सामान्यकाळातील २० वा सप्ताह
गुरुवार १८ ऑगस्ट २०२२
कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट ह्या सम्राटची माता हेलेना ही पूर्वी विथानिया येथल्या उतारशाळेची प्रमुख होती. अत्यंत नम्र वृत्तीची असलेल्या या स्त्रीच्या जीवनात आर्मी ऑफिसर असलेला कॉन्स्टॅन्शिअस हा अधिकारी आला आणि तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.
मात्र वीस वर्षानंतर कॉन्स्टॅन्शिअस ह्याने राज्यपदावर असताना तिला घटस्फोट दिला आणि केवळ राजकीय कारणास्तव तिला टाकून दिले. परंतु पुढे कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट हा तिचा मुलगा जेव्हा वडिलांच्या जागेवर आला तेव्हा तो आपल्या आईशी एकनिष्ठ राहिला आणि त्याने तिला मोठ्या सन्मानाची वागणूक दिली.
इ. स. ३१३ साली कॉन्स्टॅन्टाईन राजाने मॅक्सेन्शिअसवर विजय मिळविला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याच्याबरोबर राजमाता हेलेना हिने देखील ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. तिची नम्र आणि सौजन्यशील आणि तितकीच अधिकारवाणीने युक्त असलेली प्रतिमा ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यास सहाय्यभूत ठरली.
आपल्या ऐश्वर्याचा व दानशूरवृत्तीचा वापर करून राणी हेलेना हिने युरोपभर अनेक ख्रिस्तमंदिरांची उभारणी केली, शेवटी वयाच्या ७५व्या वर्षी तिने पवित्र नगरी जेरूसलेमची यात्रा सुरू केली. तिथे गेल्यावर येरूशलेमनजीक 'स्वर्गारोहणाचा पर्वत म्हटलेल्या ठिकाणी आणि वेथलेहेम गोठ्याच्या गुहेजवळ अशी दोन चर्चेस बांधली. '
रोममध्ये तिने आपल्या राजमहालाचे रूपांतर एका भव्य ख्रिस्तमंदिरात
केले. आजही त्या मंदिरात ख्रिस्ताला ज्या क्रुसावर ठार मारण्यात आले तो क्रूस व पिलाताचा लेख ठेवण्यात आलेला आहे. संत हेलेना ही सुई व खिळे तयार करणाऱ्यांची आश्रयदाती संत मानली गेलेली आहे.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल ३६:२३-२८
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, तुम्ही माझ्या थोर नावाला राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, मी तुम्हांला राष्ट्रातून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, तुमची सर्व मलिनता आणि तुमच्या सर्व मूर्ती यांपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन आणि तुम्हास मांसमय मृदु हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ५१:१२-१५, १८-१९
प्रतिसाद : मी तुम्हांवर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल.
१) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर,
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
२ )तुझ्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा मिळू दे
आणि आतुर प्रवृत्तीने मला सावर,
म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन
आणि पापीजन तुझ्याकडे वळतील.
३) तुला पशुयज्ञ आवडत नाही,
नाही तर तो मी केला असता,
होमबलीही तुला प्रिय नाही.
देवाने यज्ञ म्हणजे भग्न आत्मा हे देवा,
भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २२ : १-१४
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जितके तुम्हांला आढळतील तितक्यांला लग्नाच्या मेजवानीस बोलवा. "
मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन येशू बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानी दिली आणि त्या लग्नाच्या मेजवानीचे ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांग, ‘पाहा, मी जेवण तयार केले आहे,माझे बैल आणि पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीला चला.' तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.” मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. "
"मग राजा जेवणाऱ्यांना पाहायला आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोषाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत.'
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजचे शुभवर्तमान पुन्हा-पुन्हा वाचावे. राजा हा जणू देव आणि पुत्र येशू आहे. पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीस देव आमंत्रण देत आहे. कोकराचे लग्न हे स्वर्गात लावले जाणार आहे. अशी मेजवानी यहुदी व परराष्ट्रीयांना दिली होती. आता ती आपल्याला देण्यात आली आहे. कोकराच्या लग्नाचा काळ हा शेवटचा काळ आहे. या काळात प्रत्येकाला स्वर्ग-मंडपात घेतले जाणार आहे. लग्नाचा पोषाख हा आपल्या तयारीचा मापदंड आहे. दास, सैनिक, चाकर हे देवदूत आहेत. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. अंधार, रडणे, दांत खाणे म्हणजेच नरक आहे. ज्यांची तयारी आहे ते मेजवानीस बसू शकतील. ज्यांची तयारी नाही ते नरकात टाकले जातील. मला कोकराच्या मेजवानीत सहभागी होता यावे म्हणून मी कोणती तयारी करतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या आवाहनाला योग्यतेने व मनापासून होकार देण्यास व तुला अनुसरण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या