Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Saturday 17th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

शनिवार १७ सप्टेंबर २०२२

 चांगल्या मातीत पडलेले हे आहे की, ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.




 संत रॉबर्ट बेलार्मीन

महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२ - १६२१)

 चिंतन : परोपकार ही अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय कुणाचे तारण होऊ शकत नाही आणि जिच्यामुळे कुणाचा नाश होऊ शकत नाही.
- संत रॉबर्ट बेलामन

देवाने देऊ केलेल्या स्वर्गराज्याचे रहस्य जाणण्याचे दान आपल्या प्रत्येकाला मिळाले आहे. पवित्र शास्त्र म्हणजेच देवराज्याची वचने आहेत. - दररोज ही वचने वाचण्यासाठी व मनन चिंतन करुन आचरण करण्यासाठी  आपल्याला प्रेरणा लाभावी म्हणून प्रभूकडे विनवणी करू या.
✝️   

पहिले वाचन : करिथ  १५:३५-३७,४२-४९
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते."

कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात आणि ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात ? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही आणि तू पेरतोस ते पुढे आकारीत होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचाही असेल.
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते. जे अशक्तपणात पेरले जाते. ते सामर्थ्यात उठवले जाते. भौतिक शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला.” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असाझाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, भौतिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत आणि तो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ५६:९,१०- १३
प्रतिसाद :जीवनाच्या प्रकाशात मी देवासमोर चालेन.

१) मी तुझा धावा करीन त्यादिवशी 
माझे वैरी मागे फिरतील.
देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.

२) देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची
प्रशंसा करीन, परमेश्वराच्या सहाय्याने 
त्याच्या वचनाची प्रशंसा करीन.
देवावर मी विश्वास ठेवला आहे, 
मी भिणार नाही,
मनुष्य माझे काय करणार ?

३) हे देवा, तुझ्या नवसाचे ऋण माझ्यावर आहे. 
मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन, 
कारण तू माझा जीव मरणापासून रक्षिला आहे, 
जीवनाच्या प्रकाशात मी देवासमोरचालावे म्हणून
पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाहीत काय ?


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  

हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ८:४-१५
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"वचन ऐकून जे सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. ते चांगल्या मातीत पडलेले बी आहे."

जेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला आणि गावोगावचेही लोक येशूजवळ आले तेव्हा तो दाखला देऊन म्हणाला : “पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले आणि आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून शंभरपट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकायला कान आहेत, तो ऐको."

तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? येशू म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, कारण त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये आणि ऐकत असता त्यांना समजू नये.” हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंत:करणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहे की, ते ऐकतात, वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते, ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहे की, ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन आणि विषयसुख ह्यात आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते आणि ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहे की, ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय ९, वचन ७-६ यात म्हटले आहे. की, संतोषाने देणारा  देवाला प्रिय असतो. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशूच्या देवराज्याच्या घोषणेत अनेक स्त्रियांनी आर्थिक मदत केली. स्त्रियांनी त्यांच्या कमाईतून सुवार्ता पसरविण्याच्या कार्यात आपले योगदान दिले. ज्यावेळी आपण आपल्या कमाईचा एक हिस्सा देवाच्या कार्यासाठी देतो, तेव्हा देव आपल्याला शंभर पटीने परत देतो, हा अनुभव आपल्या मधील अनेकांना आलेला आहे. देवाने आपल्याला अनेक दानांनी, कला कौशल्याने व आर्थिकरित्या सक्षम केले आहे. आपणही आपापल्या परीने देवकार्यासाठी हातभार लावला पाहिजे. आजच्या शुभवर्तमानातील स्त्रिया आपणांसाठी आदर्श आहेत. मोकळ्या मनाने व हृदयात कोणताही  संशय न धरता परमेश्वराच्या कार्यात हातभार लावण्यासाठी परमेश्वराची प्रेरणा मागूया !

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा तारणदायी शब्द मला ग्रहण करता यावा व माझे  जीवन फलदायी बनावे म्हणून मला कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️