Marathi Bible Reading | Saturday 6th August 2022 | 18th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १८ वा सप्ताह  

शनिवार ६ ऑगस्ट २०२२

"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."




  प्रभू येशूचे रुपांतर

आपल्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान घटनेच्या जवळजवळ एक वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या तीन लाडक्या शिष्यांना पेत्र, याकोब व योहान ह्यांना-कैसेरिया फिलिप्पीयाजवळ असलेल्या डोंगरावर नेले. ऑरिजेन या धर्मगुरूंच्या काळातील एका परंपरेनुसार (इ. स. २५४) हा पर्वत गालिलीतील ताबोर पर्वत असल्याचे मानले जाते. तिबिर्याच्या समुद्र सपाटीपासून या डोंगराची उंची २,००० फूट इतकी आहे.
या डोंगरावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आपले वैभव प्रकट केले. त्याचे मूख सूर्यासारखे तेजस्वी झाले. त्याची वस्त्रे बर्फासारखी शुभ्र व चकचकीत झाली. मोशे आणि एलिया त्याच्या बाजूला उभे असलेले शिष्यांच्या दृष्टीस पडले (मोशे हे नियमशास्त्राचे तर एलिया हे संदेष्ट्यांचे प्रतीक मानले गेले आहे) आकाशातून वाणी झाली की, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. "
दुःखसहनाच्या काळात आपल्या शिष्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून प्रभूने आपल्या वैभवाचे दर्शन त्यांना ह्या रूपांतराच्या रूपाने घडविले.
पुढे निसर्ग देवतेची पूजा करणाऱ्या अख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर येशूचे रूपांतर हा सोहळा चौथ्या व पाचव्या शतकात उदयास आला. मात्र पोप कॅलिस्टस तिसरे ह्यांनी बेलग्रेड येथे हुनियादी जानोस ह्याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ १४५६ साली हा सोहळा संपूर्ण जगभर साजरा केला जावा असा आदेश काढला. स्वत: पोप महाशयांनी या सोहळ्यानिमित्ते तयार केलेली प्रातः प्रार्थना व सायंप्रार्थना धर्मगुरूंच्या (ब्रिव्हरी) प्रार्थना पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.
ह्याच दिवशी रोममध्ये संत जॉन लॅटरन महामंदिराचा सणसुद्धा साजरा केला जातो..
चिंतन : “आपण इथे असावे हे बरे आहे” असे संत पीटर प्रभूला म्हणाला. येशूच्या बरोबर असणे आणि सर्वदा त्याच्या सहवासात राहणे खरोखर किती चांगले आहे. परमेश्वराच्या सहवासात राहणे, त्याच्या समान होत जाणे आणि त्याच्या दिव्य तेजात न्हाऊन निघणे ह्यापेक्षा आपला सन्मान तो काय? - सिनाईचे बिशप अनास्थासियुस
 
✝️   
पहिले वाचन :दानीएल ७:९-१०,१३-१४
वाचन : दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता. "
मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ९७ : १-२, ५-६,९
प्रतिसाद : परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे.

१) परमेश्वर राज्य करतो,  
पृथ्वी उल्हास करो, द्विपसमूह हर्ष करो. 
ढग आणि अंधार त्याच्याभोवती आहेत, 
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.

२) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर 
पर्वत मेणाप्रमाणे वितळले. 
आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते, 
सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते.


दुसरे वाचन २ पेत्र  १ : १६- १९ 
संत पेत्राने पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन
“आकाशातून आलेली ही वाणी आम्ही ऐकली.' "

चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही, तर त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान आणि गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे." त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टयाचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंत:करणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, 
ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ९ : २८-३६
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ९:२८-३६
"येशू प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर झाले. "
पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थन करण्यास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि पाहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन येरुशलेममध्ये पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र आणि सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले आणि त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्रने येशूला म्हटले, "गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे, आम्ही तर मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक" हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : येशूचे रूपांतर त्याच्या ईश्वरी स्वरूपाचा एक पुरावा आहे. येशू जसा मानवी तसाच दैवी होता. मानवी रूप बाराही प्रेषितांनी अनुभवले होते. मात्र दैवी रूप येशू तीनच प्रेषितांना दाखवितो. येशू आपल्या ईश्वरी स्वरूपाचा कांगावा करीत नाही. रूपांतरावेळी त्याची वस्त्रे पांढरे व चकचकीत होतात. येशूसह एलिया व मोशे प्रेषितांना दिसतात. त्यांच्या नजरेसमोर ते तेजोमय होतात. हे अद्भूत असे पाहता ते भारावून जातात. आणि येशूबद्दल ते देवाची वाणी ऐकतात. ख्रिस्तसभेची कार्य करताना निष्पाप असले पाहिजे. देवा धर्माच्या कार्यासाठी निःस्वार्थी असले पाहिजे. सत्कार्य करताना प्रसन्नचित्त असले पाहिजे. कोणत्याही कामाचा गवगवा करता कामा नये. आपल्या कार्याचा बाजार मांडता कामा नये. मी गरिबांची सेवा, दानधर्म, प्रार्थना करतो का ? मी येशूची सुवार्ता घोषवितो का ? अशी कार्य करताना मी निःस्वार्थी राहतो का ? मी मान-सन्मानाची अपेक्षा तर करत नाही ना ?
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हावर तुझ्या दयेचा वर्षाव कर, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या