Marathi Bible Reading | Monday 27th June 2022 | 13th Week In Ordinary Time

सामान्यकाळातील १३व सप्ताह 

सोमवार २७ जुन २०२२

“खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही." 

आलेक्झांड्रीयाचे  संत सिरील
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३७०-४४४)
 प्रभू येशूने म्हटले आहे, 'तू माझ्या मागे ये.' प्रभूच्या मागे जाणे म्हणजे त्याच्या  वचनांप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आचरण करणे होय. प्रभूच्या मागे जाणे म्हणजे  जीवनात येणाऱ्या सर्व संकटांना, दु:खांना व आजारांना सामोरे जाणे. प्रभूच्या मागे जाणे म्हणजे ऐहिक जगातील नाशवंत गोष्टींचा त्याग करणे. प्रभूच्या मागे जाणे म्हणजे आपल्या सर्व आप्तेष्टांपासून दूर जाणे. प्रभूच्या मागे जाणे म्हणजे  स्वतःला रिक्त करणे व येशूमध्ये जीवन जगणे. प्रभूच्या मागे जाणे म्हणजे प्रेम, दया, क्षमा, शांतिचा पुरस्कार करणे. शेवटी प्रभूच्या मागे जाणे म्हणजे आपला  वधस्तंभ उचलून प्रभूला अनुसरणे.
✝️   
पहिले वाचन आमोस  २:६-१०.१३-१६ 
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "ते गरिबांची मस्तके धुळीत तुडवतात."

परमेश्वर म्हणतो. "इस्राएलचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण ते रुप्यासाठी धार्मिकाला विकतात, एका जोड्यासाठी गरिबाला विकतात गरिबांची मस्तके धुळीत तुडवतात. ते दीनदुबळ्यांच्या मार्गात आडवे येतात; माझ्या पवित्र नावाला बट्टा लावण्याकरिता मुलगा आणि बाप एकाच तरुणीकडे जातात, गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ झोपतात आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षरस प्राशन करतात.'
“मी तर त्यांच्याआधी अमोरी लोकांचा संहार केला, त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ आणि खालून त्यांचे मूळ नासवले. मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास इजिप्त देशातून आणले आणि चाळीस वर्षे रानातून फिरवले.
"पाहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हांला दाबीन. जो चपळ त्यास पलायन साधावयाचे नाही, बळकट आहे त्यास आपली शक्ती चालवता यावयाची नाही. वीराला आपला जीव वाचवता येणार नाही; धनुर्धान्याला उभे राहता येणार नाही. चपळ पायांच्या इसमाला आपला बचाव करता येणार नाही. घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही; वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी उघडाबोडका पळून जाईल." असे परमेश्वर म्हणतो.हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५०:१६-२३
प्रतिसाद :  अहो देवाला विसरणाऱ्यांनो, ह्याचा विचार करा.

१) “माझे नियम जाहीर करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ? 
तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, 
माझी वचने मागे झुगारून देतोस."

२) "तू चोर पाहिला की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो.
 तू व्यभिचारी माणसाचा साथीदार आहेस, 
तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहे, 
तुझी जीभ कपटाची योजना करते."

३) "आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस, 
तू आपल्या सख्या भावाची चहाडी करतोस; 
असे तू केले तरी मी उगा राहिलो, 
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले."

४) "अहो देवाला विसरणाऱ्यांनो, ह्याचा विचार करा,
 नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, 
तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडावयाचा नाही.
 जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो. 
आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला 
मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन."



जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
 माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ८:१८-२
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"तू माझ्यामागे ये."

मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन. येशू त्याला म्हणाला, “खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही." मग त्यांच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरायला जाऊ द्या. परंतु येशूने त्याला म्हटले, तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आजच्या शुभवर्तमानात कोणी एक शास्त्री येशूकडे जाऊन म्हणतो, “गुरूजी, जिथे कोटे आपण जाल तिथे मी आपल्यामागे येईल.” ' परंतु येशू त्या शास्त्र्याला त्याच्या मागे जाण्याचा अर्थ काय आहे याची आठवण करून देतो. मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. येशूचे अनुकरण करणे म्हणजे स्वतःचे काहीच नसावे. येशूबरोबर जगणे म्हणजे आपल्याकडे भौतिक वस्तूंच्या बाबतीत काहीही नसते अशी परिस्थिती स्वीकारणे. याचा अर्थ की आपण पूर्णपणे देवावर अवलंबून राहणे. त्या शाख्याने येशूचे आव्हान स्वीकारले की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु महत्त्वाचे म्हणजे की, “मला येशूचे अनुकरण करण्याची इच्छा आहे काय ?” तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे. हे ऐकल्यावर मला काय वाटते? तो आपल्याला मूळात त्याच्या मागे येण्यासाठी आमंत्रण देत आहे का? आपण ते आमंत्रण स्वीकारणार का ? आपण सगळे काही सोडून येशूचे अनुकरण करणार का? ज्या गोष्टी आपल्याला येशूपासून दूर नेतात त्या गोष्टी आपण सोडून येशूचे अनुयायी होणार का ? ही एक आव्हानात्मक निवड असेल.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अंत:करणापासून अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा, धैर्य व शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या