सामान्यकाळातील १८ वा सप्ताह
गुरुवार ४ ऑगस्ट २०२२
ख्रिस्तसभा आज सर्व धर्मगुरुंचा आश्रयदाता संत जॉन वियानीचा सण साजरा करीत आहे. संत जॉन वियात्रीची वैयक्तिक प्रार्थना, प्रभू येशूवर व देवावर असलेली दृढश्रद्धा आणि सेवाकार्यातील तत्परता ह्यामुळे त्यांनी आध्यात्मिकतेची उंची गाठली. नम्रता, सहनशीलता, गरिबीचे व्रत, लोकांसाठी तळमळ व कार्यतत्परता अशा विविध गुणांचे अनुकरण करुन सर्व धर्मगुरुंना त्याचा कित्ता गिरवता यावा म्हणून आपण प्रार्थना करु या. विशेषतः आपल्या धर्मग्रामातील सर्व धर्मगुरुंसाठी आपण विशेष प्रार्थना करु या.
धर्मगुरूंसाठी प्रार्थना
हे प्रेमळ प्रभो, /आमच्या धर्मगुरूंचा / सांभाळ कर. / ते तुझे आहेत. तुझ्या पवित्र मंदिरात / त्यांच्या जीवनाचे दीपतेवत आहेत. ते जगाचे आहेत, परंतु जगाचे नाहीत. / जेंव्हा त्यांना ऐहिक सुखाचा/ मोह होईल /तेव्हा तुझ्या हृदयात / तू त्यांना सुरक्षित ठेव./ ते एकाकी असताना, / तू त्यांना सांभाळ./ धर्मगुरू म्हणून /आपण करीत असलेला त्याग / व्यर्थ आहे, असे त्यांना वाटू लागेल/ तेव्हा त्यांना दिलास दे. त्यांना तुझ्या शिवाय / कोणीच नाही, तरीही त्यांना संवेदनशील / मानवी हृदय आहे./ देहाचा दुर्बलपणा आहे,/ ह्याची आठवण ठेव./ जी पवित्र भाकर/ ते दररोज हाती घेतात, त्या भाकरीसारखे त्यांना अतिनिष्कलंक ठेव. / त्यांचे सर्व विचार, शब्द आणि कृती / ह्यांना तू आशीर्वाद दे /आमेन.
✝️
पहिले वाचन : यिर्मया ३१:३१-३४
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी नवीन करार करीन. त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही असे परमेश्वर म्हणतो."
पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलचे घराणे आणि यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवीन करार करीन असे परमेश्वर म्हणतो. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. म्हणून परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलांवर लिहीन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यांना, कोणी आपल्या बंधूला, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ५२:१२ - १५, १८-१९
प्रतिसाद :हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.
१) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर,
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
२) तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे
आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;
म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन.
आणि पापीजन तुझ्याकडे वळतील.
३ तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाही तर तो मी
केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही.
देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा;
हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका,
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १६ : १३-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस; मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पीच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?” ते म्हणाले, “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिमर्या, किंवा संदेष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात.” तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” तेव्हा त्याने शिष्यांना निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.तेव्हापासून येशू आपला शिष्यांना सांगू लागला की, मी येरुशलेमला जाऊन वडील, मुख्य याजक, आणि शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याला निषेध करून म्हणाला, “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही." परंतु तो वळून पेत्रला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, तर माणसांच्या गोष्टींकडे आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :येशू कोण आहे ?' या एका प्रश्नाला अनेक उत्तरे मिळू शकतात. “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.” असे पेत्र येशूला अपेक्षित उत्तर देतो तेव्हा येशू पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या देण्याचे वचन देतो. येशू दैवी वाटचालीसाठी दुःखाविषयी बोलतो तेव्हा तोच शिमोन -पेत्र निषेध करतो. कसला तो निषेध होता ? मला फक्त सुख पाहिजे, दुःख नको. देव पाहिजे, देवाठायी दुःखसहन नको. म्हणून येशू सैतानाची उपमा देत पेत्राला दूर सारतो. देवाठायी जीवन जगण्यासाठी दुःख आहेच. असे येशू प्रेषितांना सावध करतो. या एका प्रसंगावेळी दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना परस्पर विरोधी आहेत. १. देव विश्वासदर्शक उत्तरासाठी दैवी शाश्वती देतो. २. आपल्याला देवाठायी दुःख सहन करता यावे म्हणऊन तो आपल्याला वेगळं करतो. दैवी कार्याठायी दुःखसहनास मी तयार आहे का? धर्मगुरूंचा आश्रयदाता जॉन मारी वियानी ह्या संताचा आज सणाचा दिवस आहे. धर्मगुरूंसाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. धर्मगुरूंसाठी मी प्रार्थना करतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सेवाकार्याला वाहून घेतलेल्या सर्व धर्मगुरुंना चांगले आरोग्य लाभू दे, त्यांना तू सुरक्षित ठेव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या