सामान्यकाळातील १३व सप्ताह
बुधवार २९ जुन २०२२
“मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईलं आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
संत पीटर
पेत्र येशूचा अत्यंत जवळचा शिष्य होता. डोंगरावरील येशूच्या रुपांतरसमयी (गौरवाच्या वेळी) गेथशेमाने बागेत (दुःखाच्या समयी) आणि याईरच्या कन्येला मरणातून जिवंत करताना (आनंदाच्या घटनेसमयी) येशू पेत्रला हटकून आपल्याबरोबर घेऊन गेला. रात्रभर कष्ट करूनही काहीही मासे न पकडणाऱ्या पेत्रला येशू आज्ञा करतो आणि जाळी फाटू लागेपर्यंत त्यांना मासळी मिळते. पुनरुत्थानाचा पहिला साक्षीदार म्हणून योहानबरोबर आपल्याला पेत्रसुद्धा शुभवर्तमानात भेटतो.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात अध्याय २ मध्ये आपण पेन्टेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा वृत्तांत वाचतो. त्यानंतर पेत्रने तीन प्रवचने दिली (प्रे. कृ. २, ४, १०) त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत तीन हजाराहून अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेतला. ज्युदासची रिकामी जागा भरून काढण्यासाठी घेतल्या गेलेल्या निवडणुकीचे नेतृत्व पेत्रने केले. यहुदी लोकांना आणि परराष्ट्रीयांना त्यानेच प्रथम ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. येशूच्या नावाने पहिले चमत्कार पेत्रने करून दाखविले (प्रे. कृ.३).
इ. स. ४९-५० साली येरुशलेम येथे भरलेल्या पहिल्या ख्रिस्ती धर्मपरिषदेत निर्णायक महत्त्वाचे भाषण पेत्रने केले. पेत्रने लिहिलेली दोन पत्रदेखील त्याचे ख्रिस्तसभेतील प्रमुखपद अगदी स्पष्ट करून सांगतात.
पुढे निरो राजाच्या अमदानीत व्हॅटिकन हिलेच्या बागेमध्ये पेत्र अथवा पीटर ह्यांना क्रूसावर उलटे टांगवून ठार मारण्यात आले. ते वर्ष होते इ. स. ६७ !
संत पौल
प्रेषित व रक्तसाक्षी (६७)
देऊळमाता दरवर्षी २५ जानेवारी रोजी संत पौलचे परिवर्तन हा सण साजरा करीत असते. (अधिक माहिती : २५ जानेवारी) रोममध्ये पीटर आणि पौल या महान प्रेषितांना एकाच दिवशी रक्तसाक्षीत्वाचे मरण आले अशी प्राचीन ख्रिस्तसभेची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. २९ जून २५८ रोजी त्यांच्या शरीरांचे अवशेष छळवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्तपणे (संत) सेबेस्टीयनच्या गुहेमध्ये नेण्यात आले म्हणून हा दिवस त्यांच्या सणाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे.
शुभवर्तमानकार योहान ह्यांच्यानंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत असलेला सर्वात विद्वान प्रेषित म्हणून पौलकडे आदराने पाहिले जाते. ग्रीक आणि यहुदी संस्कृतींशी परिचित असलेल्या पौलला देवाने परराष्ट्रीयांना ख्रिस्ती धर्माची शुभवार्ता सांगण्यासाठी निवडलेले होते आणि हे कार्य त्याने अत्यंत कर्तव्यदक्षतेने पार पाडले..
दमास्कसच्या वाटेवर भेटलेल्या ख्रिस्तासाठी त्याने अनेक हालअपेष्टा सहन केल्या आणि कधी पायी तर कधी समुद्रमार्गे प्रवास करून त्याने ठिकठिकाणी ख्रिस्तमंडळ्या स्थापन केल्या. त्याने लिहिलेली १३ पत्रे गेली दोन हजार वर्षे अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेला अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन करीत आहेत. ती पत्रे पुढीलप्रमाणे :
१) प्राचीन पत्रे (२) १+२ थेस्सलोनीका.
२) प्रमुख पत्रे : रोम, १+२ करिंथ, गलती.
३) तुरूंगातील पत्रे : इफिस, फिलिप्पी, फिलोमोन, कलस्से. ४) पाळकीय पत्रे : १+२ तीमथी, तीत.
पौलने केवळ आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या आणि विद्धत्तेच्या बळावर ख्रिस्ताचे तत्वज्ञान जगाला देऊ केले असते तर तो इतका प्रभावी झाला नसता परंतु प्रभू येशूवरील नितांत प्रेमाविषयी आणि त्याच्या 'रहस्यमय शरीर' असलेल्या ख्रिस्तसभेवरील आत्यंतिक प्रेमापायी त्याच्यामध्ये हळूवारपणा आणि संवेदनक्षमता विकसित झालेली आढळते. देवाने त्याला अलौकिक साक्षात्काराची देखील प्रचिती दिलेली होती.
निरो राजाच्या छळाच्या समयी त्याला अटक करण्यात आली आणि इ. स. ६७ साली रोम शहराच्या प्रवेशद्वारापाशी त्याचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.
✝️
पहिले वाचन : प्रषितांची कृत्ये १२:१-११
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन १२:१-११ “आता मला खरोखर कळले की, प्रभूने हेरोदाच्या तावडीतून मला सोडवले आहे."
हेरोद राजाने मंडळीतल्या काहीजणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला, त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, "लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, "कपडे कर आणि पायात वहाणा घाल,” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला अंगरखा घालून माझ्यामागे ये." तो निघून त्याच्यामागे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना, आपण दृष्टान्त पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तोच देवदूत त्याला सोडून गेला.
मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, "आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:२-९
प्रतिसाद : परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो.
१.) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन,
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल,
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील.
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.
२.) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा.
आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि
त्याने माझा स्वीकार केला,
त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.
३. )ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले,
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला
आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
४)परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांभोवती
छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य !
दुसरे वाचन २ तिमथी ४:६-८, १७-१८
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे."
आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुध्द ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे. तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल.
तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर
मी आपली मंडळी रचीन आणि
तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे
काहीच चालणार नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १६:१३-१९
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन.'
फिलिप्पैच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, "मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?” ते म्हणाले, “कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी यिर्मया, किंवा संदष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात.” तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी ! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईलं आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : जर आपण आपल्या जीवनाकडे पाहिले तर आपण हे ओळखू शकतो की, दुसरे आपल्याला कोण म्हणून ओळखतात? आपल्या कुटुंबातील सदस्य, जे आपल्या जवळचे आहेत, आपल्या विषयी काय बोलतात, ह्याकडे आपण कधी लक्ष देतो. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो, की लोक मला कोण म्हणून ओळखतात. ह्या प्रश्नावर पेत्राचे उत्तर ऐकून येशूला आश्चर्य वाटते. बाहेरील लोकांपेक्षा, येशूचे शिष्यगण त्याला जवळून ओळखत होते. पेत्र येशूच्या खूप जवळचा होता म्हणून त्याला माहित होते की, येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. आज देऊळमाता संत पेत्र आणि पॉल ह्यांचा सण साजरा करीत आहे. त्यांनी येशूचा जवळून अनुभव घेतला आणि तो देवाचा खरा पुत्र आहे अशी सुवार्ता गाजवली. स्वतःला प्रश्न विचारूया, आपण येशू ख्रिस्ताला जवळून ओळखतो का ? आपण संत पेत्रासारखे येशूला देवाचा पुत्र म्हणून संबोधतो काय ? जर आपल्याला येशूने हाच प्रश्न विचारला तर आपण संत पेत्रासारखे येशूला देवाचा पुत्र म्हणून संबोधू शकतो काय ? संत पॉलसारखे आपण येशू देवाचा पुत्र आहे अशी सुवार्ता गाजवतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, संत पेत्रासारखी श्रद्धा व संत पौलासारखा सुवार्ता प्रसाराचा उत्साह आम्हांला लाभावा म्हणून आम्हांस कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या