Marathi Bible Reading | Monday 15th August 2022 | 20th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

  सोमवार १५ ऑगस्ट २०२२

"माझा जीव प्रभूला थोर मानतो 


पवित्र मरियेचे स्वर्गनयन 

व  ७५ व्या स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरियेच्या स्वर्ग नयनाचा (Assumption) सण साजरा करीत आहे.

'ग्लोरीज ऑफ मेरी' या आपल्या आध्यात्मिक साहित्यकृतीत संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी पवित्र मरियेच्या स्वर्गनयन रहस्याविषयी पुढील उद्गार काढलेले आहेत : 'मरण हे पापाचे वेतन असल्यामुळे वास्तविक पवित्र मरियेला देवाने मरणाच्या अनुभवापासून दूर ठेवायला पाहिजे होते. परंतु पवित्र मरियेने सर्व बाबतीत आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे असावे अशी खुद्द देवाची इच्छा असावी, मात्र पवित्र मरियेला मरणाची कटुता जाणवली नाही तर तिला अत्यंत सुखाचे मरण आले.'

मानवाला मरणाची कटुता वा भय तीन गोष्टींमुळे वाटते. या जगाविषयी आसक्ती, आपल्या पापांविषयी भीतीची भावना आणि स्वतःच्या तारणाविषयी शंकित वृत्ती! पवित्र मरियेचे जीवन मात्र ह्या तिन्ही गोष्टींपासून मुक्त होते. या जगातल्या कुठल्याही ऐहिक सुखाविषयी तिच्या मनात आसक्ती नव्हती. ती तर पूर्णपणे देवाशी एकरूप झालेली होती. ती मूळ पापावाचून संभवलेली असल्यामुळे तिला कोणत्याही पापाविषयी अपराधीपणाची भावना असणे अशक्य होते आणि शेवटी ती देवाच्या कृपेने पुरेपूर भरलेली असल्यामुळे आपल्या तारणाविषयी ती निश्चित होती.

'मरणाद्वारे आपण आपल्या प्रभूशी एकरूप होणार असल्यामुळे मरणाविषयी तिच्या मनात यत्किंचितही भय नव्हते. ती कोणत्याही प्रकारच्या आजारामुळे मरण पावली नाही तर केवळ देवावरील तिचे प्रेम तिला देवाजवळ घेऊन गेले.' असे अनेक धर्मपंडितांचे मत आहे.

'येशूच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र मरिया येशूचा जिवलग शिष्य योहान ह्याच्या घरी राहिली (योहान १९:२७). येशूचे शिष्य तिच्या संपर्कात होते. तिने त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. क्रेतचे संत ॲण्ड्रयू आणि संत जॉन दमासिनसारखे अभ्यासू ख्रिस्तीजन म्हणतात की, 'पवित्र मरियेचा मृत्यूसमय जवळ आला तेव्हा सर्व शिष्य चमत्कारिकरित्या तिच्या मृत्यूशय्येभोवती गोळा झाले.' मरिया त्यांना म्हणाली, “मी तुम्हाला अनाथ असे सोडून जात नाही, स्वर्गामध्ये देवाजवळ मी तुमच्यासाठी मध्यस्थी करीत राहीन.”'पवित्र मरियेने देवावर सर्व देवदूतांनी केलेल्या प्रेमाहून अधिक प्रेम केलेले असल्यामुळे देवाने तिला त्यांच्याहून उंच केले आणि आपल्या राज्यात सामावून घेतले.' ट्रेंटची विश्वपरिषद म्हणते त्याप्रमाणे, 'पवित्र मरियेने कुठलेही पाप केले नाही तिने कुठलीही कृपा गमावली नाही किंवा आपल्याला मिळालेली ईश्वरी कृपादाने वाईट कारणासाठी वापरली नाहीत अथवा तशीच ठेवून दिली नाहीत.' संतांमध्ये प्रत्येकाला विशिष्ट कृपादाने देण्यात आलेली होती. मरिया मात्र सर्व कृपादानांनी भरलेली होती. सर्व संतांची सर्व कृपादाने पवित्र मरियेठायी एकवटलेली होती म्हणून ती 'सर्व पवित्रांची राणी' म्हणून गौरविली आहे.

शेवटी संत अल्फान्सोस लिगरी म्हणतात, 'आता पवित्र मरिया देवाच्या स्वर्गीय राज्यात आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे सहाय्य करण्यासाठी तयार असल्यामुळे आपण देवाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.'

पवित्र मरिया नक्की कोणत्या ठिकाणी (जेरुसलेम की एफसस) मरण) पावली ह्याविषयी धर्मपंडितांमध्ये एकवाक्यता नाही तसेच नक्की कधी मरण पावली (येशूच्या स्वर्गारोहणानंतर ३ वर्षांनी? १५ वर्षांनी?) तेही निश्चित नाही. कारण तसा ऐतिहासिक पुरावा नाही.

तिच्या स्वर्गनयनाचा सण पोप पायस बारावे ह्यांनी इ.स. १९५० साली घोषित केला. मात्र इ.स. ४५१ साली काल्सेदोन येथे भरलेल्या धर्मपरिषदेमध् 'पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली' ह्याची वाच्यता केली गेलेली होती.

पवित्र मरियेच्या गुणांचे अनुकरण आपल्याला करता यावे म्हणून तिच्या मध्यस्थीने आपण सर्वांसाठी प्रार्थना करु या.

✝️             

पहिले वाचन : प्रकटीकरण ११ :१९, १२ :१-६,१०
वाचक :प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र होता."

देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व  तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकूट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुत्रसंतान ती प्रसवली, ते. तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले, ती स्त्री रानात पळून गेली, तेथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाणी आहे. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली : “आता आमच्या देवाने सिध्द केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. "
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ४५:१०-११,१२-१६
प्रतिसाद : ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे."

१) तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. 
ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन 
राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. 
राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक: 
तू आपले लोक आणि आपल्या बापाचे घर ही विसर.

२) म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल 
तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. 
आनंदाने आणि उत्साहाने त्यांना मिरवतील.
 त्या राजमंदिरात प्रवेश करतील.


दुसरे वाचन : १करिंथ १५ : २०-२७
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रथमफळ ख्रिस्त, नंतर जे ख्रिस्ताचे आहेत ते"

ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथमफळे असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. "कारण देवाने सर्व अंकित करून याच्या पायांखाली ठेवले.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
मरिया स्वर्गात घेतली गेली आहे,
सर्व दूतांचा गायकवृंद तिचा जयघोष गातात.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १९:१३-१५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याने दीनजनांस उंचावले आहे. "
मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. अलीशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठयाने बोलली, "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
तेव्हा मरिया म्हणाली :
"माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा 
त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, 
कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे.
पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, 
कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत 
आणि त्याचे नाव पवित्र आहे. 
जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, 
जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.
त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंचावले आहे, 
त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. 
आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे. 
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .



चिंतन : मानवी जीवन चार पातळीवर जगता येतेः शारीरिक, बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक. त्यापैकी आध्यात्मिक पातळीवर जीवन जगणारी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावरच स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत असते. १. शारीरिक पातळीः अशा व्यक्ती रात्रंदिन फक्त शरीराच्या गरजांचा विचार करतात. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, आपले घर कसे असे असावे, आपल्याला विश्रांती कशी मिळेल इत्यादी. आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी घेतली व त्या शरीराचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी केला तर तेच शरीर तारणाचे माध्यम व कृपेचे साधन बनते आणि साक्षात देवाचे घर बनते व पवित्र मरियेप्रमाणे स्वर्गात घेतले जाते. 
२. बौद्धिक पातळी : अशा व्यक्ती बुद्धिजिवी असतात. त्यासर्व काही बुद्धीच्या पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बुद्धीच्या पातळीवर सर्वकाही शक्य आहे असे ह्या व्यक्तींना वाटत असते. एखादी गोष्ट बुद्धीला पटली नाही तर ती ही गोष्ट स्वीकारण्यास तयार नसतात. आपल्याला सर्वकाही समजते असा व्यर्थ अहंकार त्यांना खोट्या प्रतिष्ठेची ग्वाही देतो. 
इतरांशी वैचारिक मतभेद असल्याने अशा व्यक्ती अस्वस्थ वा बेचैन असण्याची शक्यता असते. मात्र बुद्धीचे क्षेत्र मर्यादित असते. त्यानंतर सुरू होणारे श्रद्धेचे क्षेत्र जर त्यांना पादाक्रान्त केले तर पवित्र मरियेप्रमाणे हे कसे शक्य होईल या बौद्धिक अवस्थेकडून ते “पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडून येवो या कृपेच्या अवस्थेत त्या प्रवेश करतात. 
३. भावनिक पातळी : ह्या व्यक्ती खूप भावूक आणि भावनाविवश असतात. हळवे मन, भोळेपणा आणि भाबडेपणा यामुळे त्या बारीकसारीक गोष्टींविषयी भावनिक होतात. काना येथे लग्नसमयी द्राक्षारस संपला तेव्हा पवित्र मरियादेखील भावनिक होऊन म्हणाली, “त्यांच्याकडे द्राक्षारस नाही.” मात्र येशूशी बोलून झाल्यावर ती व्यावहारिक बनते व म्हणते, “हा जे सांगेल त्याप्रमाणे करा.” केवळ स्वतःच्या भावनेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारी व्यक्ती जीवनात पदोपदी चमत्कार अनुभवते. 
४. आध्यात्मिक पातळी : अशी व्यक्ती सदानकदा आध्यात्मिक गोष्टींवर मनन-चिंतन करते. देवाला आपल्याकडून काय हवे ? इतरांसाठी आपण काय करू शकतो ? सद्गुण कसे आत्मसात करू शकतो ? प्रार्थना, धार्मिक वाचन, मनन-चिंतन, आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक मार्गदर्शन यांमध्ये ह्या व्यक्तींना खूप रस असतो. पवित्र मरियेने गाईलेल्या स्तोत्रातून तिच्या आध्यात्मिक मनोवृत्तीचे दर्शन घडते. 
आत्मपरीक्षण : मी माझे जीवन कोणत्या पातळीवर जगत आहे? पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाकडून मला काय शिकता येईल ?

प्रार्थना :हे पवित्र मरिये, सर्व अनिष्ठांपासून आमचे रक्षण कर, आम्हा सर्वांसाठी | तुझ्या पुत्रापाशी विनंती कर, , आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या