सामान्यकाळातील १९ वा सप्ताह
सोमवार ८ ऑगस्ट २०२२
चिंतन : ज्याचा आपल्या देहवासनांवर ताबा आहे तोच विश्वाचा खरा सम्राट आहे. संत डॉमणिक
प्रभू येशूने आपला मृत्यू व त्यानंतरचे पुनरुत्थान ह्याविषयीचे भाकित आपल्या शिष्यांना सांगितले. प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण हे अखिल मानव जातीच्या तारणसाठी समर्पित केलेला यज्ञ बळी आहे. पुनरुत्थानामुळेच ख्रिस्ताचे दैवत्व प्रकट झाले. पुनरुत्थानामुळेच विश्वासणाऱ्यांची श्रद्धा बळकट झाली. पुनरुत्थानामुळेच प्रभू येशूने सार्वकालिक जीवनाचा मार्ग सिद्ध केला. मात्र प्रभू येशू सर्वांचा न्याय करण्यासाठी मेघावर आसनारुढहोऊन पुन्हा येणार असल्याचे भाकित आज आपल्याला पहिल्या वाचनात सांगण्यात आले आहे. म्हणूनच आपण सर्वदा तयार असले पाहिजे.
आपण आपल्या जीवनात पुनरुत्थित प्रभूला स्वीकारु या आणि सार्वकालिक जीवनासाठी तयारी करु या.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल १:२-५.२४-२८
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराच्या गौरवाचे दर्शन हे असे होते."
(यहोयाखीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी) त्या महिन्यात पाचव्या दिवशी खास्द्यांच्या देशात खबार नदीच्या तिरी बुजीचा पुत्र यहेज्केल याजक याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले, तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आला.
मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता, त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्यासारखे तेज झळकत होते. त्याच्या मध्यभागी चार प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले. दिसण्यात ते मनुष्याकृती होते.
ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला. तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता. लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता. ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.
त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता. त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला. त्याच्या कमरेपासून वर आणि त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला आणि त्यांच्याभोवती प्रभा चमकत होती. पावसाच्या दिवशी मेघात दिसणाऱ्या धनुष्यांप्रमाणे त्यांच्याभोवती प्रभा फाकलेली मला दिसली, परमेश्वराच्या गौरवाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उघडा पडलो आणि कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४९:१-२,११-१४
प्रतिसाद : तुझ्या गौरवाने स्वर्ग आणि पृथ्वी भरलेली आहे.
१) परमेश्वराचे स्तवन करा,
आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा,
ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा,
त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.
२) पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा,
अधिपती आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश,
कुमार आणि कुमारी, वृद्ध आणि तरुण त्याचे स्तवन करोत.
३ )ही सगळी परमेश्वराच्या नावाने स्तवन करोत,
कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे.
त्याचेच ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.
४) त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे
तो आपल्या भक्तांना,
त्यांच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे
इस्राएलच्या संततीला स्तुतिपात्र आहे.
परमेश्वराचे स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे
मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १७ : २२-२७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याच्या पुत्राला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल."
शिष्य गालीलात एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल. तेव्हा ते फार खिन्न झाले.
नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचे नाणे वसूल करणारे पेत्रकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा नाणे देत नाही काय? त्याने म्हटले, हो, देतात, मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन शेकेलचे नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : स्वर्गातील विधी व नीतीनियम देवाचे आहेत. जगातील नीतिनियम मानवाचे आहेत. जगात वावरणाऱ्याला ते सक्तीचे आहेत. येशूने ते नीतिनियम व रिती-रिवाज पाळले. मंदिराच्या पट्टीचे रूपये भरले. खरे पाहता, जकात परक्यांपासून घेतली जाते. येशू हा परका नव्हता. तो स्वतः मालक होता. देवाचा पुत्र.... सृष्टीचा पालक होता. कर भरायची त्याला गरज नव्हती. परंतु अडथळा नको म्हणून येशू कर भरतो. ज्या समाजात राहतो, त्याचे आपण देणे लागते. त्या समाजाचे रिती-रिवाज आपण पाळले पाहिजेत. समाजाच्या सुख-दुःखाशी समरस झाले पाहिजे. | समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असले पाहिजे. माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी मी हातभार लावतो का? माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी मी काय करू शकतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानाचे सहभागीदार बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या