारतात आल्यानंतर कोणा एका राजपुत्राने थॉमसला मोठा राजवाडा उभारण्यासाठी बऱ्यापैकी रक्कम देऊ केली. परंतु “ह्या पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा" असा सल्ला देऊन थॉमसने त्या राजपुत्राला आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यास प्रवृत्त केले. आर्किटेक्ट आणि बिल्डर्स हे संत थॉमस ह्यांना आपला आश्रयदाता संत मानतात. आपणा सर्वास विश्वासाची तशीच  देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करु या.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये १०:२४-३५
वाचक : प्रेषितांची कृत्ये  पुस्तकातून घेतलेले वाचन 
तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोहोचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना आणि इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य सामोरा गेला आणि पण राहा, त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पेत्र त्याला उठवून म्हणाला, "उभे मीही मनुष्यच आहे.” मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, "तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे. तथापि कोणीही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. . म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करत होतो. तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला, 'कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण, तो समुद्राच्या काठी कातडे कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.' म्हणून मी आपणाकडे माणसांना तात्काळ पाठवले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहो.” तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केलाः " 'देव पक्षपाती नाही', हे मला पक्के ठाऊक आहे, तर प्रत्येक • राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४२:१-३,५
प्रतिसाद : माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं 
तान्हेला झाला आहे;

१)  हरिणी जशी हे पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते 
तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठीं लुलपत आहे.

२) माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं 
तान्हेला झाला आहे;
मी केव्हां देवासमोर येऊन त्याचें दर्शन घेईन ?

३)तुझा देव कोठें आहे, असें ते मला सतत  म्हणतात,
 म्हणून अहोरात्र माझे अश्रु माझा आहार झाले आहेत.

४) हे माझ्या जिवा, तूं कां खिन्न झालास ? 
तूं आंतल्या आंत कां तळमळत आहेस ? 
देवाची आशा धर; तो मला दर्शन
देऊन माझा उद्धार करितो, 
म्हणून मी त्याचें पुनरपि गुणगान गाईन

दुसरे वाचन  इब्री लोकांस पत्र १:२-३
वाचक:  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

देव ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                     योहान २०:२९
आलेलुया, आलेलुया !   
प्रभू म्हणतो, थॉमस तू मला पाहिले आहेस 
म्हणून विश्वास ठेवला आहे;
पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.
आलेलुया!

शुभवर्तमान  योहान  २०:२४-२९
वाचक :  योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही." मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” नंतर त्याने थॉमसला म्हटले, "तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा ऐस.” थॉमसने त्याला म्हटले, "माझा प्रभू व माझा देव !” येशूने त्याला म्हटले, "तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : संत थॉमसने आपल्या प्रथमदर्शनी अविश्वासाने जे मिळवले ते इतर शिष्यांना येशूच्या प्रत्यक्ष दर्शनाने सुद्धा मिळवता आले नाही, असे उद्गार संत ग्रेगरी द ग्रेट ह्यांनी काढलेले आहेत. संत थॉमसचा हा दिव्य अनुभव आपल्याला ३ गोष्टींवर चिंतन करण्यास प्रेरणादायी ठरतो. 
१. परमेश्वर त्याचा प्रामाणिकपणे शोध घेणाऱ्या लोकांना नक्कीच दर्शन देतो : प्रेषित थॉमस आग्रही होता परंतु दुराग्रही किंवा दुष्ट नव्हता. केवळ कुतुहलापोटी त्याला पुरावा पाहिजे होता असे नाही. त्याला वैयक्तिकरित्या येशूचे दर्शन हवे होते. येशूने त्याच्या ह्या प्रामाणिक हेतूचा सन्मान केला. २. परमेश्वराचा अनुभव माणसाला अंतर्मुख करतो : येशूचे दर्शन, त्याने दिलेले शांतीचे अभिवादन आणि त्याहीपेक्षा त्याने थॉमसशी केलेला वैयक्तिक संवाद ह्यामुळे थॉमस दिपून गेला. अंतर्मुख बनला. त्याचे शब्द गोठले. तो केवळ दोन तुटक वाक्ये बोलू शकला. एका यहुदी माणसाने दुसऱ्या यहुदी माणसाला परमेश्वर वा देव म्हणून जाहीर करावे त्यासाठी एक आंतरिक शक्ती लागते. ती थॉमसला त्याक्षणी प्राप्त झाली. 
३. परमेश्वर अनुभव हा केवळ स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी व समाधानासाठी नसतो, तो इतरांना देवाकडे आणण्यासाठी असतो : त्यानंतर थॉमसचे जीवन बदलले. पाहिल्यावाचून जे लोक धन्य ठरणार होते अशा लोकांना येशूची सुवार्ता सांगण्यासाठी तो इ.स.५२ साली भारतात आला व रक्तसाक्षी झाला व भारताचा प्रेषित बनला. आज त्याचा हा सोहळा भारतीय ख्रिस्ती दिन म्हणून साजरा केला जात आहे.

आत्मपरीक्षण : मी प्रामाणिकपणे परमेश्वराचा शोध घेत आहे का? मला मिळालेल्या ईश्वर अनुभवाचा वापर मी कसा करतो ?

प्रार्थना : हे माझ्या प्रभो, हे माझ्या स्वामी, तूजवर प्रेम करण्यास व तुझी सेवा करण्यास मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या