सामान्यकाळातील १३व सप्ताह
रविवार २६ जुन २०२२
"मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर."
येशूला अनुसरणे जगाच्या दृष्टीने कठीण आहे. मात्र अशक्य नाही ह्याची जाणीव संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात करुन देत आहे. संत पौल मार्गदर्शनपर सल्ला देताना म्हणत आहे की, 'प्रभू येशूच्या तारणात टिकून राहा. विशेषत: संत पौल आपल्याला म्हणत आहे की, 'आत्म्याच्या प्रेरणेने चाला.' म्हणजेच जगातील प्रलोभने व दैहिक वासनांवर विजय मिळवता येईल. आपण ख्रिस्ती ह्या नात्याने आपले पाचारण ओळखू या.
✝️
पहिले वाचन : १ राजे १९ : १६,१९-२१
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन “अलिशा उठून एलियाबरोबर गेला."
परमेश्वराने एलियाला म्हटले, "जा; आबेल-महोला येथील शाफाटचा पुत्र अलिशा याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. म्हणून तो येथून निघाला तेव्हा शाफाटचा पुत्र अलिशा भेटला; तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर घातला. तेव्हा तो बैल सोडून •एलियाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापाचे चुबंन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन." तो त्याला म्हणाला, “परत जा, मी कुठे तुला अभिषेक केला आहे ?" मग तो त्याच्यामागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आउते पेटवून त्यांवर त्याचे मांस भाजले. ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला आणि त्याची सेवा करू लागला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-११
प्रतिसाद : प्रभो, माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे.
मी परमेश्वराला म्हटले, "तूच माझा प्रभू आहेस"
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहे;
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
२) परमेश्वराने मला बोध केला आहे,
त्याला मी धन्यवाद देतो.
माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन करते.
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही
माझा आत्मा उल्हासतो; माझा देहही सुरक्षित राहतो.
३) म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे
कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
तू आपल्या भक्तांना कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील;
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे,
तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहे.
दुसरे वाचन पौलचे गलतीकरांस ५:१.१३-१८
वाचक: पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"स्वतंत्रतेकरिता तुम्हाला बोलावण्यात आले." स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. "जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा," हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांस चावता आणि खाऊन टाकता; तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; ही परस्परविरुद्ध आहेत; ह्यासाठी जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहा, म्हणजेच नियमशास्त्राच्या अधीन नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझ्या पुत्रांची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर. आलेलुया !
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:५१-६२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने येशूने तिकडे आपले तोंड वळवले. आपण जेथे जाल तेथे मी आपल्यामागे येईन."
येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरूशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपणापुढे जासूद पाठवले, तेव्हा ते त्याच्यासाठी तयारी करावयास शोमरोन्यांच्या एका गावात गेले; पण ते तेथे थांबले नाहीत. कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले; "प्रभुजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय ?" त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले.
ते वाटेने चालत असता कोणाएकाने त्याला म्हटले, "आपण जेथे कोठे झाल तेथे मी आपल्यामागे येईन." येशू त्याला म्हणाला, "खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, "माझ्यामागे ये." परंतु तो म्हणाला, "प्रभुजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयला जाऊ द्या." तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर." त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभुजी, मी आपल्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या." येशूने त्याला म्हटले, "जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : बायबलमध्ये आब्राहाम, मोशे, शमुवेल, दावीद, संदेष्टे, मत्तय, पौल अशा विविध व्यक्तींच्या पाचारण कथा वर्णन करण्यात आलेल्या आहेत. आजची वाचने पाचारणाचे तीन पैलू प्रकाशात आणतात :
अ. पाचारण ही एक नवी सुरुवात असते. त्यासाठी भूतकाळापासून फारकत घ्यावी लागते : आजच्या पहिल्या वाचनात अलिशाच्या पाचारणाची कथा वर्णन करण्यात आलेली आहे.|एलिया संदेष्ट्या करवी परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे हे समजताच अलिशाने आपले बैल कापले, औताच्या लाकडावर त्यांचे मांस शिजवले, सोबत्यांना मेजवानी दिली आणि सर्वकाही तसेच सोडून तो एलियाचा सेवक बनला.
ब. जागतिक गोष्टी आणि देवाची हाक यांमध्ये प्राधान्य ठरवावे लागते : आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू जेरूसलेमकडे आपले तोंड वळवतो. वाटेवरील शोमरोनी त्याचा स्वीकार करीत नाहीत. तीन व्यक्ती त्याच्या मागे येऊ पाहतात. परंतु त्यांना आपले कर्तव्य, आपली नाती-गोती, आणि खडतर जीवन अशा अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी प्राधान्य स्पष्ट असावे लागते.
क. स्वातंत्र्याचा जबाबदारपणे वापर करावा लागतो : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल गलतीकरांना आपल्या स्वातंत्र्याचा सुयोग्य वापर करण्यास पाचारण करतो, आपल्या शारीरिक गरजा भागविण्यासाठी नव्हे तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी माणसाने आपले पाचारण वापरावे असे तो सुचवितो.
आत्मपरीक्षण : मला माझे पाचारण समजले आहे का? ते मी कशाप्रकारे फुलवितो / ते?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला प्रामाणिकपणे व निष्ठेने अनुसरण्यास व तुझा खरा अनुयायी बनण्यास मला प्रेरणा, सामर्थ्य व पवित्र आत्म्याठायी धैर्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या