सामान्यकाळातील २० वा सप्ताह
मंगळवार १६ ऑगस्ट २०२२
“त्यांना ते अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल."
श्रीमंत व धनवान असणे वाईट नाही, मात्र माणसाच्या ठायी मनाची श्रीमंती हवी. देवासाठी, देवाच्या गौरवासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आपल्या धनाचा व संपत्तीचा वापर होणे गरजेचे आहे. ज्यांना देवाच्या गौरवासाठी सर्वस्वाचा त्याग करायची तयारी आहे त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन हे वतन मिळणार आहे. आपली तयारी आहे का ?
✝️
पहिले वाचन : यहेज्केल २८:१-१०
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू देव नाहीस, मानव आहेस, तरी आपण देवासारखे आहोत असे तू स्वतःला समजतोस."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे, पण तू देव नव्हेस, मानव आहेस, आपले चित्त देवाच्यासारखे आहे असा तू आव आणतोस, पहा, दानिएलपेक्षा तू बुद्धिमान आहेस. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून छपवता येत नाही. तू आपल्या अकलेने आणि चातुर्याने धन संपादन केलेस आणि आपल्या भांडारात सोन्यारुप्याचा संचय केलास. तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढविलेस, या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे.” ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस. म्हणून पाहा, मी तुझ्यावर परकीय लोक आणतो, तुझ्यावर अन्य राष्ट्रांतले उग्र पुरुष आणतो, तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तरवार उपसतील आणि तुझे तेजभ्रष्ट करतील. ते तुला गर्तेत उतरवतील, भर समुद्रात वध पावणाऱ्याच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल. तू आपल्या वधणाऱ्यासमोर, मी देव आहे, असे म्हणशील का ? घायाळ करणाऱ्याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस. बेसुंती मरतात त्याप्रमाणे तू परदेशीयांच्या हस्ते मरशील.” हे माझे म्हणणे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :अनु. ३२:२६-२८, ३०, ३५,३६
प्रतिसाद : प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे.
१) मी त्यांची दूरवर पांगापांग करीन,
मानवातून त्यांची आठवण बुजवीन.
असे मी म्हणालो असतो,
पण शत्रूंच्या खिजवण्यास मी भ्यालो,
त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता.
२) ते म्हणाले असते की,
आमच्याच हाताने पराक्रम केला आहे.
ही काही परमेश्वराची कृती नव्हे.
हे राष्ट्र विचारशून्य आहे, ह्यांना समजत नाही.
३) त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता,
परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते.
तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता ?
दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते ?
४) कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे;
त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकरच येत आहेत.
हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील,
त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात,
ती नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १९ : २३-३०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, "तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे ?" येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, "माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे." तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, "पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो. तर आम्हांला काय मिळणार ?" येशूने त्याला म्हटले, “मी तुम्हांला नक्की सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले, किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत त्यांना ते अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळजणांचे होईल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. असे येशू जेव्हा प्रेषितांना सांगतो तेव्हा सर्वस्वाचा त्याग केलेल्यांना काय मिळेल ? आणि तारण कोणाचे होईल ? असे प्रेषित येशूलाविचारतात. तारण हे देवाकडून आहे. आणि जीवनाचा त्याग केलेल्यांना सार्वकालिक जीवन मिळेल अशी शाश्वती येशू प्रेषितांना देत आहे. बऱ्याच लोकांनी देवा-धर्मासाठी त्याग केला आहे. सुवार्तेसाठी आपला जीव गमावला आहे. अशा सगळ्यांना स्वर्गात प्रवेश आहे. त्यांना जगात संत म्हणून मान मिळाला आहे. देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश कठीण आहे. असे येशू का म्हणाला आहे? यावर प्रत्येकाने विशेष म्हणजे धनवानाने विचार केला पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या नावांसाठी व सुवार्तेसाठी त्याग करण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या