Marathi Bible Reading | 19th Sunday In Ordinary Time | 7th August 2022 |

सामान्यकाळातील १९ वा  रविवार 

७ ऑगस्ट   २०२२

 धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य,  
 

तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.

 शुभवर्तमानात प्रभू येशू आज इमानी कारभाऱ्याचा दृष्टांत देऊन विश्वासात टिकून राहण्यासाठी आपल्याला सतत जागृतीची आवश्यकता आहे, हे स्पष्ट करुन सांगत आहे. आपले जीवन देवाच्या आज्ञेनुसार व देवाच्या वचनाप्रमाणे जगून देवराज्यात जाण्यासाठी एक अद्भुत प्रवास आहे. हा प्रवास  जरी खडतर वाटत असला तरी अशक्य मात्र नाही; ह्या जगातील वैभव क्षणभंगूर आहे व एक दिवस आपण मृत्यू पावणार आहोत म्हणूनच आपल्याला जागृतीची आवश्यकता आहे.

आपण आपले जीवन स्वत: पूरतेच न जगता आपल्या सभोवतालच्या गरजवंतासाठीसुद्धा मदतीचा हात द्यावा. 

✝️   
पहिले वाचन :ज्ञानग्रंथ  १८:६-९
वाचक : ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्या साधनांनी तू आमच्या शत्रूंना शिक्षा केलीस, त्याच साधनांनी तू आम्हांला तुझ्याकडे बोलावलेस आणि आमचा गौरव केलास." 
ती रात्र आपल्या वाडवडिलांना अगोदरच माहीत करून देण्यात आली होती की, ज्यामुळे त्यांनी आपल्या विश्वास ठेवलेल्या आणाभाका विषयीच्या ज्ञानात हर्ष मानावा. न्यायी लोकांची सुटका आणि दुश्मनांचा नाश तुझ्या लोकांना अपेक्षित होता. ज्या साधनांनी तू आमच्या शत्रूंना शिक्षा केलीस त्याच साधनांनी तू आम्हाला तुझ्याकडे बोलावलेस आणि आमचा गौरव केलास. गुप्तपणे सुजनांच्या पवित्र मुलांनी बळी अर्पण केले आणि एकमनाने तुझे दैवी नियम पाळण्याचे मान्य केले. सुखदुःखात सर्व संतांनी सारखेच सहभागी व्हावे म्हणजे ते आपल्या वाडवडिलांची गीते गाऊ लागतील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :३३:१,१२,१८-२०,२२
प्रतिसाद :  ज्या लोकांना प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !

१) अहो, नीतिमानांनो, 
परमेश्वराचा जयजयकार करा, 
प्रामाणिक स्वभावाच्या माणसांना स्तुतिगान शोभते. 
ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता
 प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !

२) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात 
आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, 
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा 
आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा 
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. 

३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे,
 आमचे साहाय्य व ढाल तोच आहे 
हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. 
म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो.


दुसरे वाचन  इब्री  ११:१-२.८-१९
वाचक: इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"आब्राहाम देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची वाट पाहत होता."

* (विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. आब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला, त्याच वचनाचे सहभागी वारीस इसहाक आणि याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या आणि देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्याला विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.)
हे सर्वजण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली आणि तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहो असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
आब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करत होता; त्याला असे सांगितले होते की, “इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” तेव्हा मेलेल्यातूनदेखील उठवायला देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १२:३२-४८
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन   
"तुम्हीसुद्धा तयार राहा.' 

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “हे लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा, तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा, तेथे चोर येत नाही आणि कसर लागत नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.”
*("तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या, धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पहात असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य, मी तुम्हांला खचित सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेला चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कळणार नाही, त्या घटकेला मनुष्याचा पुत्र येईल.” ) *तेव्हा पेत्रने म्हटले, "प्रभुजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना ?” तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण ? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. पंरतु आपला 'धनी यायला उशीर लागेल' असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेला त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्यायोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या जवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.”

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आजची सर्व वाचने मानवाच्या परमेश्वराशी असलेल्या एकनिष्ठेविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. ही निष्ठा आज्ञाधारकपणातून प्रकट करता येते. त्यावरून आजचे शुभवर्तमान चारप्रकारच्या व्यक्ती सादर करताना आढळते. 
अ. एकनिष्ठ व्यक्ती : अशी व्यक्ती सदेव जागृत आणि तयार असते. आपल्या धन्याच्या स्वागतासाठी उचित कपडे पांघरून, आपले दिवे लावून ती थांबलेली असते. ती सदैव कामात गर्क असते. चोर येवो की आपला मालक येवो, ह्या व्यक्तीची परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असते. अशा व्यक्तीचे येशू कौतुक करून तिला 'धन्य' म्हणतो. 
ब. निष्काळजी व्यक्ती : अशी व्यक्ती गृहीत धरून चालते की आपल्या धन्याला उशीर होणार आहे. त्यामुळे ती खाऊन पिऊन मस्त होते आणि घरातील नोकर, चाकर व चाकरिणी ह्यांना मारहाण करते. अशा व्यक्तीला अकस्मात पकडले जाते व कामावरून कमी केले जाते. येशू अशा व्यक्तीचा उल्लेख “अविश्वासू” असा करतो. 
क. हेतुपुरस्पर अविश्वासू राहणारी व्यक्ती : आपल्या धन्याला नेमके काय हवे हे या व्यक्तीला ठाऊक असते तरीही अशी व्यक्ती मुद्दामहून आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करते. ती व्यक्ती आपल्या धन्याच्या आगमनाची कसलीच तयारी करीत नाही. येशू ह्या व्यक्तीला भयंकर शिक्षा होईल. असे भवितव्य वर्तवितो. 
ड. निर्विकारपणे अविश्वासू असणारी व्यक्ती : आपल्या धन्याला नक्की काय हवे हे ह्या व्यक्तीला ठाऊक नसते. त्यामुळे ती निरागसपणे निर्धास्त राहते. अशा  व्यक्तीचा दोष गंभीर नसला तरी तिलाही सौम्य शिक्षा होईल असे येशू सुचवितो.
आत्मपरीक्षण : मी माझ्या जीवनातील कोणकोणत्या क्षेत्रांत परमेश्वराशी विश्वासू आहे ? अविश्वासूपणाचा कोणता प्रकार माझ्या जीवनात प्रभावीपणे कार्यरत आहे ?
प्रार्थना : हे परमेश्वरा बापा, श्रद्धेने तुला अनुसरण्यास व सन्मार्गावर चालण्यास  आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या