Marathi Bible Reading | Tuesday 28 June 2022 | 13th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १३व सप्ताह 

मंगळवार २८ जुन २०२२

अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे?


संत आयरेनिअस

महागुरू रक्तसाक्षी आणि धर्मपाल (१३०-२००)
 

चिंतन : आपण जेव्हा सामुदायिक प्रार्थनेसाठी एकत्र जमतो तेव्हा आपण एकाच ख्रिस्तशरीराचे अवयव म्हणून एकत्र येत असतो. संत आयोनिअस


प्रभू येशू त्यांच्याबरोबर होता तरी शिष्यांना  वादळाची भिती वाटली. आपण सुद्धा जीवनातील अनेक प्रकारच्या वादळांमध्ये व संकटांमध्ये सापडतो. आपल्याला सुद्धा अनेक प्रकारची भिती ग्रासत असते. मात्र प्रभू येशू आपल्या सोबतीला आहे, हे आपण विसरतो. येशूने म्हटले आहे, 'पाहा, युगाच्या समाप्तिपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे' (मत्तय २८:२० ).  येशू आपल्याला सर्व  संकटातून वाचविणारा प्रभू आहे, त्याची महानता आपण समजत नाही.  जीवनात संकटे, वादळे, दु:ख, अपयश व आजार हे येणारच आहेत,तरी सुद्धा त्या सर्वावर विजय मिळविणारा प्रभू येशू आपल्या सोबतीला आहे.
✝️   
पहिले वाचन आमोस  ३:१-८, ४:११-१२ 
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल ?"
इस्राएल वंशजहो, तुम्हांविरूद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी इजिप्त देशातून बाहेर आणले त्यांच्याविरूद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे:
“भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्याबरोबर मी परिचय केला, म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्याबद्दल मी तुमची झडती घेईन."
“पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघेजण एकमेकांबरोबर चालतील काय ? पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय ? पाशच मांडला नसल्यास पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय ? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जमिनीवरून वर उडेल काय ? नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरणार नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय ? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण ? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?
“देवाने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे. तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झाला तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत." असे परमेश्वर म्हणतो.
"म्हणून हे इस्राएल, मी तुला असेच करीन; मी तुला असेच करीन; म्हणून हे इस्राएल आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध राहा."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५:५-८
प्रतिसाद :  प्रभो, तू मला आपल्या न्यायपथाने ने.

१)  तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस; 
दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणारे नाहीत.

२) सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे.
असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. 
खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.

३)  मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन. 
तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे 
तोंड करून दंडवत घालीन.



जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभु म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे;
 कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून 
घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ८:२३-२७
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“येशू उठला आणि त्याने वारा आणि समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले."
मग येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, "प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, "अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे?" मग उठून त्याने वारा आणि समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही ह्याचे ऐकतात ?"
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आपल्या जीवनात सुरळीत चाललेल्या प्रवासात अनेक प्रकारची वादळे, अडथळा आणतात. ती आम्हाला घाबरवतात. ती आमचा संपूर्ण नाश करणार असे आपल्याला वाटते. आपण शक्तिहीन होतो आणि या वादळां व्यतिरिक्त काही पाहण्याची आशा आपण गमावतो. वादळे आपल्या बाहेरील आणि आंतरिक जीवनात, अडथळे निर्माण करतात. बेरोजगारी, घटस्फोट, अपघात, उध्वस्त झालेली कुटुंबे, मृत्यू इत्यादी वादळे आपले जीवन हताश करतात. तथापि, शुभवर्तमान आपल्याला, अशा देवावर विश्वास ठेवण्याची आठवण करून देते, जो सर्वप्रकारची वादळे शांत करू शकतो. आपल्याकडे आपला रक्षणकर्ता, जीवनदाता व आशास्तंभ असताना, आपण सर्व प्रकारच्या वादळांवर मात करू शकतो. तो दुसरा कोणी नसून आपला परमपिता व देव आहे. शुभवर्तमान आपल्याला आपल्याबरोबर प्रवास करणाऱ्या देवावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. तो वादळ दूर करील आणि या वादळांतून आपल्याला पुढे घेऊन जाईल. प्रभू येशू आपल्या जीवनातील अडथळे व वादळांची काळजी घेईल हे जाणून घ्या. आम्हाला फक्त त्यांची मदत घ्यावी लागेल. आपल्या जीवनात वादळ येतात तेव्हा आपण काय करतो ? थोडावेळ शांत राहून येशू जवळ मदत मागूया.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, जीवनातील वादळ सदृश्य परिस्थितीत तू आमच्या  बरोबर आहेस, असा विश्वास दृढ करण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या