Marathi Bible Reading |Saturday 20h August 2022 | 20th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २० वा सप्ताह  

शनिवार २० ऑगस्ट २०२२

तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. 


 संत बर्नर्ड

- मठाधिकारी, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१०९१-११५३)


 शास्त्रीपरुशी केवळ नियम पाळत होते मात्र प्रत्यक्षात त्यांच्या आचरणात विसंगती होती. लोकांवर नियमांची ओझी लादणे, समाजात श्रेष्ठ स्थानी बसणे, शेखी मिरवणे इत्यादीप्रकारे ते समाजासाठी अडखळण बनले होते. अशावेळी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याची शिकवण देवून त्यांना स्पष्ट केले की सर्वजण परमेश्वर पित्याची लेकरे आहेत व ते सर्वजण भाऊ भाऊ असे आहेत. त्याचबरोबर स्वामी व गुरु एकच असून तो खुद्द प्रभू आहे, हा मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. परमेश्वराठायी नम्रता धारण करणाऱ्यालाच उंचविले जाते ही शिकवण  प्रभू येशूने त्यावेळी दिली.
 आपण आज्ञाधारी आणि परमेश्वराची प्रेमळ लेकरे बनावीत म्हणून प्रार्थना करु या. 

✝️   
पहिले वाचन : यहेज्केल ४३:१-७
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"इस्राएलच्या देवाच्या तेजाने मंदिर भरून गेले. "

पूर्वाभिमुख असलेल्या दाराकडे दूताने मला नेले. तो पहा, इस्राएलच्या देवाचे वैभव पूर्वेकडून प्रकट झाले. त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता आणि त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली. मी नगराचा नाश करण्यास आलो होतो तेव्हाच्या दृष्टान्तासारखा मी पाहिला. खबार नदीतीरी जो दृष्टान्त मी पाहिला तसे दृष्टान्त माझ्या दृष्टीस पडले, तेव्हा मी उपडा पडलो. पूर्वाभिमुख असलेल्या दारावाटे परमेश्वराचे तेज मंदिरात आले, तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात नेले, तो पहा, परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले होते.
मंदिरातून कोणी माझ्याबरोबर बोलत आहे असे मी ऐकले आणि माझ्याजवळ एक पुरुष उभा होता, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थळ माझ्या पदासनाचे स्थळ आहे, तेथे मी इस्राएल वंशजांमध्ये सर्वकाळ राहीन."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ८५: ९ -१४
प्रतिसाद :  परमेश्वराचे वैभव आमच्या देशात नांदावे.

१) परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन, 
कारण तो आपल्या लोकांशी आणि 
आपल्या भक्तांशी शांतीबद्दल बोलेल. 
त्यांचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले 
तारण खरोखर समीप असते, 
ह्यासाठी आमच्या देशात वैभव नांदावे.

२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, 
न्याय्यत्व आणि शांती यांचे मीलन झाले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, 
स्वर्गातून न्याय्यत्व अवलोकन करत आहे.

३) जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि 
आमची भूमी आपले फळ देईल. 
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल आणि 
त्याची पावले इतरांना मार्गदर्शन होतील.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय २३ : १-१२
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत."

येशू लोकसमुदायांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री आणि परुशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांदयावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावणार नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात, ते आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे, आणि लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणाला गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणाला स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : शास्त्री- परूशी धर्मशास्त्र शिकवित होते. मात्र शिकवणारेच ते पाळत नाहीत. नियमशास्त्राचे नियम सांगितले जातात. पण सांगणारेच तसे चालत नाहीत. दोन हजार वर्षापूर्वीची परिस्थिती | आजही तशीच आहे. धर्मशास्त्र आणि नियमशास्त्र तेच आहे. लोकांची वृत्ती आणि कृती मात्र बदलत आहे. लोक हे मान-सन्मानासाठी हपापलेले असतात. अशा लोकांपासून सावध राहायला येशू सांगत आहे. कारण स्वतःला जो उंचावील तो नमवला जाईल आणि स्वतःला जो नमवील तो उंचावला जाईल. मोठा असणाऱ्याने सेवक व्हावे असे येशू समजावत आहे. बोले तैसा चाले अशी माझी जीवनशैली बनलेली आहे का ?

प्रार्थना : नम्रतेने व लीनतेने हा प्रभू, तुझे वचन आत्मसात करुन त्याचप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या