Marathi Bible Reading |Friday 19h August 2022 | 20th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २० वा सप्ताह  

शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२

"दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर."


 संत जॉन यूड्स 

- वर्तनसाक्षी (१६०१-१६८०)

चिंतन : इतरांशी कसलाही व्यवहार करण्यापूर्वी त्यांच्या रक्षकदुतांकडे आणि आश्रयदात्या संताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, ते करीत असलेल्या कार्याद्वारे देवाचा गौरव व्हावा. - संत जॉन यूड्स

ख्रिस्तीपणाचे संपूर्ण सार देव प्रीति व परस्पर प्रीति ह्या पायावर  उभारलेली आहे. आपले जीवन प्रेमाने, शांतिने व आनंदाने बहरावे, इतरांना प्रेमाचा अनुभव देता यावा म्हणून प्रेरणा मागू या.

✝️   
पहिले वाचन : यहेज्केल ३७:१-१४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐकाः माझ्या लोकांनो, मी तुम्हांला आपल्या कबरांतून उठवीन."
परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला, आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय ?" मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक." तेव्हा तो मला म्हणाला, “या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुम्हामध्ये श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हांवर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुम्हामध्ये श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे."
मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले त्वचेने त्यांना आच्छादले,पण त्यात श्वास अगदीनव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, “वाऱ्याला संदेश दे; मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.” मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले.तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय. पाहा, ते म्हणतात, आमच्या अस्थीशुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्याना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पाहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हांला आपल्या कबरातून बाहेर काढून इस्राएल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हांला बाहेर काढीन तेव्हा तुम्हांला समजेल की, मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन, तेव्हा मी परमेश्वर हे बोललो आणि मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १०७:२-९
प्रतिसाद :  परमेश्वराचे उपकारस्मरण करा,

१) परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणोत
 कारण त्यांना त्याने शत्रूच्या तावडीतून 
मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या 
देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि
 दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकत्र जमवले आहे.

२) काहीजण अरण्यात वैराण प्रदेशातील 
वाटेने भटकले त्यांना वस्तीचे नगर
 आढळले नाही. ते भुकेले आणि तान्हेले 
असल्यामुळे त्यांचा जीव व्याकूळ झाला.

३) तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला 
आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले 
वस्तीच्या नगरात त्यांनी जावे म्हणून 
त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.

४ परमेश्वराच्या दयेबद्दल आणि 
त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल
 लोक त्याचे उपकारस्मरण करोत. 
कारण त्याने तान्हेल्या जिवाला तृप्त केले. 
भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. 
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय २२ : ३४-४०
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर.'
येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परिक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे ? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर. ह्या दोन तू आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. '
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : देव प्रीती आहे. माणसाने माणसावर प्रीती करावी अशी देवाची इच्छा आहे. दैवी दृष्टीकोनातून देव प्रीती व शेजार प्रीती सारखीच आहे. एकमेकांशिवाय अपूर्ण व परस्परांशी त्या पूरक आहेत. जणू एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. ख्रिस्ती धर्माचे सार प्रीतीतच सामावलेले आहे. ख्रिस्ती धर्माचा पाया व कळस जणू ह्यातच आहे. देवावर प्रीती न करणारा शेजाऱ्यावर कशीकरील ? शेजाऱ्यावर प्रीती न करणारा देवावर कशी करील ? धर्मशास्त्राचे ग्रंथ प्रीती शिकवितात आणि नियमशास्त्र देखील प्रीतिबद्दलच बोलतात. मी स्वतःवर प्रीती करतो. तशी देवावर करतो का? मी देवावर प्रीती करतो. शेजाऱ्यावर करतो का ?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुजवर प्रीति करण्यास व तुला अनुसरुन प्रीतीची आज्ञा आचरणात आणण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या