Marathi Bible Reading | Tursday 30th June 2022 | 13th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १३व सप्ताह 

गुरुवार ३०  जुन २०२२

"मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

रोमचे पहिले रक्तसाक्षी

- (६४-३१४)

रोमची ख्रिस्तसभा ज्या दोन भक्कम आधारस्तंभावर उभारलेली होती अशा संत पीटर आणि पौल या प्रेषिताचा सण साजरा केल्यानंतर या ख्रिस्तसभेच्या प्रसारासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा आद्य रक्तसाक्ष्यांची स्मृती साजरी करणे हे साहजिकच आहे.
तसे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेच्या काळात रोमन साम्राज्य खूप व्यापक स्वरुपात पसरलेले होते त्यामुळे कुठे ना कुठे तरी ख्रिस्ती धर्मियांचा छळ चालूच असायचा. ह्या छळवादांपैकी एकूण ८ महत्त्वाच्या घटना ख्रिस्तसभेने आपल्या रक्तरंजित इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत.
ख्रिस्तसभा ह्या रक्तसाक्ष्यांचा आज विशेष सोहळा दोन कारणास्तव साजरा करते. पहिले कारण म्हणजे रक्तसाक्षींचे रक्त हे श्रद्धेचे बीज आहे. हे आपल्याला पटावे जी श्रद्धा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे ती श्रद्धा जोपासण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेचे  मूल्य खूप मोठे आहे. दुसरे कारण म्हणजे श्रद्धेची जोपासना करणे ही काही गुलाबी गालिचावरून केलेली मृदू मुलायम वाटचाल नव्हे. ती तारेवरची कसरत आहे. प्रसंगी आपल्याही श्रद्धेची कसोटी पाहिली जाते. त्यावेळी आपल्याला आपल्या विश्वासाशी एकनिष्ठ राहता यावे म्हणून या रक्तसाक्षींची खास आठवण ख्रिस्तसभा करते.
✝️   
पहिले वाचन :आमोस  ७:१०-१७
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जा, माझ्या लोकांना संदेश सांग."

बेथेल येथील याजक अमस्या याने इस्राएलचा राजा यराबाम याला निरोप पाठवला की, "इस्राएली घराण्याच्या भरवस्तीत आमोसने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत. कारण आमोस म्हणतो, 'यराबाम तरवारीने मरेल, आणि इस्राएलला त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील.'
मग अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे लोकांना संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उबंराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, 'जा, माझे लोक इस्राएल यांस संदेश सांग.'
“तर आता परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस, इस्राएलविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस, म्हणून परमेश्वर सांगतो: 'तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र आणि तुझ्या कन्या तरवारीने पडतील, तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अंमगळ देशात मरशील आणि इस्राएलला त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील.'
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १८:८-११
प्रतिसाद :  परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे,
 ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
 तो भोळ्याना समंजस करतो.

२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते. 

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
 ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, 
ते संपूर्णतः न्याय्य आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या 
राशीपेक्षा इष्ट आहेत,
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या 
मधापेक्षा गोड आहेत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता 
हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो, 
म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे 
निर्माण होणारी आशा कोणती
 ही तुम्ही ओळखून घ्यावी.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ९:१-८
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
 “ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. "

येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगराला जाऊन पोहोचला. मग पाहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता ? कारण 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे' असे बोलणे, किंवा 'उठून चाल' असे बोलणे ह्यातून कोणते सोपे ? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून" मग तो पक्षपाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा." मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : परमेश्वर आम्हा मानवांना नेहमीच आपल्याला जे पाहिजे त्यापेक्षा जास्त देऊन आश्चर्यचकित करीत असतो. आजच्या शुभवर्तमानात, येशूला दिव्यांग असलेल्या व्यक्तीचा अपमान केला जातो त्याची जाणीव आहे. दिव्यांगत्व हे पूर्वजांना केलेल्या पापामुळे असलेला शाप किंवा शिक्षा म्हणून मानले जात |होते. येशू दिव्यांग व्यक्तीला बरे करून त्याला पुन्हा समाजात मानाचे स्थान मिळवून देतो. जे पापी म्हणून ओळखले जात होते. ज्यांना पापी म्हणून समाजातून नाकारले जात होते. त्यांच्या पापांची क्षमा करून, येशू पापी मानले जाणारे लोकांवर सुद्धा प्रेम करतो हे शिकवितो. ह्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की, देव कोणालाही शाप देत नाही व परमेश्वर हा प्रेमळ व दयाळू  पिता आहे. येशू माणसाला त्याची मानवी प्रतिष्ठा मिळवून देतो. येशू या पृथ्वीवर आमच्या वेदना, अपमान आणि दुःख दूर करण्यासाठी आला आहे. आज तुम्ही येशूकडे या, म्हणजे तो तुम्हाला विसावा देईल आणि तुमचे आजार व जखमा करील, "मी तुम्हाला बरे करणारा परमेश्वर  आहे." (निर्गम १५:२६)

प्रार्थना : हे प्रभू येशू, पापांबद्दल पश्चाताप करण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या