सामान्यकाळातील १९ वा सप्ताह  

शुक्रवार  १२ ऑगस्ट २०२२

पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.


 संत हिप्पोलिटस व पोन्तिआतुस
-धर्मगुरू, रक्तसाक्षी व परमगुरु रक्तासाक्षी ( २३५)

पती-पत्नीमधील अबाधित ऐक्य देवाने प्रस्थापित केलेले आहे. अगदी निर्मितीपासून विवाहाची योजना परमेश्वराने तयार केली आहे. देवाची निर्मिती व त्याची मानवासाठी तयार केलेली योजना आपल्या बुध्दी, ज्ञान व आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. देव  आपल्या अपूर्णतेस पूर्ण स्वरुप देऊन त्याचा अविष्कार घडवित असतो. विशेष म्हणजे पती-पत्नीमधील प्रेमामध्ये देव प्रीतीची प्रतिमा दिसून येते. मानवालासुध्दा कृपादान देऊन देवाने नव निर्मितीची देणगी दिलेली आहे.
आज सर्व पती-पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनावर चिंतन करावे.  विशेषतः लग्न संस्कार स्वीकारताना पती-पत्नींनी परमेश्वराच्या संमतीने परस्परांना दिलेल्या वचनांवर सखोल मनन-चिंतन करणे गरजेचे आहे.  कौटुंबिक जीवनातील सर्व आव्हाने पेलण्यास व सर्वार्थाने खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास कृपा व धैर्य लाभावे म्हणून प्रार्थना करु या.


✝️   
पहिले वाचन : यहेज्केल १६:१-१५.६०.६३
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
  “मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्यं अप्रतिम झाले.”
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, येरुशलेमची अमंगळ कृत्ये त्याच्या लक्षात आणून दे. असे म्हण, प्रभू परमेश्वर येरुशलेमला म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी आणि तुझी आई हित्तीण होती. तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही आणि तुला बाळंत्यात गुंडाळले नाही. तुझी करुणा येऊन यातले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही, तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते."
"मी तुझ्याजवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो, “तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा! शेतातील रोपाप्रमाणे तुझी वृद्धी होवो! आणि तशी तुझी वाढ झाली. तू वाढून उंच झालीस आणि पूर्ण कौमार्यावस्थेत पोहोचलीस. तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले तरी तू उघडीनागडी होतीस.”
"मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तो ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली; प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस. मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझ्यावरचे रक्त धुऊन काढले आणि तुला तेलाने माखले. तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेवविली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले आणि तुला रेशमी ओढणी पांघरवली. मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात बांगड्या घातल्या आणि गळ्यात गळसरी घातली. मी तुझ्या नाकात नथ घातली, कानात वाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले. तू सोन्यारुप्याने नटलीस, तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम आणि जरतारी यांचा होता; तुला भोजनाला सपीठ, मध आणि तेल ही असत. तू अतिसुंदर होतीस आणि तू राजवैभवाला पोहोचली होतीस. तुझ्या सौंदर्यांमुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली. कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तू तर आपल्या सौंदर्यांवर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस, आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविलास. तरी मी तुझ्या तारुण्यात तू तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार करीन. तू जे सर्व केलेस त्यांची मी क्षमा करीन, म्हणजे तू मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जित होशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :यशया २१:२-६
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू माझे सांत्वन केले आहेस.

१) पाहा, देव माझे तारण आहे, 
मी विश्वास ठेवतो, भीत नाही. 
कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे, 
तो मला तारण झाला आहे.

२) तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. 
त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराला धन्यवाद द्या.
 त्याच्या नामाचा जयघोष करा, 
राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा.

३) त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा, 
परमेश्वरापुढे गायन करा, 
कारण त्याची करणी प्रतापमय आहे.
 हे सर्व पृथ्वीवर जाहीर होवो.
अगे, सियोननिवासीनी, जयघोष कर, गजर कर, 
कारण इस्राएलचा पवित्र प्रभू तुझ्याठायी थोर आहे.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे.. 
मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १९ : ३-१२
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. "

परुशी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, "कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?" त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह अशीआहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, मग सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली?" तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्य बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.”
शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.” तो त्यांना म्हणाला, “सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत. पण ज्यांना हे दान दिले आहे, तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : 'क्षमा किती वेळा करावी ?' असा एक प्रश्न पेत्र विचारीत आहे. 'साताच्या सत्तर वेळा' येशू क्षमा करायला सांगत आहे. क्षमेचे महत्व अबाधित आहे हे दाखविण्यासाठी येशू कृतघ्न कर्जदाराचा दृष्टांत देत आहे. एका लक्षावधी कर्जदाराला राजाने कर्ज सोडले. त्याने त्याच्या दासाला थोडक्या कर्जासाठी तुरूंगात टाकले. हे राजाला कळले तेव्हा त्याला वाईट वाटले. त्या कर्जदाराला कर्ज फेडीपर्यंत वसुलीवाल्यांच्या हवाली केले. राजाने लक्षावधी कर्जदारावर दया दाखवली. कर्जदारानेही दासावर दया दाखवायला हवी होती. आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आपण एकमेकांना क्षमा केली नाही तर देव देखील आपल्याला क्षमा करणार नाही. क्षमा देवाठायी आहे. क्षमा येशूची शिकवण आहे. क्षमा पवित्र आत्म्याचे पवित्र फळ आहे. क्षमा करणारा दैवी.. देवाठायी असतो. क्षमा करणारा महान बनतो. मला कोणाची क्षमा मागणे जड जाते ?
प्रार्थना : हे सर्वसमर्थ व प्रेमळ प्रभू परमेश्वरा सर्व पती-पत्नींना तू आशिर्वादित  कर, कौटुंबिक जीवनावर चिंतन करुन तुझ्या योजनेप्रमाणे जीवन जगण्यास  त्यांना, प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️