सामान्यकाळातील १३व सप्ताह
शनिवार २ जुलै २०२२
"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय ?"
प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्नान संस्कार स्वीकारलेल्या सर्वांना पवित्र आत्म्याठायी कृपा मिळाली आहे. सर्व कृपा संस्कार स्वीकारल्यामुळे आपण ख्रिस्ताबरोबर ऐक्य साधले आहे. आपण सर्वजण नवजीवनाचे भागीदार बनलो आहोत.
प्रभू येशूच्या पुनरुत्थानात आपण सहभागी झालो आहोत. ख्रिस्त प्रभू आपल्या बरोबर आहे. जर प्रभू येशू आपल्या बरोबर आहे व आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला आहे, तर उपासाची आपल्याला सुद्धा गरज नाही. कारण प्रार्थना, मनन-चिंतन, उपवास व सेवा ही सर्व आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असतात.
✝️
पहिले वाचन :आमोस ९:११-१५
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन"मी आपल्या इस्त्राएल लोकांचा बंदिवास पालटीन आणि त्यांस त्याच्या भूमीत रुजवीन."
परमेश्वर असे म्हणतो, “दावीदचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवीन, त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन, तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन; मग ते अदोमाच्या अवशेषाचा आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील," असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.
परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणाऱ्याला गाठील आणि द्राक्षे तुडवणारा बी पेरणाऱ्याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षरस वाहेल आणि सर्व टेकड्यांना पाझर फुटतील. मी आपल्या इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन, ते ओसाड झालेली नगरे बांधतील आणि त्यात वस्ती करतील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांचा द्राक्षरस पितील, ते बाग लावतील आणि त्यांची फळे खातील. मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन आणि जी भूमी मी त्यांस दिली आहे तीतून त्यांस यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही," असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८५:९,११-१४
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलचे भाषण करील.
१) परमेश्वर देव जो काय बोलेल ते मी ऐकून घेईन,
कारण तो आपल्या लोकांशी आणि
आपल्या भक्तांशी क्षेमकुशल भाषण करील.
मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत;
नीती आणि शांती ह्यांनी एकमेकांस आलिंगन दिले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे;
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.
३) परमेश्वर आमची भरभराट करील
आणि आमची भूमी आपले फळ देईल.
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल आणि
त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो आणि
त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ९:१४-१७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय ?"
योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही शिष्य आणि परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, "वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे त्यांना शक्य आहे काय ?" तर असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या उताऱ्यात योहान बाप्तिस्ताच्या शिष्यांनी येशूला उपवासाविषयी प्रश्न केला आहे. येशूने दिलेल्या प्रतिसादावरून येशू उपासाला नापसंत करतो असं नाही. येशूच्या म्हणण्यानुसार वन्हाडी मंडळी लग्नाच्यावेळी उपवास करीत नाहीत. इथे आपल्याला अशी शिकवणूक सापडते की, येशूच्या सहवासात चालविलेला काळ हा आनंद साजरा करण्याचा काळ असतो. हा काळ देवराज्य अस्तित्वात आल्याचा काळ असतो. दुसऱ्या व तिसऱ्यावेळी दिलेला प्रतिसाद हा नवीन कापड व जुने ठिगळ याविषयी व नवीन द्राक्षारस व जुना बुधला याविषयी आहे. तात्पर्य हेच की योग्य वातावरणात दोघांनाही स्थान आहे व त्याची भेसळ करता कामा नये. आपल्या आध्यात्मिक जीवनात उपासाला महत्त्व आहे. मात्र ते आपले अंतिम ध्येय असता कामा नये. आपली चांगली कृत्येही बऱ्याचवेळा आपल्यावर कब्जा करू शकतात व आपल्यासाठी ती अंतिम ध्येय बनू शकतात. मात्र आपले ध्येय म्हणजे देव होय. मात्र दुसरे सर्वकाही आपण कितीही चांगले असले तरी ते अंतिम ध्येय होऊ शकत नाही. आपण त्याचा उपयोग ईश्वरानुभूतीसाठी करायला हवा. मी आतापर्यंत देव हे माझे अंतिम ध्येय बनवले आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास व तुला अंत:करणापासून जाणण्यास आम्हाला कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या