Marathi Bible Reading | 21th Sunday In Ordinary Time |21th August 2022 |

सामान्यकाळातील २१ वा  रविवार 

२१ ऑगस्ट   २०२२





“अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा”

यशया संदेष्टा आज आपल्याला  देवाच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे  वागणाऱ्या प्रत्येकाला देवाचे अभय मिळेल आणि देव त्यांना संरक्षण देऊन त्यांची  भरभराट करील असे स्पष्ट करीत आहे. दुसऱ्या वाचनात परमेश्वर आपल्या प्रिय जनांस शिक्षा करुन सरळ मार्गावर आणतो हे स्पष्ट करण्यात आले आहे.
' देवाकडे जाण्याचा व स्वर्गप्राप्तीचा मार्ग सोपा नाही. सहजपणे देवाला भेटता येत नाही. आपली भक्ती, उपासना, कर्मकांड व वरवरचा सोवळेपणा आपल्याला तारणप्राप्ती करुन देणारा नाही.
 ईश्वरप्राप्ती व तारण प्राप्ती मिळविण्यासाठी प्रभूच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करण्याची गरज आहे. जीवनातील अपयश, दुःख,  वेदना, छळणूक, निराशा, आजार, संकटे ह्या सर्वांना आपण कशाप्रकारे सामोरे जातो ?

प्रभू येशू आज म्हणत आहे, ‘अरुंद दरवाज्याने आंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा.' देवाकडे जाण्यचा मार्ग अरुंद, खाचखळग्यांचा, काटेरी मार्ग आहे. जर  स्वतः प्रभू आपल्या बरोबर असेल तर सर्व काही शक्य आहे.
✝️   
पहिले वाचन :यशया ६६:१८-२१
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ते सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना आणतील.”

परमेश्वर म्हणतो, मी त्यांची कृत्ये आणि त्यांचे विचार जाणतो. सर्व राष्ट्रांनी आणि भिन्नभिन्न भाषा बोलणाऱ्यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांस एकत्र करावे अशी वेळ आली आहे. मी त्यांना एक चिन्ह दाखवीन, त्यातून जे बचावतील त्यांना मी तार्शीश, पूल आणि लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन. ज्यांनी माझे नाव ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तूबल आणि यवान या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन. ते अन्य राष्ट्रात माझा महिमा प्रकट करतील. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वराला शुद्ध पात्रातून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथात, पालख्यात, खेचरांवर आणि सांडणींवर बसून येरूशलेमला माझ्या पवित्र पर्वतावर आणतील. त्यांच्यातून काहीजण याजक आणि लेवी व्हावे म्हणून मी घेईन, असे परमेश्वर म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ११७: १-२
प्रतिसाद :  सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला 
सुवार्तेची घोषणा करा.मार्क १६:१५

१) आलेलुया !
परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व राष्ट्रांनो, 
परमेश्वराचे स्तवन करा.

२ ) कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे, 
आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे..


दुसरे वाचन  इब्री  १२:५-७,११-१३
वाचक: इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
 "ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो. "

तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात का ?
"माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो."
शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा नाही असा कोण पुत्र आहे ? कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्यापासून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.
लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. म्हणून लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे 
अंतःचक्षू प्रकाशित करो, म्हणजे 
त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी 
आशा कोणती ही आम्ही ओळखावी. 
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १३:२२-३०
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील."

येशू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत येरुशलेमकडे चालला होता. तेव्हा कोणाएकाने त्याला म्हटले, "प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय ?" तो त्यांना म्हणाला, "अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, “प्रभो, आम्हासाठी दार उघडा.” तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कोठले आहा, हे मला माहित नाही.” तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, “आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले आणि तुम्ही आम्हांला रस्त्यांवर शिक्षण दिले;” परंतु तो म्हणेल, "मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहा, हे मला माहित नाही." अहो, सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा आब्राहाम, इसहाक, याकोब, आणि सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले आणि आपणाला बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आज न्याय रविवार! नीतिमानाला बक्षीस मिळेल तर दुष्टाला शिक्षा मिळेल ही जुन्या करारातील विचारवंतांची धारणा होती. मात्र जेव्हा नीतिमानालाच शासन होत असल्याचा व दुष्टाची भरभराट होत असल्याचा अनुभव इस्राएली  लोकांना जेव्हा येऊ लागला तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. आजची वाचने या प्रश्नावर प्रकाश टाकतात. 
अ. दुष्टांचे शासन न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेः आजच्या शुभवर्तमानामध्ये रूंद व अरूंद अशा मार्गाने स्वर्गराज्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या दोन गटांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात रूंद मार्गाने जाऊ इच्छिणारे एकीकडे जागतिक सुख ओरबाडतात आणि दुसरीकडे देवराज्याचा आनंद उपभोगू पाहतात. अशा लोकांची, वरवर पाहता, कितीही भरभराट होत असली तरी शेवटी देवराज्याच्या खऱ्या आनंदाला मुकणे हीच शिक्षा त्यांच्या वाटेला येणार आहे. 
ब. दुष्टांचे शासन ही नीतिमानांच्या निर्दोषीपणाची अप्रत्यक्ष पोचपावती होय : आजचे पहिले वाचन हा दुष्टांच्या दुष्कृत्याला दिलेला प्रतिसाद आहे. ही दुष्कृत्ये आजच्या उताऱ्याच्या आधी नमूद करण्यातआलेली आहेत. त्याद्वारे परमेश्वराला दुष्टांना शासन करायचे नसून नीतिमानांना प्रोत्साहन द्यायचे आहे असे यशया सुचवितो. 
क. नीतिमानांना करण्यात आलेली शिक्षा त्यांच्या शुद्धीकरणासाठी असते : आजचे दुसरे वाचन वरवर पाहता नीतिमानांना परमेश्वर शिक्षा का करतो या प्रश्नाचे उत्तर देते. हा माणसाच्या पापाचा परिणाम नसून (यहुदी तसा विचार करीत) तो नीतिमानांना शुद्ध करण्याचा परमेश्वराचा मार्ग आहे व त्याकडे परमेश्वराच्या प्रेमाच्या प्रकाशात पाहणे गरजेचे आहे असे हे वाचन आपल्याला शिकविते.

आत्मपरीक्षण : दुष्टाचे व नीतिमानाचे शासन याविषयी मला आज कोणता नवीन विचार मिळाला? तो मला माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी कसा लागू करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, त्याग करण्यास व वचने पाळून जीवनाचा मार्ग मोकळा करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या