Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Friday 7th October 2022 | 27th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २७ वा सप्ताह  

शुक्रवार ७ ऑक्टोबर २०२२

 हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभु तुझ्याबरोबर असो'.



 जपमाळेची पवित्र मरिया

संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी पवित्र जपमाळेचे महत्त्व पुढील शब्दांत व्यक्त केले आहे. "पवित्र जपमाळेच्या भक्तीने संपूर्ण जगात खूप विलक्षण बदल घडवून आणलेला आहे. अनेक आत्मे पापांपासून मुक्त झालेले आहेत, काहींनी पवित्र जीवनाला वाहून घेतले तर पुष्कळांना चांगले शांतीने मरण आले.” पवित्र जपमाळेची प्रार्थना खूप भक्तीभावाने म्हटली गेली पाहिजे. संत युलालिया हिला आपल्या देवमातेने एकदा सांगितले की, घाईघाईने १५ रहस्ये म्हणण्यापेक्षा ५ रहस्ये अगदी सावकाश आणि भक्तीभावाने प्रार्थिल्याने मला आनंद होईल.

१३ मे व १३ जून १९१७ साली फातिमा येथे मुलांना दिलेल्या (फ्रान्सिस्को, जसिंटा व लुसी) दर्शनाच्या वेळी पवित्र मरिया त्यांना म्हणाली, “पवित्र जपमाळेची प्रार्थना भक्तीभावाने म्हणा आणि संपूर्ण जगासाठी शांतीचे वरदान मागा. प्रत्येक रहस्यानंतर म्हणा, हे माझ्या येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे संरक्षण कर. सर्व लोकांना स्वर्गाकडे ने, विशेषकरून ज्यांना तुझ्या दयेची अधिक जरूरी आहे."

पवित्र जपमाळेच्या प्रार्थनेचा सण इ. स. १५७१ पासून पोप पायस ५ वे ह्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली. लिपान्टो येथील युद्धात तुर्कावर मिळविलेल्या विजयानिमित्ते देवाचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा सण साजरा केला.

पवित्र मरियेने रोझरी प्रार्थनेची भक्ती प्रथम संत डॉमणिक ह्यांना प्रकट केली असे किमान १३ वेगवेगळ्या पोपमहाशयांनी आपापल्या परिपत्रकामधून स्पष्ट केले आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांचे शिक्षक एक डॉमणिकन धर्मगुरू होते. त्यांचे नाव रेजिनाल्ड गारिरो लाएंगे. तारणाऱ्याची माता ह्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: “संध्याकाळ झाली की संत डॉमणिक खेडेगावात जात, लोकांना श्रद्धेचे एक एक रहस्य शिकवीत. प्रत्येक रहस्यानंतर 'आमच्या स्वर्गीय बापा आणि नमो कृपापूर्ण मरिये' ह्या प्रार्थना म्हणत.” अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि धर्मशिक्षण ह्यांची सुंदर गुंफण त्यांनी घातलेली होती.

पोप पॉल सहावे म्हणत, रोझरीच्या प्रत्येक रहस्यावर थोडावेळ चिंतन करावे. असे चिंतन न केलेली प्रार्थना पोपटपंची आणि यांत्रिक बनेल. चिंतनमननाविना रोझरी म्हणजे आत्म्याविना शरीर होय!

पोप पायस पाचवे ह्यांनी सुरू केलेला सण १७१६ पर्यंत संपूर्ण जागतिक ख्रिस्तसभेत पसरला. कारण ह्याच प्रार्थनेच्या बळावर युजीन या राजपुत्राने तुर्कांवर हंगेरी येथे आणखी एक विजय संपादन केला होता. पोप लिओ तेरावे ह्यांनी ऑक्टोबर हा महिना रोझरीचा महिना म्हणून जाहीर केला.

पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या परमगुरुपदाच्या रौप्यमहोत्सवानिमित्ते १६ ऑक्टोबर २००२ रोजी रोझरीच्या प्रार्थनेमध्ये प्रकाशाची पाच रहस्ये समाविष्ट केली आणि ऑक्टोबर २००२ ते ऑक्टोबर २००३ हे रोझरी वर्ष म्हणून जाहीर केले. ते स्वतः नित्यनेमाने रोझरीची प्रार्थना करीतात.

चिंतन : दररोज जी व्यक्ती भक्तीभावाने जपमाळेची प्रार्थना करते ती देवापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी आनंदाने माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहून देईन ! - संत लुईस मोंटफॉर्ड



✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ३:७-१४
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

“जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या आब्राहामसहित आशीर्वाद मिळतो."

जे विश्वासाचे तेच आब्राहामचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने आब्राहामला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, “तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल." म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या आब्राहामसहित आशीर्वाद मिळतो हे तुम्ही समजून घ्या.
नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल.” तरी विश्वासाचे नव्हे, परंतु "जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.” आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. "जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे." असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की, आब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजेच आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

किंवा 

पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये १:१२-१४ 

वाचन : प्रेषितांची कृत्ये  यातून घेतलेले वाचन 

मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले; १३ आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलींत गेले; तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते; १४ हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  लूक :१: ४६-५६
प्रतिसाद :कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्ये केली आहेत:
१) तेव्हां मरीया म्हणाली : 'माझा जीव प्रभूला' थोर मानितो
आणि 'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे माझा आत्मा 'उल्हासला आहे; '

 २)कारण 'त्याने' आपल्या 'दासीच्या.दैन्यावस्थेचें
अवलोकन केलें आहे.' पाहा, आतांपासून
सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील; 
 कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्ये केली आहेत:
आणि 'त्याचें नांव पवित्र आहे,' 

 ३)आणि जे 'त्याचें भय धरितात, त्यांच्यावर
त्याची दया पिढ्यान्पिढ्या आहे.' 
 त्यानें आपल्या 'बाहूनें' पराक्रम केला आहे;
जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेनें 
'गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.'

 ४) 'त्यानें अधिपतींस' राजासनांवरून 'ओढून
काढिलें आहे' व 'दीनांस उंच केलें आहे.' 
 'त्याने भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केलें आहे,' 
व 'धनवानांस रिकामें लावून दिले आहे.'

५) 'आपल्या पूर्वजांस' त्यानें सांगितलें 
 'त्याप्रमाणें अब्राहाम' व त्याचें 'संतान 
ह्यांच्यावरील दया' सर्वकाळ 'स्मरून 
त्यानें आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केलें आहे.'


किंवा 

प्रतिसाद स्तोत्र  १११:१-२, ३-४, ५-६
प्रतिसाद :परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो.

१) परमेश्वराचे स्तवन करा. 
सरळ जनांच्या सभेत आणि 
मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे 
उपकारस्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, 
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.

२) त्याची कृती साक्षात प्रताप आणि महिमा आहे, 
त्याचे न्याय्यत्व सर्वकाळ टिकून राहते. 
आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे 
असे त्याने केले आहे. परमेश्वर कृपाळू आणि कनवाळू आहे.

३ )त्याने आपले भय धरणाऱ्यांस अन्न दिले आहे, 
तो आपला करार सदा स्मरतो.
 त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन 
आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:२६-३८
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
नंतर सहाव्या महिन्यांत देवानें गालीलां तील नासरेथ नांवाच्या गांवी एका कुमारी कडे गब्रीएल देवदूताला पाठविलें.  ती दावीदाच्या घराण्यांतील योसेफ नांवाच्या पुरुषाला वाग्दत्त होती, आणि त्या कुमारीचें नांव मरीया होतें.  देवदूत तिच्याकडे आंत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभु तुझ्याबरोबर असो'.  ह्या बोलण्याने तिच्या मनांत खळबळ उडाली आणि हें अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करूं लागली.  देवदूतानें तिला म्हटलें, मरीये, भिऊं नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे;  पाहा, तूं गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचें नांव येशू ठेव.  तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचें राजासन देईल;  आणि तो याकोबाच्या घराण्यावर 'युगानुयुग राज्य करील,' व त्याच्या राज्याचा अंत होणार नाहीं.  मरीयेनें देवदूताला म्हटलें, हें कसें होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाहीं.  देवदूतानें उत्तर दिलें, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचें सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्या कारणानें ज्याचा जन्म होईल. त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असें म्हणतील.  पाहा, तुझ्या नात्यांतली अलीशिबा हिलाहि म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे;  कारण 'देवाला कांहींच अशक्य होणार नाही.'  तेव्हां मरीया म्हणाली, पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणें मला होवो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

किंवा 

शुभवर्तमान लूक ११:१५-२६
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. "

काहीजण म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या सहाय्याने हा भुते काढतो आणि दुसरे काहीजण त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागू लागले." परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले कोणतेही राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानांतहीफूट पडली तर त्यांचे राज्य कसे टिकेल ? कारण मी बालजबूलच्या सहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय्य करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र आणि बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो आणि त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.
मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन आणि तो आल्यावर ते झाडलेले आणि सुशोभित केलेले त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो आणि ते आत घुसून तेथे राहतात, मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सात तारखेला ख्रिस्तसभा रोझरी मातेचा सण साजरा करते. रोझरी म्हणजे कौटुंबिक भक्ती आणि कौटुंबिक प्रार्थना. ख्रिस्ती धार्मिक प्रथेचा गाभा असलेली ही वैयक्तिक भक्ती आहे. ती येशूचे जन्म, दुःखसहन, मृत्यू आणि पुनरुत्यानाशी संबंधित असलेल्या मरियेच्या उदाहरणाचे अनुकरण करून ख्रिस्ताच्या रहस्यमय गोष्टींवर मध्यस्थी करण्यासाठी सर्वांना आमंत्रित करते. मरियेचा सन्मान करण्यासाठी ख्रिस्तसभा हा सण साजरा करते आणि तिच्या मध्यस्थीद्वारे प्राप्त झालेल्या कृपेसाठी हा दिवस साजरा केला जातो. या सणाची स्थापना १५७३मध्ये सेंट पायस पाचवे ह्यांनी केली. ते डॉमनिकन पोप होते. त्यांची ह्या प्रार्थनेवर खूप वैयक्तिक भक्ती होती. जपमाळेची प्रार्थना ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रार्थना आहे. पोप पॉल सहावे यांनी त्याचे वर्णन : “शुभवर्तमानाची प्रार्थना" म्हणून केले आहे. मरियेच्या अनेक दर्शनात विशेषतः फातिमा व लुर्ड्स येथील दर्शनात मरियेने रोझरीची प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. सैतान व दृष्ट शक्तीच्या विरुद्ध लढाईत रोझरी हे आपले शक्तिशाली अत्र आहे. परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी पवित्र मरियेची मध्यस्थी मागू या.

प्रार्थना :  हे पवित्र मरिया माते, आमचे कैवारीणी, आम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी विनंती कर, आमेन.
 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️