सामान्यकाळातील २ वा  रविवार 

१८ सप्टेंबर  २०२२



 तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही."

 प्रभू आज आपल्याला धनसंपत्ती आणि देव ह्यापैकी एकाची निवड  करायला सांगत आहे. देवाठायी सार्वकालिक जीवन आहे. आपल्या भौतिक  गरजा भागविण्यासाठी धन-संपत्ती आवश्यक आहे. मात्र आपण त्याचे गुलाम बनू नये. संत पौल सांगतो त्याप्रमाणे, 'पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतिचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे.'


✝️   
पहिले वाचन : आमोस   ८:४-७
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"रुपे देऊन गरिबांना विकत घेणाऱ्याविरुद्ध."

तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता आणि देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका : तुम्ही म्हणता, चंद्रदर्शन कधी आटोपेल ? म्हणजे आम्हांला धान्य विकायला मिळेल, शब्बाथ केव्हा संपेल ? म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, मापे लहान करू, शेकेल मोठा करू आणि खोट्या तोल काट्याने फसवू, म्हणजे आम्ही रुपे देऊन गरिबांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरजवंतांना विकत घेऊ आणि गव्हाचे भूस विकून टाकू. परमेश्वराने याकोबच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, मी त्यांची कोणतीही कर्मे खात्रीने कधीही विसरणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ११३ : १-२, ४-६, ७-८
प्रतिसाद :  गरिबांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करा.

१) परमेश्वराचे स्तवन करा. 
परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा, 
परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. 
येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराचे नाव धन्यवादित असो.

२) परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उच्च आहे, 
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
 परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे.
 जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन
 करण्यासाठी लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे ?

३) तो दीनांना धुळीतून वर काढतो, 
गरिबांना उकिरड्यावरून उचलतो
 आणि त्यांना अधिपतींच्या होय, 
आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीला बसवतो.


दुसरे वाचन  १ तिमथी  २:१-८
वाचक: पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

“सर्व माणसांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा  आहे, त्याच्याकडे सर्व माणसांसाठी प्रार्थना करायला हवी. " 
सर्व प्रथम मी हा बोध करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी. राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरपणाने आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारायला योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वासाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित, (मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही) विश्वास आणि सत्य ह्यासंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो, 
स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १६:१-१३
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही. " 

(येशूने आपल्या शिष्यांना म्हटले) एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर, हा तुमचे द्रव्य उडवतो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो ? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तुझ्यावर कारभार सोपवला जाणार नाही. मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू ? खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हे तुझे करारपत्र घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे ? तो म्हणाला, शंभर खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि ऐंशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा, ह्यासाठी की, ते धन नाहीसे होईल तेव्हा मित्रांनी तुम्हांला सार्वकालिक निवासस्थानात घ्यावे.

("जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल ? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.")

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आजची शास्त्रवाचने निष्ठा आणि प्रतारणा ह्या परस्परविरोधी विषयांवर प्रकाश टाकीत असल्याचे दिसून येते. त्यातून आपल्याला तीन महत्वाची चिंतने लाभतात. 
अ. मानवाचा अविश्वासूपणा परमेश्वराच्या नजरेतून सुटत नाही: आमोस संदेष्ट्याने इस्राएली लोकांना सामाजिक अन्याय, गर्व, खोटी आशा, विकृत सुखासीनता, पोकळ भक्ती, लोभ आणि अल्पसंतुष्टपणा ह्या पापांविषयी खडसावले. आजच्या पहिल्या वाचनात लोक गरिबांना कसे अन्यायकारक वागणूक देत होते त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मात्र परमेश्वर सर्वसाक्षी, सर्वज्ञानी, सर्वव्यापी असून त्याच्या नजरेतून हा अविश्वासूपणा कसा सुटू शकत नाही हे आमोस लोकांना पटवून देतो. 
ब. प्रार्थनेद्वारे मनुष्य परमेश्वराशी असलेली आपली निष्ठा दृढ करू शकतो: आजच्या दुसऱ्या वाचनात 'सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्याची ओळख प्राप्त व्हावी म्हणून' समाजातील विविध घटकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन संत पॉल करीत आहे. अशाप्रकारच्या प्रार्थनामय जीवनाद्वारे मनुष्य परमेश्वराशी विश्वासू राहू शकतो. 
क. परमेश्वरावरील निष्ठा हे आपले अंतिम ध्येय असावे : आजच्या शुभवर्तमानात अन्यायीकारभाराचे शहाणपण सूचित करणारा दाखला देण्यात आलेला आहे. आपली नोकरी जाईल या भीतीने त्या कारभाऱ्याने आपल्या वाट्याला येणाऱ्या 'कमिशन'चा त्याग केला. त्यामुळे त्याने देणेकऱ्याची मने जिंकली व मालकाची मालमत्ता शाबूत राखून त्याचीही मर्जी संपादन केली. त्याने नाशवंत संपत्तीचा वापर करून अविनाशी असे नातेसंबंध जोपासले त्याप्रमाणे नाशवंत अशा पैशाचा विश्वासूपणे, शहाणपणाने व दानशूरपणे वापर करून ख्रिस्तशिष्याने परमेश्वरावरील निष्ठा हे आपले अंतिम ध्येय आहे हे सूचित करावे.

आत्मपरीक्षण: माझ्या जीवनात निष्ठा आणि प्रतारणा ह्यांच्यात कोणकोणत्या बाबतीत संघर्ष आहे ?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सर्वस्वी तुझी सेवा करण्यास मला कृपा व सामर्थ्य दे,  आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️