Marathi Bible Reading | Friday 5th August 2022 | 18th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील १८ वा सप्ताह  

शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२

मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ?




  संत मेरी मेजर महामंदिराचे समर्पण

इ. स. ३५५ साली रोम शहरात इस्क्वीलाईन हिलवर पोप लिबेरियुस ह्यांनी एक चर्च उभारलेलं होतं. पुढे ९० वर्षांनी पोप सिक्स्टस तिसरे ह्यांनी या बॅसिलिका लिबेरियानाचे नूतनीकरण केले आणि ते पवित्र मरियेला अर्पण केले. इ. स. सातव्या शतकापासून ह्या चर्चला संत मेरी ऑफ द मेंजर (गोशाळेतील संत मरिया) या नावाने संबोधले जाते. कारण या चर्चमध्ये बेथलेहेमच्या गोशाळेचे पवित्र अवशेष ठेवलेले आढळतात. तसेच जगभर पवित्र मरियेच्या नावाने बांधल्या गेलेल्या कोणत्याही ख्रिस्तमंदिरापेक्षा हे महामंदिर सर्वात मोठे असल्याने त्याला संत मेरी मेजर हे नाव आता सर्वपरिचित झालेले आहे.
कालांतराने उदयास आलेल्या एका दंतकथेनुसार ४ ऑगस्ट ३५५ च्या रात्री झालेल्या हिमवर्षावात या चर्चला एक विशिष्ट आकार प्राप्त झाला. पुढे त्याच आकारानुसार महामंदिराची रचना करण्यात आली. या अद्भुत घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी ५ ऑगस्टला या सणानिमित्ते पवित्र मरियेच्या इमाजीवर वरील छतामधून जास्मीन व गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो.
आजच्या शुभवर्तमानातील ह्या अमृत वचनाच्या प्रेरणेने आणि  प्रभावाने संत फ्रान्सिस झेविअरचे जीवन परिवर्तन झाले. त्याने त्याचे संपूर्ण जीवन ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित केले. जागतिक सुखापेक्षा | स्वर्गीय सुखाची आशा वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करु या. 
 
✝️   
पहिले वाचन : नहूम १:१५;२.२, ३:१-३.६-७
वाचन : नहूम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"रक्तपिपासू नगरीचा धिक्कार असो."

शुभसंदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतांवर पाहा! हे यहुदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. कारण परमेश्वर याकोबचे ऐश्वर्य इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापीत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षमळ्याची नासधूस केली आहे.
रक्तपाती नगरीचा धिक्कार असो! कपट आणि खून यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही. चाबकांचा फटकारा, चाकांचा घडघडाट यांचा शब्द होत आहे; घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडेस्वारांची दौड, तलवारीची चमक, भाल्याचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधिलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.
मी तुझ्यावर घाण फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन आणि असे होईल की कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पण काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील ? तुझे सांत्वन करणाऱ्यांना कोठून शोधून आणू ?
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : अनुवाद ३२:३५-३६, ३९, ४१
प्रतिसाद : प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे.

१) त्यांचा संकटकाल जवळ आला आहे; 
त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकरच येत आहेत.
 हे परमेश्वर पाहील तेव्हा तो 
आपल्या लोकांचा न्याय करील, 
त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
माझ्याशिवाय कोणी देव नाही.

२) आता पाहा, मी, मीच तो आहे, 
प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे; 
माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.

३) मी आपली चमकणारी तलवार पाजळली, 
मी न्याय हाती घेतला,
तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन,
माझ्या वैऱ्यांचे उसने फेडीन.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत; 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत. 
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १६ : २४-२८
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार ? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. मी तुम्हाला नक्कीच सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : या सुवार्तेद्वारे येशू मिशन दाखवीत आहे. मिशनकार्याची दिशा व भूमिका तो स्पष्ट करीत आहे. प्रत्येक कार्याची दिशा व स्पष्ट भूमिका असते. 
१. विद्यार्थ्यांसाठी नियम व निर्बध असतात. 
२. सैनिकांसाठी शिस्त व अनुशासन असते. 
३. देशासाठी कायदे-कानून असतात आणि 
४. धर्मासाठी विधी व नीतिनियम असतात. 
देवाची दिशा व धर्माची धार्मिक भूमिका स्पष्ट आहे. ती समजून घेऊन अनुसरली पाहिजे. क्रूस हा येशूच्या मिशनकार्याचा प्रतिक आहे. तोच क्रूस आपण प्रतिक मानला पाहिजे. मग तो क्रूस जीवनाचा अगर कुटुंबाचा असो. कामा-धंद्याचा किंवा मिशनकार्याचा असो. आपण स्वतःहून उचलावा व चालावे. मात्र येशूचा मार्ग तो अनुसरावा. येशू गौरवानिशी पुन्हा येणार आहे. ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे तो फळ देणार आहे. माझा क्रूस घेऊन मी येशूला अनुसरत आहे का? येशू पुन्हा येईल; योग्य मोबदला मिळेल का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील वधस्तंभ वाहण्यास व तुला अनुसरण्यास
आम्हाला शक्ती व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या