Marathi Bible Reading | Thursday 11th August 2022 | 19th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १९ वा सप्ताह  

गुरुवार  ११ ऑगस्ट २०२२

“सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.



 संत क्लेअर 
कुमारिका (११९३ - १२५३)

इ. स. १२१२ साली असिसी शहरातील संत जॉर्जच्या चर्चमध्ये असिसीच्या संत फ्रान्सिस ह्यांनी उपवासकालीन प्रवचने दिली. त्या प्रवचनाचा "क्यारा नावाच्या एका अठरा वर्षीय मुलीवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विचार सरणीनुसार व जीवन-पद्धतीनुसार साधेपणाचे जीवन जगण्याची तीव्र उत्कंठा तिच्यात निर्माण झाली.
पुढे त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार ती झावळ्यांच्या रविवारच्या रात्री आपल्या राजमहालातून गुपचूप बाहेर पडली. सोबत तिची मावशी बियांका आणि आणखी एक मैत्रीण होती. लहानशा प्रार्थनामंदिरात संत फ्रान्सिस आणि त्यांचे धर्मबंधू तिच्यासाठी थांबलेले होते. इथेच तिने त्या सर्वांच्या साक्षीने आपले सोनेरी केस कापून घेतले. आपली भरजरी वस्त्रे काढून त्याऐवजी वैराग्याची वस्त्रे परिधान केली आणि ख्रिस्ताच्या नावाने गरिबीचे व्रत स्वीकारले. संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनानुसार तिला तात्पुरते जवळच्याच बेनेडिक्टाईन मठात ठेवण्यात आले.
ही बातमी तिच्या वडिलांच्या कानी पडताच त्यांचे रक्त उसळले. त्यांनी क्लेअरच्या लग्नाची व्यवस्था केलेली होती. तिच्यासाठी योग्य असा वर निवडलेला होता. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याची मनोस्वप्ने ते पाहात होते. त्यामुळे त्यांना ह्या घटनेने धक्का बसला. बेनेडिक्टाईन कॉन्व्हेंटमधून तिला पळवून नेण्याचा मनसुबा देखील त्यांनी आखला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. क्लेअर आता पावित्र्याच्या व गरिबीच्या व्रताशी एकनिष्ठ राहण्यासाठी एका विशिष्ट संघाच्या स्थापनेचा विचार करू लागली.संत फ्रान्सिसला झालेल्या साक्षात्कारातून संत डेमियन चर्चच्या शेजारी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या प्रार्थनामंदिरात आता क्लेअर अगदी साधेसुधे जीवन जगू लागली. पंधरा दिवसांच्या आतच तिची धाकटी बहीण आग्रेस तिला येऊन मिळाली. 'पुअर क्लेअर्सची' संस्था हळूहळू वाढीस लागली. पुढील काही वर्षात क्लेअरची मावशी बियांका, तिची आई धन्यवादित ऑर्तोलाना, आणखी एक बहीण बियाट्रीस ह्यांनीसुद्धा क्लेअरचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारले व त्या तिच्या संघात येऊन दाखल झाल्या.
क्लेअरच्या उर्वरित आयुष्यात ४० वर्षांत युरोपभरातील अनेक देशांमध्ये
गरीब मुलीच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या संघाच्या पुष्कळशा शाखा उघडल्या गेल्या. असिसी येथील या संघाचे प्रमुख केंद्र मात्र क्लेअरच्या उतरत्या वयातही अध्यात्माचे केंद्र बनून राहिले. दोन पोप, अनेक कार्डिनल आणि विशप्स तिचा सल्ला घेण्यासाठी येत असत. तिच्या अधिकृत निवृत्तीनंतरही असंख्य लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत.
'पुअर क्लेअर्स' संस्थेची आचारसंहिता प्रारंभी लिखित स्वरूपात नव्हती.. संत फ्रान्सिसने सांगितलेल्या तत्त्वांनुसार व क्लेअरच्या मार्गदर्शनाखाली हा संघ वाढत होता. १२१९ साली कार्डिनल युगोलिनी (पुढे पोप ग्रेगरी नववे) ह्यांनी संघाच्या गरिबीच्या व्रतात शिथिलता आणण्याचा प्रयत्न केला व तशी संहिता तयार केली. नऊ वर्षे त्यांनी क्लेअरची मनधरणी केली परंतु आत्यंतिक गरिबीचे व्रत घेतलेल्या साध्वी स्त्रीने ठामपणे परंतु प्रेमाने त्यांना नकार दिला. त्याहीनंतरच्या पोपमहाशयांनी गरिबीच्या व्रतात शिथिलता आणण्याचा प्रयत्न केला; परंतु क्लेअर आपल्या साधेपणाच्या जीवनाशी खंबीर राहिली. शेवटी पोप इनोसेंट चौथे ह्यांनी अधिकृतरित्या संघाची आचारसंहिता घोषित केली.
दीर्घकाळच्या आजारानंतर वयाच्या ५९व्या वर्षी १२ ऑगस्ट १२५३ रोजी साक्षात गरिबीचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली 'संत फ्रान्सिसचे चिमुकले फूल' मानली गेलेली क्लेअर आपल्या स्वर्गीय निजधामी निघून गेली. त्यावेळी पोप इनोसेंट चौथे व त्यांच्या दरबारातील सर्व उच्च अधिकारी, तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अवघ्या दोनच वर्षांनी 'पुअर क्लेअर्स'ची ही पवित्र संस्थापिका पोपमहाशयांनी संतपदाने सन्मानित केली. तिच्या थडग्यावर असिसी येथे उभारलेले चर्च आतादेखील हजारो भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे.
इ. स. १२२४ मध्ये फ्रेडरिक दुसरा ह्याच्या सारासेन सैन्याने जेव्हा असिसीशहरावर हल्ला चढविला तेव्हा क्लेअर हिने अतिपवित्र ख्रिस्तशरीर असलेला प्याला आपल्या हाती घेऊन उंचाविला तेव्हा सर्व सैनिक आपोआप गर्भगळीत झाले. त्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला. त्यामुळे काही चित्रांमध्ये क्लेअर हातात सिवोरियम (पवित्र भाकरींनी भरलेला प्याला) असलेल्या अवस्थेत दाखविण्यात येते.
अतिपवित्र साक्रामेंतातील येशूविषयी तिच्या मनात आत्यंतिक भक्तीभाव भरून उरलेला होता. संत फ्रान्सिसने कॉन्व्हेन्ट शेजारी असलेल्या ऑलिव्हच्या बागेत बसून आपले सुप्रसिद्ध सूर्यस्तोत्र रचलेले होते. शिवाय संत फ्रान्सिसने रचलेली दैनंदिन प्रार्थना तर क्लेअरला अगदी तोंडपाठ येत होती.
चिंतन : मला जसे वागवायचे तसे वागवा. मी माझी इच्छा सर्वस्वी देवाला अर्पण केलेली असल्याने मी पूर्णत: तुमचीच आहे. मला आता स्वतःची अशी इच्छा उरलेली नाही. संत क्लेअर

✝️   
पहिले वाचन : यहेज्केल  १२:१-१२
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस. त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, कारण ते फितुरी घराण्यातले आहेत. ह्याकरिता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यासाठी लागणारी सामुग्री सिद्ध कर आणि भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्याच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जा. न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल, ते तर बंडखोर घराण्यातले आहेत देशांतरासाठी जाताना सामुग्री बाहेर काढतात तसे तू भरदिवसा त्यांच्यादेखत आपले सामानसुमान बाहेर काढ आणि देशांतरासाठी निघतात तसा संध्याकाळी त्यांच्यादेखत निघून जा. त्यांच्यादेखत तटाला आरपार भोक पाड आणि त्यातून आपले सामानसुमान ने. त्यांच्यादेखत ते खांदयावर घे आणि अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा. तू आपले मुख झाक म्हणजे भूमी तुला दिसणार नाही, कारण मी तुला इस्राएल घराण्याला चिन्हवत नेमले आहे.”
मला आज्ञा झाली तसे मी केले. देशांतराला लागणारी सामुग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले आणि संध्याकाळी मी तटाला आरपार भोक पाडले. अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले आणि त्यांच्यादेखत ते मी खांदयावर घेतले.सकाळी परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू काय करतोस असे तुला त्या इस्राएल घराण्याने, फितुरी घराण्याने, म्हटले ना? त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो की हे देववचन येरुशलेममधील अधिपतींना आणि ज्या इस्राएल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्याला लागू आहे. असे म्हण की, मी तुम्हांला चिन्हवत आहे, मी त्यांना करून दाखवले तसेच त्यांना घडेल; ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील. त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांदयावर सामान घेऊन निघून जाईल, तो तट फोडून त्यातून बाहेर जाईल, तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसणार नाही.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ७८:५६-५९,६१-६२
प्रतिसाद : देवाची कृत्ये कधीही विसरू नका.

१) त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली 
आणि त्याच्याविरूद्ध बंड केले त्यांनी 
त्याचे निर्बंध पाळले नाहीत. 
आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून
ते फितूर झाले,
फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले.

२) त्याने आपल्या उच्चस्थानांमुळे त्याला 
राग आणला, हे पाहून देव कोपला,
त्याने इस्राएलचे नावच टाकून दिले.

३ )त्याने आपल्या बळाचा पाडाव होऊन दिला 
आणि आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले. 
त्याने आपले लोक तरवारीच्या हवाली केले, 
आपल्या वतनावर तो रुष्ट झाला.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
 तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १८ : २१-१९:१
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा क्षमा कर, असे मी तुला म्हणतो."
पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी ? सात वेळा काय ?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.
“स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे, त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, तो, त्याची बायको, आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर शेकेल येणे होते, तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.” पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय ? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील.
मग हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देनच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : 'क्षमा किती वेळा करावी ?' असा एक प्रश्न पेत्र विचारीत आहे. 'साताच्या सत्तर वेळा' येशू क्षमा करायला सांगत आहे. क्षमेचे महत्व अबाधित आहे हे दाखविण्यासाठी येशू कृतघ्न कर्जदाराचा दृष्टांत देत आहे. एका लक्षावधी कर्जदाराला राजाने कर्ज सोडले. त्याने त्याच्या दासाला थोडक्या कर्जासाठी तुरूंगात टाकले. हे राजाला कळले तेव्हा त्याला वाईट वाटले. त्या कर्जदाराला कर्ज फेडीपर्यंत वसुलीवाल्यांच्या हवाली केले. राजाने लक्षावधी कर्जदारावर दया दाखवली. कर्जदारानेही दासावर दया दाखवायला हवी होती. आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आपण एकमेकांना क्षमा केली नाही तर देव देखील आपल्याला क्षमा करणार नाही. क्षमा देवाठायी आहे. क्षमा येशूची शिकवण आहे. क्षमा पवित्र आत्म्याचे पवित्र फळ आहे. क्षमा करणारा दैवी.. देवाठायी असतो. क्षमा करणारा महान बनतो. मला कोणाची क्षमा मागणे जड जाते ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमच्या अंतःकरणात दया व क्षमा निर्माण कर. तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या