सामान्यकाळातील १८ वा सप्ताह
बुधवार ३ ऑगस्ट २०२२
चिंतन : एखाद्या गोष्टीचा सार्वकालिक जीवनासाठी मला काय लाभ होणार असा प्रश्न आपण सतत आपल्या मनाला विचारला पाहिजे. - संत वॉल्थेऊफ --
प्रभू येशू हा तारणारा आहे आणि तो आपल्या मुलीला जीवनदान देईल अशा विश्वासाने कनानी स्त्री प्रभू येशूजवळ आली होती. ती परराष्ट्रीय होती म्हणून प्रभू येशूने तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दर्शविले. खरे पाहता प्रभू येशूला तिच्या श्रद्धेची कसोटी घ्यायची होती. त्या स्त्रीचा अपमान झाला असताना सुद्धा तिने प्रभू येशूला संपूर्ण विश्वासाने विनंती करीत म्हटले, 'प्रभूजी मला सहाय्य करा.' त्या कनानी स्त्रीचा विश्वास आणि कळकळीची विनंती मान्य केली व तिची मुलगी बारी झाली .
सहनशीलता, एकनिष्ठता आणि प्रभूपुढे शरणागती ह्या गुणांमुळे कनानी स्त्रीला देवाचा आशीर्वाद व कृपा प्राप्त झाली.
✝️
पहिले वाचन : यिर्मया ३१:१-७
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम केले आहे."
परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलच्या सर्व वंशाचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”
परमेश्वर म्हणतो, “तरवारीपासून निभावलेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; या इस्राएलला विश्रांती देण्याची मला जाणीव आहे,” परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले, तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्राएलच्या कुमारी मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिऱ्यांनी भूषित होशील आणि उत्सव करणाऱ्यांबरोबर नृत्य करशील. शोमरोनच्या डोंगरांवर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील आणि त्यांची फळे त्यांना लाभतील. कारण असा दिवस येत आहे की, त्यात एफ्राईम डोंगरावर पहारेकरी ओरडून सांगतील. “अहो ऊठा, आपण सियोनला आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ."
परमेश्वर म्हणतो, “याकोबविषयी आनंदाचा गजर करा, राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा; घोषणा करा, स्तवन करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्राएलच्या अवशेषाचा उद्धार कर."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : यिमर्या ३१:१०, ११-१२,१३
प्रतिसाद :परमेश्वर आपली निगा राखील.
१) अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका,
दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा
आणि म्हणा, ज्याने इस्राएलला विखुरले
तो त्यांना जमा करील;
मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो
तशी तो त्यांची निगा राखील.
२) कारण परमेश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे,
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या
हातून त्याला मुक्त केले आहे.
ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील,
परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य,
नवा द्राक्षरस, ताजे तेल आणि
गुरांमेंढरांचे कळप यांकडे लोटतील.
३) त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील,
वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील.
मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद निर्माण करीन,
मी त्याचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर
त्यांनी आनंद करावा असे मी करीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने..
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १५ : २१-२८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, तुझा विश्वास मोठा आहे. "
येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “हे प्रभो, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा; माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही." तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, "प्रभुजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे." तिने म्हटले, "खरेच प्रभुजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले खरखटे खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो” आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :कनानी बाई सोर व सीदोन भागातील होती. ती हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती तिची मुलगी अशुद्ध शक्तीच्या प्रभावाने आजारी होती. मुलगी बरी व्हावी म्हणून ती येशूकडे आली होती. येशू तीन वेळा तिला नकार देतो.
१. येशू काहीही बोलत नाही. मौन धरतो.,
२. त्याचे मिशन कार्य स्पष्ट करतो.,
३. मुलं व कुत्र्यामधील नाते स्पष्ट करतो. अशावेळी ती येशूला विश्वासदर्शक उत्तर देते. त्याचवेळी तिची मुलगी बरी होते. विश्वासामुळे येशू तिची इच्छा पूर्ण करतो.
१. कधी-कधी देव मौन धरतो, उत्तर देत नाही.
२. दैवी कार्य स्पष्ट करतो. थांबायला सांगतो.,
३. कधी-कधी लागलीच उत्तर देतो. कारण आपण देवावर दाखविलेला परिपूर्ण विश्वास. देवाला हवे असे जीवन मी जगतो का? येशूला अपेक्षित विश्वास मी बाळगतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेच्या कसोटीत उत्तीर्ण होण्यास व तुला शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या