सामान्यकाळातील १९ वा सप्ताह
शनिवार १३ ऑगस्ट २०२२
“बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
बालपणी जॉन ह्याने संत अलॉयशिअस गोन्झागा ( सण २१ जून) ह्या तरुण संताचे जीवन चरित्र वाचले होते. हे चरित्र वाचून जॉनने येशूसंघीय होण्याचा निर्णय घेतला होता आणि योगायोग म्हणजे ३१ वर्षापूर्वी अलॉयशिअस गोन्झागा ह्याने ज्या खोलीत राहून अभ्यास केला होता तीच खोली आता रोमन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जॉनला देण्यात आली होती. मग जॉनचा आनंद तो काय वर्णावा!
आध्यात्मिक बाबतीत तो खूप धीरगंभीर होता. निष्कलंक गर्भसंभवाची कुमारी माता मरिया जॉनला अतिशय प्रिय होती. आपल्या कॉलेजच्या चॅपलमध्ये असलेल्या तिच्या इमाजीसमोर तो बराच वेळ दररोज प्रार्थना करण्यात घालवीत असे. आपल्या सोसायटीच्या आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्यात त्याला काय धन्यता वाटे! त्याच्या मते 'जितकी आपल्याला ही आचारसंहिता प्रिय वाटू लागेल तितकी आपलीच प्रगती झालेली आहे असे मानावे.
असा हा अत्यंत विद्वान, परोपकारी, प्रसन्न चेहऱ्याचा व सौजन्यशील जॉन वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी देवाघरी गेला. पोप लिओ तेरावे ह्यांनी त्याला १८८८ साली संतपद बहाल केले. अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेने त्याला वेदीसेवकांचा आश्रयदाता संत म्हणून सन्मानित केलेले आहे.
“देवाकडून येणाऱ्या अगदी इवल्याशा प्रेरणेला मी मोठ्या उत्साहाने माझ्या हृदयाशी कवटाळेन" 'मी जर आताच तरुणपणी संत झालो नाही तर मी कधीच संत होऊ शकणार नाही.'- संत जॉन बर्खमन्स
प्रभू येशू, सर्व बालकांना स्वतःकडे बोलवित आहे. मुलांच्या पालकांना खरे तर ही प्रभूची हाक आहे. लहान मुले कुटुंबात वाढत असताना त्यांना येशूजवळ म्हणजेच चर्चमध्ये प्रर्थनेत सहभागी होण्यास घेऊन येणे सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे. ख्रिस्ती श्रद्धेत मुलांना घडविण्यास जीवनातील सर्व आव्हाने लीलया पार करता येतात.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल १८:१-१०,१३,३०-३२
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे न्याय करीन."
पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, बापाने आबंट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, ही म्हण तुम्ही इस्राएल देशात वापरता ती का ? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ही म्हण इस्राएलमध्ये यापुढे आम्हांला वापरावयाची नाही. पाहा, सर्व जीव माझे आहेत बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जिवात्मा पाप करेल तो मरेल.
धार्मिक मनुष्य कोण म्हणाला, तर जो न्यायाने आणि धर्माने वागतो, डोंगरावर भोजन करत नाही, इस्राएल घराण्याच्या मूर्तीकडे डोळे लावत नाही, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट करत नाही, ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही, कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यांना अन्न देतो आणि उघड्यांना वस्त्र लेववतो, वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, वाइटापासून आपला हात आवरतो, मनुष्यमनुष्यात सत्य निर्माण करतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो आणि माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच धार्मिक होय, तो खात्रीने वाचेल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
“तरी पण त्याला बलात्कारी आणि खुनशी पुत्र झाला. बापाने ह्यापैकी कोणतेही काम केले नसून पुत्राने त्यातले एक जरी काम केले, वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल का ? तो वाचावयाचा नाही, त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत. तो खात्रीने मरेल, त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएल घराण्या, मी तुम्हा प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे न्याय करीन. तुम्ही आपल्या सर्व पापकृत्यांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही. तुम्ही आचारलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठायी नवे हृदय आणि नवा आत्मा स्थापित करा. हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता ? मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिराआणि जिवंत राहा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :५१:१२-१५,१८-१९
प्रतिसाद : हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.
१) हे देवा माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर,
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
२) तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे
आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;
म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन.
आणि पापीजन तुझ्याकडे वळतील.
देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा;
३) तुला पशुयज्ञ आवडत नाही,
नाहीतर तो मी केला असता;
होमबली तुला प्रिय नाही.
हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय
तू तुच्छ मानणार नाहीस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १९ : १३-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
येशूने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. तेव्हा येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे." मग त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : मुलंबाळं ही देवाची स्वर्गीय देणगी आहे. मानवाच्या प्रेमाची ती फलश्रुती आहे. बालकांमध्ये कुटुंबाची पूर्णता आहे. माता-पित्याच्या म्हातारपणाची ती शाश्वती आहे. मुला-बाळांचा मालक देव असला तरी आई-वडीलच खरे पालक आहेत. आपल्या बालकांना येशूने आशीर्वाद द्यावा म्हणून काही आई वडील येशूकडे येतात. परंतु प्रेषित त्यांना मनाई करतात. तेव्हा येशू बालकांना स्वर्गीय राज्याची उपमा देतो आणि बालकांना त्याच्याकडे आणावयास आव्हान करतो. माझ्या मुला-बाळांना चर्चमध्ये घेऊन जातो का? माझ्या मुला-बाळांना संडेस्कूलला पाठवतो का? माझ्या मुला-बाळांची धर्मगुरूंबरोबर भेट घडवून आणतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, न्याय-नीतिने व शांति-प्रीतिने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या