Marathi Bible Reading | Tuesday 9th August 2022 | 18th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १८ वा सप्ताह  

मंगळवार  ९ ऑगस्ट २०२२

"तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही."




 नॉर्थुम्ब्रियाचे संत ऑझ्वल्ड
- रक्तसाक्षी ( ६४२)


. येहज्केलने देवाची आज्ञा स्वीकारुन इस्त्राएलला मार्गदर्शन केले.
  लहान बालके ही देवाघरची जणू फुले आहेत. आज आपण त्यांच्यातील| निरनिराळ्या गुणांवर चिंतन करु या. विशेषतः प्रभूयेशू आपल्याला नम्रतेचा गुण लहान मुलांतून शिकण्यासाठी सांगत आहे. 
नम्रता म्हणजे निरागसता, शुध्दता व आज्ञापालन. लहान बालकांच्या शब्दाद्वारे व आचरणाद्वारे त्यांच्यातील पवित्रता, शुध्दता आणि प्रेमळता दिसून येते. लहान बालके पूर्णतः आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतात. त्यांची पूर्ण भिस्त त्यांच्यावर  असते. आपण आज चिंतन करु या की आपण त्या बालकांप्रमाणे शुध्द, पवित्र, निरागस, आज्ञाधारक व प्रेमळ आहोत का ?  
✝️   
पहिले वाचन : यहेज्केल  २:८-३:४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"त्याने मला तो ग्रंथपट सेवन करायला दिला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.'
“हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक, त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस, आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा." मी पाहिले तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि पाहा, त्या हातात ग्रंथपट होता, तो त्याने माझ्यापुढे पसरला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्यांविषयी लेख होता. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल." तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर." मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग़ तो मला म्हणाला, “मानवपुत्रा. जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्याच्याजवळ माझी वचने बोल."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ११९:१४; २४, ७२.१०३,१११,१३१
प्रतिसाद : प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात.

१ तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा 
असे मानून मी अत्यांनद करतो. 
तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत,
 ते माझे मंत्री आहेत.

२ सोन्यारुप्याच्या लक्ष्यावधी नाण्यांपेक्षा 
तुझे तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
 तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात! 
माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.

३ तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन 
म्हणून मी स्वीकारले आहेत,
 कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो, 
मी तोंड उघडून धापा टाकल्या, 
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
 हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १८ : १-५,१०,१२-१४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“संभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका." 
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, "मी तुम्हांला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गांच्या राज्यात सर्वांत मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. संभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. तुम्हांला काय वाटते ? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही का ? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचित सांगतो. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : 
बालकांसारखा होणाराच स्वर्गात मोठा होऊ शकतो. कारण मुलं ही देवाघरची फुलं आहेत. मुलं ही निर्मळ व निःस्वार्थी असतात. मुलांमध्ये कपट नसते किंवा ती अहंकारी नसतात. ती भोळी भाबडी अशी सरळ मनाची असतात.म्हणून येशू बालकांसारखे होण्यास सांगत आहे. स्वर्गाच्या राज्यात मोठे होण्यास संधी देत आहे. त्याकरिता भटकलेल्या मेंढराचा दाखला देत आहे. एकाचाही नाश होऊ नये असा हवाला घेत आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात मशगुल आहे. आपापल्या परीने मोठा होऊ पाहात आहे. पण जो भटकला आहे त्याला शोधले पाहिजे. त्याला वाहत्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे. परिवारात भरकटलेल्यांचा मी शोध घेतो का? समाजात वाया गेलेल्यांना मी  सन्मार्गावर आणतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशु, तुझ्या वचनांवर चिंतन-मनन करीत सर्वदा तुझ्या आज्ञेत राहण्यास मला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या