Marathi Bible Reading | Wednesday 10th August 2022 | 19th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १९ वा सप्ताह  

बुधवार १० ऑगस्ट २०२२

"गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो." 


 रोमचे संत लॉरेन्स 
रक्तसाक्षी (-२५८)

पोप सिक्स्टस दुसरे ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांचा आर्चडिकन लॉरेन्स ह्यांना अटक करण्यात आली. तीन दिवसानंतर त्याला तेलाच्या उकळत्या कढईत हळूहळू तळण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी त्यांचे जीवनचरित्र लिहिणारे संत आंब्रोज ह्यांच्या मते लॉरेन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता सम्राट व्हेलेरियन ह्यांच्या चरणाशी आणून ठेवावी म्हणून सम्राटाने त्यांना आदेश दिलेला होता. परंतु लॉरेन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता गोरगरिबांना वाटून टाकली आणि सर्वोत्तम संपत्ती म्हणून त्याने स्वतःला ख्रिस्तसभेच्या कार्याला वाहून घेतले.
डिकन लॉरेन्स ह्यांच्या या वर्तनामुळे संतप्त झालेल्या सम्राटाने त्याला १० ऑगस्ट इ.स. २५८ रोजी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. डिकन लॉरेन्स अत्यंत विनोदी स्वभावाचे होते. त्यांना उकळत्या तेलामध्ये तळले जात असताना त्याने आपल्या मारेकऱ्यांना सांगितले, माझी एक बाजू तळून झाली आता मला फिरवून दुसरी बाजू तळून काढा.
पुढे तिवोलीला जाणाऱ्या रस्त्यालगत त्याच्या थडग्यावर 'कॉन्स्टन्टाईन द ग्रेट' ह्या सम्राटाने एक छोटेखानी सभागृह उभारले. पाचव्या, सातव्या शतकात तिथेच "संत लॉरेन्स बियाँड द वॉल्स" हे महामंदिर बांधण्यात आले. रोममध्ये असलेल्या सात मुख्य चर्चेसमध्ये संत लॉरेन्स महामंदिराचा आजदेखील समावेश केला जातो.
संत लॉरेन्स हा गरिबांचा आणि स्वयंपाक्यांचा आश्रयदाता संत असून आग आटोक्यात आणण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
 
✝️   
पहिले वाचन :  करिंथकरांस ९ : ६-१०
वाचन :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो."
जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मापाने कापणी करील.प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्म करत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुगे राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ११२:१-२,५-९
प्रतिसाद :  जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते.

१) परमेश्वराचे स्तवन करा. 
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य ! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल,
 सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल..

२) जो मनुष्य दया दाखवतो आणि
 उसने देतो त्याचे कल्याण होते, 
तो न्यायाने आपले व्यवसाय करील. 
तो कधीही ढळणार नाही, 
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.

३) तो वाईट बातमीला भिणार नाही,
 त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते,
 त्याचे मन स्थिर असते, 
आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे 
झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. 

४)त्याने सढळ हाताने गरिबांस दानधर्म केला आहे, 
त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील.
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात 
चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!

शुभवर्तमान  योहान १२:२४-२६
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : हे जीवन म्हणजे मानवाला मिळालेली देवाची देणगी आहे. या जीवनात माणसाने दुसऱ्यांची सेवा करावी. येशूचा सेवक होऊन येशूची शिकवण अनुसरावी. सेवक बनून जो कोणी येशूची सेवा करील त्याचा सन्मान देव करील असे येशू सांगत आहे. माणसाने दुसऱ्यांवर प्रेम आणि स्वतःचा द्वेष करावा अशी सार्वकालिक जीवनासाठी येशूची शिकवण आहे. म्हणून येशू गव्हाच्या दाण्याचा दाखला देत आहे. गव्हाचा दाणा न मरता एकटाच राहातो. पण तोच जमिनीत पडून मरतो आणि पुष्कळ पीक देतो. गव्हाचा दाणा होऊन जमिनीत पडून मरावे, अंकुरीत होऊन पुष्कळ पीक द्यावे. देवाच्या कार्यांसाठी मरण्यास मी तयार आहे का ? आज संत लॉरेन्स ह्यांच्या सणाचा दिवस आहे. ते डीकन आणि रक्तसाक्षी झाले. त्यांनी जीवनात सर्वकाही गमाविले. मात्र स्वर्गीय सुख कमाविले.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, स्वतःवरच केवळ प्रीति न करता आमच्यामध्ये  परोपकाराची वृत्ती वाढीस लागावी म्हणून आम्हास कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या