सामान्यकाळातील २० वा रविवार
१४ ऑगस्ट २०२२
मी पृथ्वीवर आग पेटविण्यास आलो आहे."
यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराचा सत्याचा संदेश दिला, मात्र तो न ऐकता यिर्मयाला विहिरीत टाकण्यात आले. राजाने आज्ञा केल्यावर यिर्मयाची सुटका करण्यात आली,
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू काळाची लक्षणे सांगत असतानाच म्हणत आहे की, 'मी पृथ्वीवर आग पेटविण्यास आलो आहे.' खऱ्या अर्थाने प्रभू येशू म्हणत आहे ती आग पवित्र आत्म्याच्या परिशुद्धतेची आणि अंतरात्म्यातील प्रेमाची आहे. ज्याच्या अंतःकरणात ही आग प्रज्वलित झाली आहे तो ह्या जगातील सर्व अनिष्ठ आणि अमंगलापासून परावृत्त होत असतो. आपण सर्वदा प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता अनुभवून एकनिष्ठेने त्याचे अनुकरण करणेच योग्य आहे. जगात आजसुद्धा विश्वासणारे आणि अविश्वसणाऱ्यांमध्ये फूट पडलेली आपण पाहत असतो. प्रभू येशू म्हणत आहे, त्याचप्रमाणे अगदी जवळच्या व रक्ताच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा विवाद आणि| भांडणे आहेत. ज्या ठिकाणी माणसे प्रभू येशूच्या प्रेमाची सहभागिता अनुभवतात तेथे पवित्र आत्मा कार्यरत असतो, अन्यथा सैतान कार्यरत बनतो.
प्रभू येशूला अपेक्षित देवराज्याकडे वाटचाल करण्यास| प्रेरणा व कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन :यिर्मया ३८:४-६.८-१०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन "तू मला अखिल पृथ्वीवर कलह निर्माण करण्यास जन्म दिला आहे."
सरदार राजाला म्हणाले, “या मनुष्याला जिवे मारा, कारण असले भाषण करून या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे आणि सर्व लोकांचे हात तो दुर्बळ करतो. हा मनुष्य या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.” तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, पहा, तो तुमच्या हाती आहे. राजाला तुमच्या मर्जीविरूद्ध काही करता येत नाही. मग राजपुत्र मल्किया याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले, त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरविले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता, यिर्मया त्या चिखलात रुतला.
एबद-मलेख राजगृहातून निघाला आणि राजाकडे जाऊन म्हणाला, स्वामी महाराज, या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला विहिरीत टाकले. ते फार वाईट केले. तो आहे तेथेउपासमार होऊन मरेल; (कारण नगरात काही अन्न उरले नाही.) तेव्हा राजाने एबद-मलेख कुशी याला आज्ञा केली की, “येथून तीस माणसे बरोबर घेऊन जा आणि यिर्मया संदेष्ट्याचा मृत्यू झाला नाही त्याअर्थी त्याला विहिरीतून बाहेर काढ.'
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ४०:२,३,४,१८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मला सहाय्य कर.
१)मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली
तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला.
२ ) नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून
त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले
आणि माझी पावले स्थिर केली.
३) त्याने माझ्या मुखात नवे गीत,
आमच्या देवाचे स्तोत्र घातले
हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील
आणि परमेश्वरावर भाव ठेवतील.
४ )मी तर दीन आणि दरिद्री आहे,
तरी प्रभूला माझी चिंता आहे.
माझा साहाय्यकारी आणि
माझा मुक्तिदाता तू आहेस,
हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस.
दुसरे वाचन इब्री १२:१-४
वाचक: इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
" आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे."
आपण एवढ्या मोठ्या साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार आणि सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.
तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. तरी तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नयेत म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पापी जनांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
स्वर्गातील उतरलेली जिवंत भाकर मीच आहे;
ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:४९-५३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी शांती देण्यासाठी नव्हे, तर फूट पाडण्यासाठी आलो आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे, ती आतापर्यत पेटली असती तर किती बरे होते! मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे असे तुम्हांला वाटते काय ? नाही, तर फूट पाडण्यासाठी. आतापासून एका घरातील पाच जणात दोघांविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सुन अशी फूट पडेल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : ख्रिस्तसभा आपल्याला न्यायाच्या बाजूने किंवा अन्यायाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी पाचारण करीत नसते तर उदात्त कारणासाठी दुःखसहन करण्यासाठी हाक घालीत असते. आजची तिन्ही वाचने आपल्याला त्यासंदर्भात तीन विचार सुचवितात.
अ. दुःख सहन करणे हा आपल्या पाचारणाचा एक भागच आहे : जुन्या करारातील खऱ्या संदेष्ट्याचे एक लक्षण म्हणजे दुःखसहन करण्यासाठी असलेली त्यांची तयारी. यिर्मया संदेष्ट्याने तर अतोनात हालअपेष्टा सहन केल्या त्यावेळी असिरियाची सत्ता अस्तंगत होत होती आणि बाबिलोनची सत्ता उदयास येत होती. यिर्मयाचा सल्ला न मानल्यामुळे योशीया हा यहूदाचा राजा मेगिद्दो येथे झालेल्या संग्रामातमारला गेला. त्यानंतर बाबिलोनच्या अधिपत्याखाली इस्राएलचे राजे नेमले जाऊ लागले. त्यांनी यिर्मयाचा छळ आरंभिला. त्यापैकी सिदकिया राजाने केलेल्या छळाचे बोलके उदाहरण आजच्या पहिल्या वाचनात देण्यात आलेले आहे.
ब. दुःखसहन हा शिस्तप्रिय जीवनाचा एक भाग आहे: आजच्या दुसऱ्या वाचनात इब्री लोकांस पत्र लिहिणारा लेखक येशूच्या दुःखसहनाचा आधार घेत 'रक्त पडेपर्यंत प्रतिकार करण्यासाठी' श्रद्धावंतांनी तयार रहावे असे आवाहन करतो. परमेश्वर राज्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचा तो एक भाग आहे.
क. दुःखसहन हा आपल्या ईश्वरनिष्ठ जीवनशैलीचा भाग आहे.: परमेश्वराच्या राज्यात जीवन जगण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनुष्याला दुःखाच्या अग्नीतून तावून सुलाखून निघावे लागते. अशा निर्णयामुळे अंतर्गत फुटीचा वेदनादायी अनुभवदेखील व्यक्तीला येतो. त्याचदृष्टीने आजच्या शुभवर्तमानात अग्नी, बाप्तिस्मा आणि फूट अशा तीन प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत.
आत्मपरीक्षण : उदात्त हेतूसाठी, मी दुःख भोगायला कितपत तयार आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हा सर्वांना तुझ्या तारणदायी प्रकाशात आण व एकनिष्ठेने तुला अनुसरण्यास प्रेरणा दे, आमेन
.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या