सामान्यकाळातील १३व सप्ताह
शुक्रवार १जुलै २०२२
"'मला दया पाहिजे, यज्ञ 'नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका.”
प्रभू येशू वेद्यांचा वैद्य, गुरुंचा गुरु आणि पापांची क्षमा करुन पापीजनांना जवळ करणारा प्रभू आहे. देवापासून बहकलेल्यांना आणि पापांच्या चिखलात रुतलेल्या सर्वांना तो त्याच्या करुणामय कृपेच्या झऱ्याजवळ बोलवित आहे.
आपण अपात्र असतांना सुध्दा प्रभू येशू आज आपल्याला सामर्थ्य व कृपा बहाल करुन त्याच्या प्रीतीच्या कळपात राहण्यासाठी बोलवित आहे. त्या दयासागर प्रभूठायी आपले सर्वस्व समर्पित करुन शरण जाऊ या.
✝️
पहिले वाचन :आमोस ८:४-६,९-१२
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन"मी देशावर दुष्काळ आणीन, तो दुष्काळ अन्नाचा नव्हे तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल."
जे तुम्ही गरजवंतांना गिळण्यासाठी तोंड उघडता अणि देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका: तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल ? म्हणजे आम्हांला धान्य विकायला सापडेल. शब्बाथ केव्हा संपेल ? म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, माप लहान करू, शेकेल मोठा करू आणि खोट्या तराजूंनी फसवू, म्हणजे आम्ही रुपे देऊन गरिबांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरजवंतांना विकत घेऊ आणि बुरसटलेला गहू विकून टाकू."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या समयी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन. तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेला गोणपाट गुंडाळीन, सर्वांच्या डोक्याचे मुंडण करीन, कोणी एकुलत्या एका पुत्राचा शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल. ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडतझडत जातील; ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांना ते प्राप्त व्हावयाचे नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९:२,१०,२०-४०,१३१
प्रतिसाद : मनुष्य परमेश्वराच्या वचनाने जगेल.
१) जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून
त्याचा शोध करतात ते धन्य.
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे;
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
२) तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे
माझा जीव कासावीस झाला आहे.
मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
मी सत्याचा मार्ग निवडला आहे
३) पाहा, मला तुझ्या आदेशांचा ध्यास लागून राहिला आहे;
तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
मी तोंड उघडून धापा टाकतो.
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना
ज्योतीसारखे जगात दिसता.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ९:९-१३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"निरोग्यांना वैद्यांची गरज नाही. मला दया पाहिजेयज्ञ नको."
येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्या मागे ये." तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला.
नंतर तो घरात भोजनाला बसला असता, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ 'नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : देवाची कृपा ही ख्रिस्तामध्ये सर्व मानव जातीसाठी आहे व ती सर्व संकटांवर मात करते. मत्तय नावाचा मनुष्य जकातीच्या नाक्यावर बसून कर गोळा करण्यात कुख्यात होता. विधर्मी रोमन सरकारचे हस्तक म्हणून धार्मिक व राजकीय अशा दोन्ही दृष्टीनी त्याला वाळीत टाकले जात होते. सर्वसामान्य लोकांनी या मत्तयमध्ये एका पापी व भ्रष्ट माणसाला पाहिले. मात्र येशूने या मत्तयामध्ये एक भावी शिष्य पाहिला. शिष्य बनून मत्तयाने आपल्या लेखणीतून शुभवर्तमानाचा आविष्कार आपल्याला दिलेला आहे. देवाची कृपा ही सर्वांसाठी उपलब्ध असते. संत पॉलला सुवार्तिक कार्य करताना देवाची कृपा त्याला सतत साथ देत राहिली. “माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे." अशा प्रभू वचनाने भारावून गेलेला संत पॉल हा ख्रिस्तप्रेमाने वेडा होऊन जगभर ख्रिस्ताचं कार्य करीत राहिला. संत मदर तेरेजा गोरगरिबांत देवाला पाहायची. तिने सर्वांवर सारखंच प्रेम केलेलं होतं. तिच्याठायी जातीभेद नव्हता. मी कोणत्या नजरेने दुसऱ्याकडे पाहात असतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या अमर्याद दयेबद्दल व प्रेमाबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या