सामान्यकाळातील २० वा सप्ताह
बुधवार १७ ऑगस्ट २०२२
प्रभू परमेश्वर म्हणतो: “पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यांना मी हुडकीन."
कोणाला कसे वेतन द्यायचे ते तो स्वतःच ठरवणार आहे. परमेश्वर उदार, दयाळू व प्रेमळ आहे. आपल्यापेक्षा चांगले आणि स्तुतीयोग्य काम हे त्या परमेश्वराला माहित आहे.
परमेश्वराठायी दुजाभाव नाही, मात्र आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडावी अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराप्रमाणे आपण सुध्दा उदार बनावे व जीवनाच्या शेवटी सार्वकालिक जीवनाचे वेतन मिळविण्यास पात्र बनावे म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन त्याला शरण जाऊ या.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल ३४:१-११
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मेंढपाळापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन, माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्र, इस्राएलच्या मेंढपाळाविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो: जे इस्राएलचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपांना चारावे की नाही? तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यातील लठ्ठलठ्ठ पाहून मेंढी कापता, परंतु कळपाला चारत नाही. तुम्ही दुर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे घाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने आणि कडकपणे सत्ता चालवता. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली. माझी मेंढरे सर्व डोंगरावरून, सर्व उंच टेकड्यावरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे विखुरली आहेत, त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यांना शोधत नाही.
यास्तव मेंढपाळांनो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐकाः प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत, माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष्य झाली आहेत, माझ्या मेंढपाळांना शुद्धी नाही, मेंढपाळ स्वत:च चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत.'ह्यास्तव मेंढपाळांनो परमेश्वराचें वचन ऐका : प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन, माझा कळप चारण्याची त्यांस मी बंदी करीन, त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या हातातून सोडवीन म्हणजे यापुढे ती त्यांना भक्षावयास सापडणार नाहीत.”
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो: “पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यांना मी हुडकीन."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : २३:१-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो.
२) तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो,
मृत्यूच्छायेच्या दरीतून मी जात असलो
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस,
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
३) तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण आणि दया ही लाभतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझ्या देवा, तुझा पथ मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २० : १-१६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत का सलते ?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधन्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळयात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा शेकेल ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमाराला बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही द्राक्षमळ्यात जा,जे योग्य ते मी तुम्हांला देईन आणि ते गेले." पुन्हा सहाव्या आणि नवव्या तासाच्या सुमाराला त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग अकराव्या तासाच्या सुमाराला तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही संबंध दिवस तेथे रिकामे का उभे राहिले आहा?” ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा." मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे." तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना एकेक शेकेल मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही एकेक शेकेल मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरूद्ध कुरकुर करत म्हटले, “ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखे लेखले.” तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, “गड्या मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर शेकेलचा ठराव केला की नाही ? तू आपला शेकेल घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आरल्या मर्जीप्रमाणे करायला मुखत्यार नाही काय ? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय ? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : देवाच्या राज्यात सगळ्यांना समानतेची वागणूक आहे. हे स्पष्ट करण्यासाठी येशू एक | दाखला देत आहे. द्राक्षमळ्याचा धनी एक रुपयाचा
ठराव करतो आणि भल्या पहाटे काही कामगार कामास लावतो. काही तासागणिक तो बाहेर जात राहातो आणि आणखी काही कामगार कामास लावतो. मात्र संध्याकाळी सगळ्यांना पगार सारखाच देतो. ह्या विरुद्ध पहाटेचे कामगार कुरकुर करतात. द्राक्षमळ्याचा धनी हा जणू देव आहे. देवाचा चांगुलपणा निरखला पाहिजे. देवाचा | समानतेचा न्याय समजून घेतला पाहिजे. देव गरजेनुसार प्रत्येकाला देत असतो. परंतु दुसऱ्यांना पाहून देवाविरुद्ध कुरकुर होते. मी माझ्या जीवनात समाधानी आहे का ? दुसऱ्यांबद्दल देवाविरुद्ध कुरकुर तर होत नाही ना ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, उदार अंत:करणाने तुजवर प्रेम करण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.जाऊ या.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या